Who is Madhav Tiwari PBKS vs DC: धरमशालामध्ये सुरू असलेल्या पंजाब किंग्जविरुद्धच्या महत्त्वाच्या आयपीएल २०२६ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने २१ वर्षीय माधव तिवारीला अनपेक्षित संधी दिली आणि या युवा वेगवान अष्टपैलू खेळाडूने संधीचं सोनं करत आपली छाप पाडली. ‘करो या मरो’ सामन्यासाठी दिल्लीने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये तब्बल पाच बदल केले होते. त्यामध्ये माधव तिवारीला यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच संधी देण्यात आली. पहिल्याच प्रयत्नात तो या सामन्याचा सामनावीर ठरला आणि दिल्लीच्या विजयाचा हिरोही ठरला.
आयपीएलमध्ये यावर्षी पहिल्यांदाच गोलंदाजी करताना माधवने आक्रमक फलंदाज प्रियांश आर्याविरुद्ध उल्लेखनीय संयम आणि आत्मविश्वास दाखवला. त्याने प्रियंशची महत्त्वाची विकेट घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. माधव तिवारीने सुरुवातीला प्रियंश आर्यची कमालीच्या शॉर्ट बॉलने परीक्षा घेतली. पुन्हा एक अचूक शॉर्ट लेंथचा चेंडू टाकला, ज्यावर प्रियांश नीट फटका खेळू शकला नाही. चेंडू डीप कव्हरच्या दिशेने हवेत गेला आणि साहिल पारखने चांगला झेल घेतला. या विकेटसह माधव तिवारीने आयपीएलमधील आपल्या कारकिर्दीतील पहिली विकेट मिळवली. दिल्ली कॅपिटल्ससाठीही हा अत्यंत महत्त्वाचा ब्रेकथ्रू ठरला, कारण प्रियंश आर्या ३३ चेंडूत ५६ धावांची स्फोटक खेळी करून बाद झाला. त्याच्या डावात २ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.
माधव तिवारीने यानंतर स्फोटक फटकेबाजी करणाऱ्या कुपर कॉनोलीला देखील बाद केलं. कुपर कॉनोली ३८ धावा करत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यासह माधवने ४ षटकांच्या स्पेलमध्ये ४० धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये डेव्हिड मिलर अर्धशतकी खेळी करत बाद झाल्यानंतर माधवला फलंदाजीसाठी धाडण्यात आलं आणि तिथेही आपल्या फटकेबाजीने सर्वांचं मन जिंकलं. माधवने ८ चेंडूच २ चौतार व एका षटकाराच्या मदतीने १८ धावांची खेळी केली.
Ice in their veins and pure fire in their bats! ??
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2026
Madhav Tiwari & Ashutosh Sharma with match-winning clutch cameos to seal the deal for #DC ?
Updates ▶️ https://t.co/wHhflKIvCR#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvDC | @DelhiCapitals pic.twitter.com/ZqwSxTCrhj
कोण आहे माधव तिवारी?
२८ सप्टेंबर २००३ रोजी मध्य प्रदेशातील मऊगंज गावात जन्मलेल्या माधव तिवारीला राज्यातील उदयोन्मुख वेगवान अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणलं जातं. वरिष्ठ स्तरावरील देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव नसतानाही, वयोगट स्पर्धा आणि फ्रँचायझी स्तरावरील स्पर्धांमधील दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने आयपीएल करार मिळवला. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२५ मेगा लिलावात माधवला ४० लाख रुपयांना खरेदी केलं आणि नंतर २०२६ हंगामासाठीही कायम ठेवलं.
माधवने २०२५ मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल पदार्पण केलं होतं. त्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ३ धावा केल्या, मात्र जसप्रीत बुमराहने त्याला बाद केलं. त्या सामन्यात त्याला गोलंदाजीची संधी मिळाली नव्हती.
माधवने १९ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील स्तरावर मध्य प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच २०२४-२५ च्या सीके नायडू ट्रॉफीमध्येही तो खेळला. या स्पर्धेत त्याने दोन अर्धशतकं झळकावली होती. त्यामध्ये मुंबईविरुद्धच्या सामन्यात फॉलोऑनमध्ये अडचणीत सापडलेल्या मध्य प्रदेशसाठी केलेल्या लढाऊ ८३ धावांच्या खेळीची विशेष चर्चा झाली होती. याशिवाय, माधवने मध्य प्रदेश टी-२० लीगमध्ये भोपाळ लेपर्ड्स संघाकडून खेळताना आपली छाप पाडली. त्या संघात सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज अनिकेत वर्माही होता, तर गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज अर्शद खान संघाचं नेतृत्व करत होता.
आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी आणि खालच्या फळीत आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या माधव तिवारीने मध्य प्रदेश टी-२० लीगमध्ये शानदार कामगिरी केली होती. त्याने पाच डावांत १८० च्या स्ट्राइक रेटने १०८ धावा केल्या. विशेष म्हणजे, रेव्हा जग्वार्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने अवघ्या ३१ चेंडूत ६५ धावांची तुफानी खेळी करत भोपाळ लेपर्ड्सला अंतिम फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
अद्याप त्याने प्रथम श्रेणी किंवा लिस्ट-ए क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नसतानाही, पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यातील त्याच्या प्रभावी कामगिरीने दिल्ली कॅपिटल्सच्या या युवा अष्टपैलू खेळाडूकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
