चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२६च्या च्या उर्वरित सामन्यांसाठी दुखापत झालेल्या रामकृष्ण घोषच्या जागी कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू मॅकनील हॅडली नोरोन्हा याला संघात सामील करून घेतल्याची घोषणा केली आहे. मॅकनील हॅडली नोरोन्हाच्या चेन्नई सुपर किंग्ससोबतच्या कराराची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नोरोन्हा हा भारतीय खेळाडू आहे. चेन्नई सुपर किंग्सचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे.
हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात जोरदार पुनरागमन करूनही, चेन्नई सुपर किंग्ससाठी दुखापत ही एक समस्या ठरली आहे. खलील अहमद आणि आयुष म्हात्रे हे दुखापतींमुळे स्पर्धेतून आधीच बाहेर झाले होते. चेन्नई सुपर किंग्सने म्हात्रेच्या जागी आकाश मधवालला संधी दिली, परंतु खलील अहमदच्या जागी अद्याप कोणालाही संघात स्थान दिलेले नाही.
चेन्नई सुपर किंग्स संघ बीसीसीआयच्या परवानगीची वाट पाहत आहे आणि त्यानंतर त्याला अधिकृतपणे संघात सामील केल्याची घोषणा केली जाईल. नरोन्हा हा २४ वर्षीय फलंदाजी अष्टपैलू खेळाडू असून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाकडून खेळतो. त्याने आतापर्यंत संघासाठी तीन टी-२० सामने खेळले आहेत. मॅकनीलने सीके नायडू ट्रॉफी २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, त्याने १४ डावांमध्ये ७९.७७ च्या सरासरीने १०३७ धावा केल्या. त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली. त्याची तीन शतकं उत्तराखंड आणि त्रिपुराविरुद्ध होती.
२४ वर्षीय नोरोन्हाने २०२५ ची महाराजा ट्रॉफी जिंकणाऱ्या मंगळूरू ड्रॅगन्स संघाकडून उत्कृष्ट कामगिरी केली होती. नोरोन्हाने १३ सामन्यांमध्ये १४८.८२ च्या स्ट्राईक रेटने २५३ धावा केल्या, ज्यात १९ षटकारांचा समावेश आहे. या स्पर्धेत नोरोन्हाने आपल्या ऑफ-स्पिन गोलंदाजीनेही चांगली कामगिरी केली. या खेळाडूने दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि सीएसके या संघांसाठी ट्रायल्स दिले होते.
नोरोन्हाने ७.४४ च्या इकॉनॉमीने १० बळी घेतले. हुबळी टायगर्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात २५ धावांत २ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी कर्नाटकच्या संघातही त्याची निवड झाली होती आणि त्याने तीन सामने खेळले. ३ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात पायाला फ्रॅक्चर झालेल्या २८ वर्षीय घोषच्या जागी नोरोन्हाची निवड झाली आहे.
