Who Is Jai Moondra: भारतीय संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ आयर्लंडमध्ये दाखल झाला आहे. २६ जूनला पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी आधीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. तर आयर्लंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. आयर्लंडने या मालिकेसाठी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. तर राजस्थानमध्ये जन्मलेल्या जय मूंद्राला देखील संधी देण्यात आली आहे. कोण आहे जय मूंद्रा? जाणून घ्या.
कोण आहे जय मूंद्रा?
भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी आयर्लंडच्या संघात राजस्थानमध्ये जन्मलेल्या जय मूंद्राला संधी देण्यात आली आहे. जय मूंद्राचा जन्म राजस्थानच्या टोंकमध्ये झाला होता. त्याचं जन्मस्थान जयपूरपासून अवघ्या १०० किलोमीटर अंतरावर आहे. लहानपणापासूनच त्याला क्रिकेट खेळायची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्याने क्रिकेट अॅकेडमी जॉईन केली. ज्यावेळी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, त्यावेळी तो वेगवान गोलंदाज होता. पण त्यानंतर त्याने फलंदाजीकडे अधिक लक्ष केंद्रित केलं आणि टॉप ऑर्डरचा फलंदाज बनला. यासह त्याने ऑफ स्पिन गोलंदाजीही सुरु केली. क्रिकेट आयर्लंडला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं की, त्याने शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्याने पुन्हा एकदा क्रिकेट खेळायला आणि वेगवान गोलंदाजी करायला सुरुवात केली.
जय मूंद्राचा आयर्लंडसाठी क्रिकेट खेळण्याचा प्रवास २०१९ मध्ये सुरु झाला. त्याने २०१९ मध्ये नोकरी सोडून क्रिकेटला एक संधी देण्याचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये मास्टर्सची डिग्री मिळवण्यासाठी तो आयर्लंडमध्ये शिफ्ट झाला होता. यादरम्यान त्याने डब्लिनच्या लेइनस्टर क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश केला. इथूनच त्याला आयर्लंडसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर २ वर्षांनंतर २०२३ मध्ये लेइनस्टर संघने आयरीश सिनियर कप या स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. जय मूंद्रा या संघाचा भाग होता. त्यानंतर जय मूंद्राने आपली कामगिरी सुधारण्यावर भर दिला. आता त्याला आयर्लंडसाठी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे आयर्लंडचा संघ:
रॉस अडायर, बेन कॅलिट्ज, लोर्कन टकर (कर्णधार), गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टिफन डोहेनी, मॅथ्यू हम्फ्रीज, गेविन होए, मॅथ्यू होलार्ड, लियाम मॅकार्थी, जय मूंद्रा, हॅरी टेक्टर, टीम टेक्टर आणि रूबेन विल्सन.
