FIFA World Cup 2026, Argentina vs Cape Verde: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील राऊंड ऑफ ३२ फेरीतील सामना अर्जेंटिना आणि केव व्हर्डे या दोन्ही संघामध्ये पार पडला. एकिकडे फुटबॉल विश्वातील महासत्ता म्हणून ओळखला जाणारा अर्जेंटिनाचा संघ. तर दुसरीकडे संपूर्ण देशाची लोकसंख्या केवळ ५ लाख ३० हजार इतकी असलेला देश. पण या छोट्या देशाने गतविजेच्या अर्जेंटिनाला कडवी झुंज दिली. या सामन्यात फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला असता, पण ही संधी थोडक्यात हुकली. या सामन्यात दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले. पण मेस्सीहून अधिक चर्चा रंगली, ती २३ वर्षीय खेळाडू सिडनी लोपेस कॅब्रालची. या खेळाडूने असा काही भन्नाट गोल केला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यातील अखेरच्या क्षणी केप व्हर्डेने शेवटी गोल करुन अर्जेंटिनाची बरोबरी केली. हा सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेला होता. एक्स्ट्रा टाईमच्या पहिल्या हाफमध्ये सेट पीस मिळाल्यानंतर अर्जेंटिनाकडून लिसांद्रो मार्टिनेझने भन्नाट गोल केला. त्यावेळी असं वाटलं होतं की, अर्जेंटिनाने या सामन्यावर कब्जा केला आहे. पण सामन्यातील १०३ व्या मिनिटाला सिडनी लोपेस कॅब्रालने डाव्या विंगवरून चेंडूचा ताबा मिळवला, अर्जेंटिनाच्या डिफेंडरला चकवले आणि पेनल्टी बॉक्सच्या कडेवरून एक अप्रतिम ‘कर्लिंग शॉट’ मारत गोल केला. या गोलला ‘गोल ऑफ द टूर्नामेंट’ असंही म्हटलं जात आहे.
कोण आहे सिडनी लोपेस कॅब्राल?
सध्या केप व्हर्डे संघाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या सिडनी लोपेस कॅब्रालचा जन्म १८ सप्टेंबर २००२ ला नेदरलँड्समधील रॉटरडॅम येथे झाला. सिडनी लोपेस कॅब्रालनेचा जन्म नेदरलँड्समध्ये झाला असला, तरीदेखील त्याचे वडिल हे केप व्हर्डेचे आहेत. त्यामुळे त्याने मातृभूमीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळण्याचा निर्णय घेतला. तो पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब बेनफिका संघाकडून खेळत होता. या संघाकडून खेळताना त्याने रिअल माद्रिद संघाकडून खेळताना त्याने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत पदार्पण केलं होतं. तो प्रामुख्याने डिफेंडर म्हणून खेळतो. परंतु तो विंगर म्हणूनही आक्रमक भूमिका बजावू शकतो.
अर्जेंटिनाचा दमदार विजय
या सामन्यात दोन्ही संघांमध्ये थरारक सामना पाहायला मिळाला. दिग्गज खेळाडू मेस्सीने पहिला गोल केला आणि अर्जेंटिनाचं खातं उघडून दिलं. त्यानंतर केप व्हर्डे संघानेही दमदार पुनरागमन केलं. ५९ व्या मिनिटाला डेरॉय डुआर्टेने गोल केला आणि सामना १-१ ने बरोबरीत आणला. त्यामुळे सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेला. ९३ व्या मिनिटाला अर्जेंटिनाकडून मार्टिनेजने गोल केला आणि अर्जेंटिनाला २-१ ने आघाडी मिळवून दिली. केप व्हर्डे संघानेही गोल करून स्कोअर २-२ ने बरोबरीत आणला.शेवटी अर्जेंटिनाकडून रोमेरेने निर्णायक गोल केला आणि अर्जेंटिनाला ३-२ ने आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि सामना खिशात घातला.
