Kunain Qureshi Duleep Trophy 2026 Century Profile Details: इशान किशनच्या नेतृत्त्वाखालील ईस्ट झोन संघाने दुलीप करंडक २०२६चं जेतेपद पटकावलं आहे. चेन्नईत झालेल्या अंतिम सामन्यात साऊथ झोन संघाविरूद्ध सामन्यात विजय नोंदवला. या सामन्यात इशान किशनच्या ३५० धावांच्या खेळीच्या बळावर ईस्ट झोन संघाने मोठी धावसंख्या उभारली खरी, पण फक्त दुसरा फर्स्ट क्लास सामना खेळणाऱ्या मोहम्मद कुनैन कुरेशीने शतक झळकावलं. पण हा खेळाडू कोण आहे जाणून घेऊया.
ईस्ट झोन आणि साऊथ झोन यांच्यातील हा अंतिम सामना ड्रॉ झाला असला तरी नियमांनुसार पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे ‘ईस्ट झोन’ला अधिकृत विजेता घोषित करण्यात आलं. या विजयामुळे ईस्ट झोनची १३ वर्षांची प्रतीक्षा संपली आणि आपल्या इतिहासात तिसऱ्यांदा ‘दुलीप करंडक’ पटकावला. पण या सामन्यात विजेत्या संघाला चकाकणारा करंडक आणि १ कोटी रुपयांचं बक्षीस प्रदान करण्यात आलं.
ईस्ट झोनच्या दुसऱ्या डावात आत्मविश्वासाने खेळणाऱ्या कुनैन कुरैशीने अंतिम दिवशी शानदार शतक झळकावत आपल्या कारकिर्दीत आणखी एक मोठं पाऊल पुढे टाकलं. या फलंदाजाने १९० चेंडूंमध्ये नाबाद ११६ धावा केल्या आणि त्याच्या या खेळीमुळे ईस्ट झोनचं वर्चस्व कायम राहिलं. अखेर हा सामना अनिर्णित राहिला.
दुलीप ट्रॉफी २०२६मध्ये आपल्या दमदार कामगिरीने कुनैनने सर्वांचं लक्ष वेधलं असलं, तरी तो अजूनही भारतीय क्रिकेटमध्ये फारसा परिचित चेहरा नाही. त्यामुळे दुलीप ट्रॉफीचा विजेता ठरलेल्या या युवा खेळाडूबद्दल जाणून घेऊया.
झारखंड प्रीमियर लीगमधील कमालीचे आकडे
१७०हून अधिक स्ट्राइक रेट आणि फलंदाजीची सरासरी २३० आहे, ही आकडेवारी पाहिली तरी विश्वास बसणार नाही. मात्र, अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झारखंड प्रीमियर लीगमध्ये कुनैन कुरैशीने हे आकडे प्रत्यक्षात नोंदवले होते. जमशेदपूर स्टीलर्सकडून फिनिशरची भूमिका बजावताना २३ वर्षीय कुनैनने सहा डावांत केवळ एकदाच विकेट गमावली. त्याच्या या दमदार फलंदाजीमुळे जमशेदपूर स्टीलर्सने स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलं. फलंदाजीबरोबरच कुनैनने गोलंदाजीतही योगदान दिलं. त्याने आठ सामन्यांत ३५.५०च्या सरासरीने ६ विकेट्स घेतल्या. झारखंड प्रीमियर लीगमधील या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याच्या कारकिर्दीला मोठी दिशा मिळाली आणि त्यानंतर दुलीप ट्रॉफी २०२६साठी ईस्ट झोनच्या संघात त्याची निवड झाली.
फर्स्ट क्लास पदार्पणाचा अनोखा प्रवास
JPL २०२६ मधील त्याच्या अविश्वसनीय आकडेवारीप्रमाणेच कुनैनचं फर्स्ट-क्लास क्रिकेटमधील पदार्पणही तितकाच अनपेक्षित आणि वेगळं आहे. दुलीप ट्रॉफी २०२६च्या उपांत्य फेरीसाठी अनुभवी फिरकी अष्टपैलू शाहबाज अहमदच्या जागी अचानक ईस्ट झोनच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला. कुनैनने ईस्ट झोनकडून सेंट्रल झोनविरुद्धच्या दुलीप ट्रॉफी उपांत्य सामन्यातून फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. भारतीय क्रिकेटमध्ये सहसा खेळाडू आधी रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करतात आणि त्यानंतर त्यांची दुलीप ट्रॉफीसाठी निवड होते. मात्र, कुनैनचा प्रवास यापेक्षा पूर्णपणे वेगळा राहिला. विशेष म्हणजे, कुनैनने झारखंडकडून अद्याप एकही रेड-बॉल सामना खेळलेला नाही. त्यामुळे थेट दुलीप ट्रॉफीतून फर्स्ट-क्लास पदार्पण करण्याचा त्याचा प्रवास निश्चितच अनोखा आहे.
दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत कुनैनचा समावेश
रणजी ट्रॉफीचा अनुभव नसतानाही थेट फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण करणं दुर्मिळ असलं, तरी भारतीय क्रिकेटमध्ये हे याआधी घडलं आहे. भारताच्या दोन दिग्गज कसोटी क्रिकेटपटूंनीही फर्स्ट-क्लासमध्ये आधी पदार्पण आधी केलं आणि त्यानंतर रणजी ट्रॉफी खेळली. या यादीत रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे. त्यामुळे कुनैन कुरैशीचा दुलीप ट्रॉफीच्या माध्यमातून सुरू झालेला फर्स्ट-क्लास क्रिकेटमधील प्रवास केवळ अनोखा नाही, तर भारतीय क्रिकेटमधील काही मोठ्या नावांच्या प्रवासाशी साधर्म्य साधणाराही आहे.
