IPL 2026 Who is SRH Debutant Praful Hinge: राजस्थान रॉयल्सविरूद्ध सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादने संघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. हैदराबादने दिलेल्या २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव पत्त्त्यांसारखा कोसळला. हैदराबादच्या प्रफुल्ल हिंगेने राजस्थानच्या टॉप फलंदाजी फळीला सुरूंग लावत एकाच षटकात ३ विकेट्स घेतल्या. पण हा नवा खेळाडू प्रफुल्ल हिंगे आहे तरी कोण, जाणून घेऊया.

राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केलं. हैदराबादने इशान किशनच्या ९१ धावांच्या बळावर २१७ धावांचा डोंगर उभारला. राजस्थानचा संघ २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला. राजस्थानची स्फोटक जोडी वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वालची जोडी उतरली. हैदराबादने पदार्पणवीर गोलंदाज प्रफुल्ल हिंगेला गोलंदाजीची संधी दिली.

प्रफुल्ल हिंगेने पहिल्याच षटकात आपल्या गोलंदाजीने सर्वांची झोप उडवली. पहिल्या चेंडूवर यशस्वी जैस्वालने १ धाव घेतली. यानंतर दुसऱ्या चेंडूवर वैभव सूर्यवंशी स्ट्राईकवर आला आणि मोठ्या फटका खेळण्याच्या प्रयत्नात गोल्डन डकवर झेलबाद झाला. यानंतर चौथ्या चेंडूवर प्रफुल्लने ध्रुव जुरेलला क्लीन बोल्ड केलं. यानंतर षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लुहान डे प्रिटोरियसला झेलबाद करत तिसरी विकेट घेतली.

कोण आहे प्रफुल्ल हिंगे? (Who is Praful Hinge?)

प्रफुल्ल हिंगे हा मूळचा विदर्भाचा आहे. विदर्भाच्या पोट्ट्याला सनरायझर्स हैदराबादने लिलावात खऱेदी केलं होतं आणि त्याला खेळण्याची संधी देताच आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. प्रफुल हिंगे हा विदर्भातील खेळाडू असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने मेहनती आणि सातत्यपूर्ण गोलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आयपीएलमध्ये संधी मिळण्यापूर्वी रणजी करंडक स्पर्धेत त्याने विदर्भासाठी उत्कृष्ट कामगिरी करत केवळ १० प्रथम श्रेणी सामन्यांत २७ बळी घेतले, आणि त्याची सरासरीही प्रभावी २६.६७ अशी होती.

प्रफुलला लहानपणापासूनच क्रिकेटचं वेड होतं. प्रफुलला फलंदाज व्हायचं होतं, पण त्याच्या वडिलांनी त्याला गोलंदाज होण्यासाठी सांगितलं. वडिलांच्या या सातत्यपूर्ण सांगण्यावरून प्रफुल हिंगे गोलंदाज झाला. सुरूवातीला प्रफुलच्या गोलंदाजी अॅक्शनवर प्रश्न उपस्थित करण्यात आलं. यातून सावरत त्याने आपली क्रिकेट कारकीर्द घडवली.

मोठी स्पेल टाकण्याची क्षमता, अचूकता आणि सपाट खेळपट्ट्यांवरूनही उसळी निर्माण करण्याची त्याची कला यामुळे तो लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये संघासाठी मौल्यवान ठरला. मात्र, लहान फॉरमॅटकडेही तो गतीने वळला. आयपीएलपूर्वीच्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याला ३० लाख रुपयांना संघात घेतलं, आणि त्यांच्या मजबूत वेगवान गोलंदाजी फळीला पर्याय म्हणून त्याच्याकडे संभाव्य खेळाडू म्हणून पाहिलं.

आजच्या आधी त्याचा टी-२० अनुभव मर्यादित असला तरी सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत त्याने पदार्पणातच छाप पाडली. अनुभवी उमेश यादवसोबत गोलंदाजीची सुरुवात करताना त्याने आंध्राविरुद्ध ४ षटकांत २३ धावा देत १ बळी घेतला आणि पॉवरप्लेमधील दडपण हाताळण्याची त्याची क्षमता सिद्ध केली.