Who is Sarabjot Singh: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय नेमबाजांनी दुसऱ्या कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. भारताच्या मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग यांनी दुसरं कांस्यपदक जिंकलं आहे. या भारतीय जोडीने हा सामना १६-२० अशा फरकाने जिंकून भारताला दुसरे कांस्यपदक मिळवून दिले. मनू भाकेर हिचा साथीदार असलेला सरबज्योत सिंग हा नेमका आहे तरी कोण? त्याचा संघर्ष जाणून घेऊया. सरबज्योत सिंग हा दक्षिण कोरिया येथे झालेल्या १५व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. २२ वर्षीय सरबज्योत सिंगने २०२३ मध्ये भोपाळ येथे झालेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. हेही वाचा - Paris Olympic 2024 Live, Day 4: मनू भाकेर-सरबज्योत ऐतिहासिक ऑलिम्पिक पदक स्वीकारतानाचा तो क्षण, पाहा VIDEO सरबज्योत सिंग पंजाबमधील अंबाला येथील शेतकरी कुटुंबातून आलेला आहे. त्याचे वडील जितेंद्र शेतकरी आहेत तर आई हरदीप कौर गृहिणी आहेत. त्याला एक लहान भाऊही आहे. खेळात उत्कृष्ट कामगिरी असूनही सरबज्योत सिंग अतिशय नम्र आहे. त्याच्या आत्मविश्वासामुळेच तो आज मनूसोबत ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर आपले स्थान निर्माण करू शकला. २०१६ मध्ये, त्याने वयाच्या १३व्या वर्षी AR Academy of Shooting Sports, अंबाला येथे नेमबाजीचे प्रशिक्षण सुरू केले. सरबज्योतने २०१९ मध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून आपल्या क्रीडा कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर, चीनच्या हुआंगझू येथे झालेल्या २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सांघिक सुवर्णपदक जिंकले आणि २०२३ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. हेही वाचा - Manu Bhaker Won 2nd Bronze: मनू भाकेरने ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास, भारतासाठी ‘ही’ कामगिरी करणारी पहिली खेळाडू Olympic 2024: फुटबॉल सोडून नेमबाजीकडे कसा वळला सरबज्योत सिंग? ऑलिम्पिक विजेता जेव्हा फक्त १३ वर्षांचा होता तेव्हा त्याला फुटबॉलपटू व्हायचं होतं. मात्र, पिस्तुलाने कागदावर निशाणा साधणाऱ्या मुलांचं ते चित्र त्याच्या मनात घर करून राहिलं होतं. २०१४ मध्ये, सरबज्योत त्याच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, 'बाबा, मला शूटिंग शिकायचं आहे.' त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की हा खेळ खूप खर्चिक आणि महागडा खेळ आहे. पण अखेरीस, सरबज्योतने शूटिंग शिकण्याचा अनेक महिने आग्रह धरला, आणि त्याने २०१९ मध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप, सुहलमध्ये सुवर्णपदक जिंकले.