इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्स सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस एटकिन्सन यांच्या नाईट क्लबमधील वादाची सध्या जोरदार चर्चा आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना इंग्लंडने जिंकल्याचा आनंद साजरा करत असताना स्टोक्सचा रग्बी खेळाडूबरोबर वाद झाला होता. पण हा खेळाडू कोण होता, जाणून घेऊया.
इंग्लंडचा क्रिकेट कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सन यांच्यात एका नाईटक्लबमध्ये झालेल्या वादाने क्रीडाविश्वात खळबळ उडवून दिली आहे. या घटनेशी संबंधित ज्या रग्बी खेळाडूची ओळख पटली आहे, तो काही सामान्य खेळाडू नाही; तो आहे टोटोआ औवा (Totoa Auva), ज्याची उंची ६ फूट ५ इंच आणि वजन सुमारे १२५ किलो आहे. त्याच्या ओळखीमुळे या प्रकरणाभोवतीची चर्चा अधिकच तीव्र झाली आहे.
‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, ही घटना ८ जूनच्या पहाटे लंडनच्या चेल्सी येथील ‘रेक्स रूम्स’ (Rex Rooms) या नाईटक्लबमध्ये घडली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील विजयानंतर बेन स्टोक्स आणि गस ॲटकिन्सन हे क्लबच्या व्हीआयपी (VIP) भागात होते, अशी माहिती समोर आली. यावेळी, ‘सारासेन्स रग्बी क्लब’च्या काही खेळाडूंसोबत ज्यामध्ये टोटोआ औवा (Totoa Auva) यांचाही समावेश होता आणि नंतर वाद विकोपाला गेला.
असा आरोप आहे की, ऑवाने गस ॲटकिन्सनला मुक्का मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चुकून इंग्लंड संघाच्या सुरक्षा रक्षकालाच तो मुक्का लागला. या झटापटीत सुरक्षा रक्षक जखमी झाला आणि त्याला टाके पडले. या घटनेनंतर, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
कोण आहे बेन स्टोक्सशी वाद घालणारा टोटोआ औवा?
२१ वर्षीय टोटोआ औवा (Totoa Auva’a) हा ‘सारासेन्स’ (Saracens) संघातील सर्वात प्रतिभावान युवा खेळाडूंपैकी एक मानला जातो. समोआ वंशाचा असलेल्या औवाने आपल्या ताकदीच्या आणि धिप्पाड शरीरयष्टीच्या जोरावर रग्बीच्या विश्वात वेगाने स्वतःची ओळख निर्माण केली होती. गेल्या हंगामात, त्याने इंग्लंडमधील दुसऱ्या श्रेणीतील ‘अँप्टहिल’ (Ampthill) संघासाठी ‘लोन’वर खेळताना १७ सामने खेळले होते. त्याने समोआच्या ‘अंडर-२०’ आणि समोआ ‘ए’ (Samoa ‘A’) संघांचे नेतृत्वही केले आहे. मात्र, या वादामुळे त्याच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘सारासेन्स’ संघही या परिस्थितीची बारकाईने चौकशी करत आहे.
एका निवेदनात इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे की, संघाच्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याप्रकरणी चौकशी केली जात आहे. ज्या नाईटक्लबमध्ये ही घटना घडली, तिथे ८ जूनच्या सकाळी स्टोक्स आणि ॲटकिन्सन उपस्थित होते, याला क्रिकेट मंडळाने दुजोरा दिला आहे. सध्या तरी, १७ जूनपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला हे दोन्ही खेळाडू मुकण्याची शक्यता आहे. दरम्यान, बेन स्टोक्सच्या कर्णधारपदाबाबतही अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. तर तो निवृत्तीदेखील घेऊ शकतो असंही म्हटलं आहे.
