वुमन्स प्रीमियर लीगमध्ये आजचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध गुजरात जायंट्स यांच्यात रंगला होता. प्रथम फलंदाजी करताना, गुजरात जायंट्सने WPL २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २०९ धावांची खेळी केली आहे. सोफी डिव्हाईनने वादळी फटकेबाजी करत ९५ धावांची खेळी केली. अवघ्या ५ धावांसाठी तिचं शतक हुकलं. त्यांच्याशिवाय अॅश्ले गार्डनरनेही कमालीची अर्धशतकी खेळी केली. या खेळाडूंमुळेच गुजरातचा संघ मोठी धावसंख्या गाठू शकला. पण यादरम्यान सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे दिल्लीच्या नंदिनी शर्माने.
दिल्ली कॅपिटल्सकडून नंदिनी शर्माने शानदार गोलंदाजी केली आणि सामन्यात हॅटट्रिक घेतली. गुजरात जायंट्सविरुद्धच्या डावातील २० वं षटक नंदिनी शर्माने टाकलं. षटकाच्या पहिल्या चेंडूवर तिने एक धाव दिली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तिने काश्वी गौतमला बाद केलं. त्यानंतर, तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेण्यात आली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर नंदिनी शर्माने कनिका आहुजाला बाद केलं. पाचव्या चेंडूवर राजेश्वरी गायकवाडला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर, सहाव्या चेंडूवर, तिने रेणुका सिंगला बाद केलं आणि तिची हॅटट्रिक पूर्ण केली आणि षटकात चार बळी घेतले.
नंदिनी शर्माचं २०वं षटक
पहिला चेंडू – १ धाव
दुसरा चेंडू – काश्वी गौतम बाद
तिसरा चेंडू – १ धाव
चौथा चेंडू – कनिक अहुजा बाद
पाचवा चेंडू – राजेश्वरी गायकवाड बाद
सहावा चेंडू – रेणुका सिंग बाद
नंदिनी शर्मा ही WPL इतिहासात हॅटट्रिक घेणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली. याआधी हॅटट्रिक दीप्ती शर्माने WPL २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध घेतली होती. आता नंदिनीने तिच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हे मोठे यश मिळवले आहे. नंदिनी शर्मा ही WPL सामन्यात पाच विकेट्स घेणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली. आशा शोभनाने यूपी वॉरियर्जविरूद्ध २०२४ मध्ये सामन्यात ५ विकेट्स घेतले होते.
कोण आहे नंदिनी शर्मा?
नंदिनी ही चंदीगडची एक प्रतिभावान भारतीय महिला क्रिकेटपटू आहे, जी तिच्या वेगवान गोलंदाजीसाठी आणि देशांतर्गत टी-२० क्रिकेटमधील आपल्या कामगिरीसाठी ओळखली जाते. २० सप्टेंबर २००१ रोजी जन्मलेल्या नंदिनीने देशांतर्गत स्पर्धांमध्ये चंदीगड महिला संघाचे आणि आंतर-विभागीय सामन्यांमध्ये उत्तर विभागीय महिला संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, आणि एक नवी तरुण गोलंदाज म्हणून सातत्याने आपली ओळख तयार करत आहे. गुजरात जायंट्स विरुद्धच्या सामन्यात, नंदिनी शर्माने चार षटकांत ३३ धावा दिल्या आणि पाच विकेट्स घेतल्या. तिने २० व्या षटकात पूर्णपणे वर्चस्व गाजवलं.
