Suryansh Shedge 24 ball fifty for Punjab Kings: आयपीएल २०२६ च्या हंगामात गुणतालिकेत पहिल्या स्थानी असलेल्या पंजाब किंग्सने आपलं सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे. पंजाबची फलंदाजी इतकी मजबूत आहे की अनेक खेळाडूंना फारशा संधी मिळाल्या नाहीत. मात्र, या हंगामात जेव्हा संघाची फलंदाजी पहिल्यांदाच डगमगली, तेव्हा एका नवोदित क्रिकेटपटूने पुढे येत संघाचा डाव सावरला. हा खेळाडू होता अष्टपैलू सूर्यांश शेडगे, ज्याने गुजरात टायटन्सविरुद्ध धमाकेदार अर्धशतक झळकावलं.

अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी केली. या हंगामात आतापर्यंत संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी गोलंदाजांची सातत्याने धुलाई करत स्फोटक सुरुवात करून दिली आहे. पॉवरप्लेमध्ये संघाला रोखणं कठीण जात असताना, गुजरातच्या वेगवान गोलंदाजांनी यावेळी चित्रच पालटून केवळ ४७ धावांत संघाच्या निम्म्या फलंदाजांना बाद केलं. यानंतर आलेल्या सूर्यांश शेडगे संघाला लढाऊ धावसंख्या उभारण्यात मोठी भूमिका बजावली.

पंजाबचा २३ वर्षीय अनकॅप्ड फलंदाज सूर्यांश शेडगेने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात संघाला संकटातून बाहेर काढत शानदार कामगिरी केली. त्याने अवघ्या २४ चेंडूत अर्धशतक झळकावत डाव सावरला. त्याच्या खेळीचा खास क्षण १४व्या षटकात पाहायला मिळाला, जेव्हा त्याने मानव सुतारच्या एका षटकात तब्बल २६ धावा काढल्या ३ षटकार आणि २ चौकारांची आतिषबाजी करत त्याने संघाला १०० धावांचा पल्ला पार करून दिला. शेवटी शेढगेने २९ चेंडूत ५७ धावा करत आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आणि पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या संघाला लढण्याची संधी मिळवून दिली.

कोण आहे सूर्यांश शेडगे?

सूर्यांश शेडगेचा जन्म २९ जानेवारी २००३ रोजी मुंबईत झाला. सूर्यांश देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळतो. तो एक फलंदाजी अष्टपैलू खेळाडू असून गोलंदाजीही करतो. विराट कोहली हा त्याचा आदर्श आहे, तर हार्दिक पंड्या आणि बेन स्टोक्स यांसारख्या अष्टपैलू खेळाडूंनाही तो प्रेरणास्थान मानतो. त्याच्या क्रिकेट प्रवासाची सुरुवातही खास आहे. लहानपणी त्याची प्रतिभा सर्वप्रथम त्याच्या आईने ओळखली आणि वयाच्या नवव्या वर्षी त्याला क्रिकेट अकॅडमीत नेलं. मुलाच्या स्वप्नासाठी त्याच्या आईने स्वतःची नोकरीही सोडली.

मुंबईसारख्या अत्यंत स्पर्धात्मक क्रिकेट वातावरणात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणं कठीण असतं, पण शेडगेने ते करून दाखवलं. गाइल्स शिल्ड अंडर-१४ आंतरशालेय स्पर्धेत त्याने केवळ १३७ चेंडूत नाबाद ३२६ धावांची अविश्वसनीय खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

सूर्यांश शेडगेने पुढे मुंबई अंडर-१९ संघाचं नेतृत्वही केलं, मात्र त्याला अंडर-१९ विश्वचषकात भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याच्या सुरूवातीच्या काळात अभिषेक नायर यांनी त्याला मार्गदर्शन केलं होतं. नायरने याआधी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांसारख्या खेळाडूंनाही घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आयपीएल २०२३ मध्ये जयदेव उनाडकटच्या जागी लखनौ संघाने त्याला संघात घेतलं, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.