Who Is Mukul Choudhary: कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सामना जवळजवळ खिशात घातला होता. पण शेवटी मुकुल चौधरी सामना फिरवला. आयपीएल स्पर्धेने भारतीय क्रिकेटला अनेक तारे दिले आहेत. या यादीत आता मुकुल चौधरीच्या नावाचा समावेश झाला आहे. ७ विकेट्स पडल्यानंतर कोलकाताने विजयाची स्वप्न पाहायला सुरूवात केली होती. पण अवघ्या २७ चेंडूत नाबाद ५४ धावांची खेळी करून मुकुलने कोलकाताचं स्वप्नभंग केलं. दरम्यान २१ वर्षीय मुकुल चौधरी आहे तरी कोण? जाणून घ्या.
आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी झालेल्या मिनी लिलावात लखनौ सुपर जायंट्सने मुकुल चौधरीवर २.४ कोटींची बोली लावली होती. ज्यावेळी मुकुल चौधरीवर इतकी मोठी बोली लागली, त्यावेळी एकच प्रश्न उपस्थित केला गेला होता, तो म्हणजे अनुभव नसताना इतकी मोठी बोली का? पण मुकुल चौधरीने आपल्यावर इतकी मोठी बोली का लागली आहे, हे दाखवून दिलं. लिलावात त्याची मूळ किंमत ३० लाख रुपये होती. मुंबई इंडियन्सने ९० लाखांपर्यंत त्याचा पाठलाग केला. त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली. शेवटी २.४ कोटींमध्ये मुकुल चौधरी लखनौच्या ताफ्यात दाखल झाला.
मुकुल चौधरी आहे तरी कोण? (who is mukul choudhary)
२१ वर्षीय मुकुल चौधरी हा मुळचा राजस्थानचा आहे. ज्युनियर निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर काही वर्ष तो जयपूरमध्ये राहिला. त्याने अरवली क्रिकेट अॅकेडमीमध्ये कार्तिक शर्मा आणि अशोक शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं. मुकुल चौधरी ज्या गावात राहतो, त्या गावातील बहुतांश तरूण सैन्यात जाण्याच्या प्रयत्नात असतात. मुकुल चौधरी देखील उंच काठीचा आहे. पण वडिलांचं स्वप्न होतं की, मुलाने क्रिकेटपटू व्हावं. लग्न होण्याआधीच वडिलांना वाटायचं की, जेव्हा मुलगा होणार त्याने क्रिकेटपटू व्हावं. आता मुकुलने हे स्वप्नं पूर्ण केलं. जानेवारी २०२३ मध्ये त्याने छत्तीसगढविरूद्ध खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ३ सामन्यांमध्ये त्याने १२.७५ च्या सरासरीने ५१ धावा केल्या आहेत.
मुकुल चौधरीची कारकिर्द
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तो स्वत:ला सिद्ध करू शकला नाही. त्याने ऑक्टोबर २०२३ मध्ये झारखंडविरुद्ध झालेल्या सामन्यातून त्याने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्याने ३५ धावांची दमदार खेळी केली होती. त्याची टी-२० क्रिकेटमधील कामगिरी पाहिली, तर त्याने ७ टी-२० सामन्यांमध्ये ४२ च्या सरासरीने २१० धावा केल्या. यादरम्यान ६२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. ज्या दिवशी आयपीएल स्पर्धेचा लिलाव होता, त्याच दिवशी त्याने राजस्थानचं प्रतिनिधित्व करताना मुंबईविरूद्ध दमदार अर्धशतक झळकावलं होतं.
