Who is Urvil Patel: चेपॉकच्या मैदानावर उर्विल पटेल नावाचं वादळ आज पाहायला मिळालं. उर्विलने अवघ्या १३ चेंडूत वादळी अर्धशतक झळकावलं आणि चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. यशस्वी जैस्वालच्या आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतकाच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली आहे. वादळी खेळी करत संघाच्या महत्त्वाच्या सामन्यातील विजयात मोठी भूमिका बजावणारा हा उर्विल पटेल आहे तरी कोण, जाणून घेऊया.
चौथ्या षटकात उर्विल पटेल फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा लखनौ सुपर जायंट्सने नक्कीच सुटकेचा निश्वास सोडला असावा. २०३ धावांचे लक्ष्य बचावण्यासाठी उतरलेल्या लखनौला सुरुवातीलाच संजू सॅमसनची विकेट मिळाली होती. या हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या कामगिरीत सातत्य दिसले नसले, तरी संघ मोठ्या प्रमाणात सॅमसनवर अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अत्यंत महत्त्वाच्या अशा करो किंवा मरो सामन्यात चेन्नईला २०१८ च्या अंतिम सामन्यानंतर प्रथमच २०० पेक्षा मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करायचा होता. त्यामुळे पॉवरप्लेमध्ये आक्रमक सुरुवात करणं अत्यंत गरजेचं होतं. अशा वेळी चेन्नईला हवी असलेली आक्रमक फलंदाजी उर्विल पटेलने केली. हंगामाच्या सुरुवातीपासून संधीची वाट पाहणाऱ्या या यष्टीरक्षक-फलंदाजाला याआधी मिळालेल्या संधींचा पूर्ण फायदा घेता आला नव्हता, पण या निर्णायक सामन्यात त्याने दमदार खेळी करत संघाला जोरदार सुरुवात करून दिली. उर्विलने या सामन्यात १३ चेंडूत अर्धशतक केल्यानंतर २३ चेंडूत ८ षटकार व २ चौकारांसह ६५ धावांची खेळी केली.
आयपीएलमधील वेगवान अर्धशतकाची बरोबरी करणारा कोण आहे उर्विल पटेल?
उर्विल पटेल हा गुजरातमधील पालनपूर येथील आहे. हिरे व्यवसायासाठी ओळखल्या जाणाऱ्या या शहरातून आलेल्या उर्विलच्या नावावर भारतीय क्रिकेटमधील सर्वात जलद टी-२० शतकाचा विक्रम आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने अवघ्या २८ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते, जो जागतिक क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगवान टी-२० शतकाचा विक्रम मानला जातो. याशिवाय विजय हजारे ट्रॉफीतही त्याने फक्त ४१ चेंडूंमध्ये शतक ठोकलं आहे. त्यामुळे आक्रमक फलंदाजी हीच त्याची खरी ओळख बनली आहे.
यापूर्वी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना उर्विल म्हणाला होता, “माझा खेळ पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटसाठी अधिक योग्य आहे. आक्रमक क्रिकेट खेळणं माझ्यासाठी नैसर्गिक आहे. सलामीला खेळताना मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळते. फलंदाज म्हणून आपल्या विकेटला जास्त किंमत न देता धाडसी आणि जोखमीचं क्रिकेट खेळायला हवं. त्यामुळे माझा खेळ अधिक खुलतो. माझा नेहमीच आक्रमण करण्याचा प्रयत्न असतो.”
मागील हंगामात दमदार कामगिरी करूनही मोठ्या लिलावात कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नव्हती. मात्र चेन्नई सुपर किंग्जने त्याला रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून संघात घेतले आणि त्यानंतर उर्विलने मागे वळून पाहिलेलंच नाही.
