राजस्थान रॉयल्सने अखेरच्या षटकात गुजरात टायटन्स संघावर थरारक विजय मिळवला. अखेरच्या षटकात मराठमोळा गोलंदाज तुषार देशपांडेने राजस्थानचा विजय निश्चित केला. गुजरातला अखेरच्या षटकात ६ चेंडूत ११ धावांची गरज होती. वाईड बॉलने सुरूवात केल्यानंतर एकापेक्षा एक उत्कृष्ट यॉर्कर टाकत त्याने राजस्थानचा विजय पक्का केला. तुषार देशपांडेची क्रिकेट कारकिर्द आतापर्यंत कशी होती, जाणून घेऊया.

राजस्थान रॉयल्सच्या संघात अखेरचं षटक टाकण्यासाठी अनुभवी नांद्रे बर्गर व संदीप शर्मासारखे गोलंदाज होते. पण कर्णधार रियान परागने मात्र तुषार देशपांडेला जबाबदारी दिली. तुषारला अखेरचं षटक दिल्याचं पाहता कॉमेंट्रीमध्येही बर्गरला अखेरचं षटक द्यायला हवं होतं, अशी चर्चा सुरू होती. पण तुषारच्या गोलंदाजीने सर्वांना चकित केलं. तुषारने एकापेक्षा एक कमालीचे यॉर्कर फेकत गुजरातच्या फलंदाजांना धावा करण्याची संधी दिली नाही. दरम्यान त्याने राशीद खानच्या रूपात एक विकेट मिळवत दोन डॉट बॉलही टाकले.

गुजरातच्या तोंडून विजयाचा घास हिसकावणारा तुषार देशपांडे आहे तरी कोण?

मराठमोळा तुषार देशपांडे हा मिडियम पेसर आहे. तुषार देशपांडे मूळचा कल्याणचा आहे. तुषार चेंडू स्विंग करण्यासाठी ओळखला जातो. त्याचबरोबर वेगवान चेंडू टाकणं, त्याशिवाय ऑफ कटर व यॉर्करसारख्या प्रभावी गोलंदाजीतील विविधतेसाठी ओळखला जातो. याशिवाय तो पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.

तुषारने दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना आयपीएल पदार्पण केलं. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळण्याचा मोलाचा अनुभव तुषारला मिळाला. अखेरच्या षटकांमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचं कसब तुषारकडे आहे. २०२५ मध्ये झालेल्या लिलावात तुषारचं नाव येताच चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. २९ वर्षीय तुषारची बेस प्राईज १ कोटी रुपये होती. राजस्थान रॉयल्सने तुषारसाठी तब्बल ६.५० कोटी रुपये खर्चून त्याला ताफ्यात समाविष्ट केलं.

राजस्थानने तुषारला संघात घेण्यासाठी तिजोरी उघडली आणि आता मोक्याच्या क्षणी संघासाठी मॅचविनिंग षटक टाकलं. तुषार देशपांडे मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाचा गोलंदाज आहे. तुशार देशपांडेने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मुंबईसाठी ९७ विकेट्स घेतल्या आहेत. तुषार देशपांडेने जुलै २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. २०२३ च्या आयपीएलमध्ये सीएसकेला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.