Australia U19 Squad India Tour Indian Origin Neel Patel: ऑस्ट्रेलियाचा अंडर-१९ संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या भारताच्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाने अंडर-१९ संघाची घोषणा केली आहे. भारतीय वंशाच्या नील पटेलसह एकूण १६ खेळाडूंची या संघात निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षांखालील संघ चार आठवड्यांच्या भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यादरम्यान एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन वेगवेगळ्या प्रकारांमधील मालिका खेळवल्या जातील. या दोन्ही मालिकांसाठी नील पटेलची ऑस्ट्रेलियाच्या १९-वर्षांखालील संघात निवड झाली आहे. हा नील पटेल नेमका कोण आहे, जाणून घेऊया.
भारतीय वंशाचा सलामीवीर नील पटेलला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील एक मोठी संधी मिळाली आहे. पुढील महिन्यात भारत दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अंडर-१९ संघात त्याची निवड करण्यात आली आहे. न्यू साउथ वेल्सचा हा युवा खेळाडू भारत दौऱ्यावर खेळताना दिसणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघांतील हे सामने १३ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान राजकोट आणि अहमदाबाद येथे आयोजित करण्यात येणार आहेत.
कोण आहे नील पटेल?
नील पटेल हा मूळचा गुजरातचा असलेला, भारतीय वंशाचा एक उदयोन्मुख ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. नील सलामीवीराची भूमिका उत्तम बजावतो, तर गोलंदाजीमध्ये तो ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो. त्याने फलंदाजी करताना दाखवलेली सातत्यपूर्ण कामगिरी आणि परिपक्वता यांच्या जोरावर त्याने ऑस्ट्रेलियन ज्यूनियर क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स क्लब’चे प्रतिनिधित्व करणाऱ्या नील पटेलने वयाच्या १६ व्या वर्षी पहिल्यांदाच सर्वांचे लक्ष वेधून घेतलं; त्याने ‘सिडनी प्रीमियर क्रिकेट फर्स्ट ग्रेड’च्या इतिहासात एकाच कॅलेंडर वर्षात १,००० हून अधिक धावा केल्या होत्या. या दमदार कामगिरीनंतर, नील पटेलची ॲडलेड येथील ऑस्ट्रेलियाच्या १९-वर्षांखालील पुरुष संघाच्या ‘टॅलेंट कॅम्प’साठी निवड झाली.
नील पटेलबाबत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याची सतत शिकत राहण्याची वृत्ती; सुधारणेला नेहमीच वाव असतो, असं तो मानतो. म्हणूनच तो आपल्या प्रत्येक खेळीबद्दल (इनिंग्ज) प्रशिक्षकांशी चर्चा करतो आणि त्यांच्या सल्ल्याची अंमलबजावणी करतो. तसेच, आपल्या प्रत्येक खेळीबाबत नोट काढून ठेवण्याचीही त्याला सवय आहे. क्रिकेटव्यतिरिक्त, नील पटेलला स्वयंपाक करायला आणि वडिलांसोबत बुद्धिबळ खेळायला आवडतो.
नील पटेलची ऑस्ट्रेलियाच्या १९-वर्षांखालील (U19) संघात अष्टपैलू उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवड करण्यात आली असून फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर महत्त्वपूर्ण योगदान देण्यास सक्षम आहे. आता त्याच्यासमोर अशा देशात खेळण्याचं आणि चांगली कामगिरी करण्याचं आव्हान आहे, जिथे त्याच्या कुटुंबाची मूळ मुळं आहेत.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा अंडर-१९ संघ
केसी बार्टन, हेडन बारबुलोविक, एली ब्रेन, विल बायरोम, ब्लेक केटल, जॅक जोसनेक, स्पेन्सर ग्रीन, कॉनर ग्रेगरी, चार्ली हेंडरसन, जेड होलिक, मॅथ्यू लॉग, नील पटेल, जॅक पिट्झ, पॅट्रिक सुलिव्हन, थियो सिंगोस, थॉमस वासेयो
