IPL 2026 Who is KKR Bowler Saurabh Dubey: आयपीएल २०२६ मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक केकेआरने जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. हा निर्णय केकेआरसाठी अगदी योग्य ठरला. कॅमेरून ग्रीनने रायन रिकल्टनला बाद करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली, पण यानंतर सौरभ दुबेने रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांना बाद करत मुंबईला लागोपाठ धक्के दिले. पण हा सौरभ दुबे आहे तरी कोण?

कॅमेरून ग्रीनने तिसऱ्या षटकात मुंबईला दोन मोठे धक्क दिले. तिसऱ्या चेंडूत रायन रिकल्टन व नमन धीरला बाद केलं. यानंतर सौरभ दुबेने त्याच्या स्पेलमधील दोन षटकांत सर्वात मोठ्या दोन विकेट्स मिळवल्या. सौरभ दुबे तिसरं षटक टाकण्यासाठी आला. रोहितने त्याच्या गोलंदाजीवर लॅप शॉट खेळत षटकार मारला. पण यादरम्यान त्याला सौरभ दुबेने त्रासही दिला. सौरभच्या बॉलवर रोहित बीटसुद्धा झाला, अखेरीस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला आणि सौरभ दुबेने त्याच्या कारकिर्दीतील मोठी विकेट मिळवली, ज्याचा कमालीचा आनंद त्याने साजरा केला.

सौरभ दुबे एवढ्यावर थांबला नाही, तो पॉवरप्लेमधील अखेरचं षटक टाकण्यसाठी आला. चांगल्या लयीत असलेल्या सूर्याने त्याच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. षटकारानंतर सौरभने राऊंड द विकेटसाठी गेला आणि त्याने फुल डिलेव्हरी टाकली. सूर्या फटका खेळायला गेला, पण त्याच्या बॅटची कड घेत चेंडू विकेटवर आदळला आणि सूर्या क्लीन बोल्ड झाला. सौरभच्या खात्यात अजून एक मोठी विकेट त्याने लिहिली.

कोण आहे रोहित-सूर्याला बाद करणारा सौरभ दुबे?

महाराष्ट्रातील वर्धाचा रहिवासी असलेला सौरभ दुबे, त्याच्या ६ फूट ५ इंच उंचीसाठी सर्वाधिक ओळखला जातो. त्याच्या शरीरयष्टीमुळे त्याला खेळपट्टीवरून अतिरिक्त उसळी मिळवता येते. डावखुरा वेगवान गोलंदाज असणं त्याच्यासाठी फायदेशीर ठरतं, कारण तो फलंदाजांसाठी, विशेषतः नवीन चेंडूने, अवघड अँगल तयार करतो आणि त्याचा स्विंग कोणत्याही आघाडीच्या फलंदाजाला अडचणीत आणू शकतो. सौरभ दुबे २०१९ मध्ये पहिल्यांदा चर्चेत आला. तो एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया कपमध्ये भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. तेव्हापासून त्याला देशांतर्गत क्रिकेटमधील एक उगवता तारा म्हणून पाहिले जात आहे.

सौरभ दुबेचा आयपीएलपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याला २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघात स्थान मिळालं. मात्र, नशिबाने साथ न दिल्याने हंगाम सुरू होण्यापूर्वीच दुखापतीमुळे त्याला आयपीएलमधून बाहेर पडावं लागलं. तरीही त्याने हार मानली नाही आणि नेट बॉलर म्हणून मुंबई इंडियन्स संघात सामील होऊन आपल्या संधीची वाट पाहिली. स्पर्धात्मक क्रिकेटपासून दीर्घकाळ दूर राहिल्यानंतर, त्याने गेल्या वर्षी विदर्भ प्रो टी-२० लीगमध्ये ऑरेंज टायगर्सकडून उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीमुळे तो पुन्हा आयपीएल स्काउट्सच्या नजरेत आला.

केकेआरला या हंगामात आपल्या वेगवान गोलंदाजांच्या फिटनेसने चांगलाच धक्का दिला. प्रमुख गोलंदाज आकाशदीप पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला, तर हर्षित राणादेखील दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला. यानंतर केकेआरने कोलकाता येथे एक मोठं प्रशिक्षण शिबिर आणि ट्रायल्स घेतले. या ट्रायल्समध्ये नवदीप सैनी, संदीप वॉरियर, के. एम. आसिफ आणि आकाश मधवाल यांसारख्या अनुभवी देशांतर्गत गोलंदाजांचा समावेश होता. पण संघ व्यवस्थापनाने सौरभ दुबेला आकाश दीपच्या जागी करारबद्ध करण्याचा निर्णय घेतला, कारण त्याची गोलंदाजीतील धार आणि उसळी कमालीची होती. डावखुरा मध्यमगती वेगवान गोलंदाज असलेल्या सौरभने आठ लिस्ट ए सामन्यांमध्ये १६ बळी घेतले आहेत.