Saleema Imtiaz has become the first Pakistani women ICC umpire : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) रविवारी सांगितले की, सलीमा इम्तियाज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) डेव्हलपमेंट अंपायरच्या आंतरराष्ट्रीय पॅनेलमध्ये स्थान मिळवणारी पहिली पाकिस्तानी महिला ठरली आहे. सलीमाचे पॅनेलमध्ये नामांकन झाल्याचा अर्थ ती आता महिलांच्या द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय सामने आणि आयसीसी महिला स्पर्धांमध्ये अंपायरिग करण्यास पात्र आहे. त्यामुळे ती कोण आहे? जाणून घेऊया.
सलीमा इम्तियाज काय म्हणाली?
आयसीसी इंटरनॅशनल डेव्हलपमेंट पॅनेलमध्ये समाविष्ट होणारी सलीमा इम्तियाज ही पहिली पाकिस्तानी महिला अंपायर ठरली आहे. यावेळी सलीमाने तिची मुलगी कायनात इम्तियाजचाही उल्लेख केला, जिने पाकिस्तानसाठी ४० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात १९ वनडे आणि २१ टी-२० सामने आहेत. यावेळी सलीमाने आनंद व्यक्त करताना सांगितले की, “हा फक्त माझा विजय नसून, पाकिस्तानच्या प्रत्येक महिला क्रिकेटपटू आणि पंचाचा विजय आहे. मला आशा आहे की, माझ्या यशामुळे महिलांना खेळात आपला ठसा उमटवण्यासाठी प्रेरणा मिळेल.”
पहिली पाकिस्तानी महिला अंपायर –
सलीमा २००८ मध्ये पीसीबीच्या महिला अंपायर पॅनेलमध्ये सामील झाली आणि गेल्या तीन वर्षांत अनेक आशियाई क्रिकेट परिषद स्पर्धांमध्ये अंपायर म्हणून काम केले आहे. द्विपक्षीय मालिकेत सलीमाची मैदानावरील ही पहिलीच नियुक्ती आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेत सलीमा प्रथमच अंपायरिंग करताना दिसणार आहे. तिच्यासोबत पीसीबी आंतरराष्ट्रीय अंपायर फैसल आफ्रिदी आणि नासिर हुसेन टीव्ही अंपायर असतील. हुमैरा फराह या चौथ्या अंपायर म्हणून काम पाहतील आणि सामना पंच म्हणून पीसीबी आंतरराष्ट्रीय पॅनेलचे मोहम्मद जावेद मलिक मॅच रेफरी म्हणून या मालिकेवर देखरेख करतील.
सलीमा इम्तियाजचा प्रवास –
सलीमाची कारकीर्द सुरुवातीपासूनच सोपी नव्हती. पाकिस्तानमध्ये महिला क्रिकेट अंपायरिंग हे एक क्षेत्र होते, ज्यामध्ये फार कमी महिलांचा प्रवेश होता. इम्तियाजचा प्रवास खूप प्रेरणादायी आणि रंजक आहे, ज्यामध्ये तिने आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने क्रिकेटच्या जगात स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. सलीमाचा क्रिकेटशी संबंध खेळाडू किंवा प्रशिक्षक म्हणून नाही, तर पंच म्हणून आहे, ही महिला क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरी आहे.