FIFA WC 2026 Who is Vozinha Cape Verde’s Goalkeeper: फिफा विश्वचषक २०२६ च्या एच गटातील सलामीच्या सामन्यात फुटबॉलच्या इतिहासातील एक सर्वात मोठा आणि धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. या भव्य मंचावर पदार्पण करणाऱ्या केप व्हर्डे संघाने, विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आणि युरो २०२४ चा विजेता असलेल्या स्पेनला ०-० अशा बरोबरीवर रोखून नवा इतिहास लिहिला. या निकालामुळे, या छोट्या आफ्रिकन देशाने विश्वचषकाच्या इतिहासात आपला पहिलावहिला गुण मिळवला. केप व्हर्डेच्या या ऐतिहासिक कामगिरीचं श्रेय ४० वर्षीय गोलकिपर व्होझिन्याला जातं. पण हा व्होझिन्या नेमका कोण आहे, जाणून घेऊया.
सोमवारपर्यंत व्होझिन्या हा मुख्यतः केप व्हर्डे आणि पोर्तुगीज क्लब फुटबॉलचे चाहते यांच्यापुरताच परिचित होता. मात्र विश्वचषकात स्पेनसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध केप व्हर्डेने केलेल्या ऐतिहासिक ०-० बरोबरीनंतर तो जगभर चर्चेचा विषय ठरला. स्पेनविरुद्धच्या सामन्यात व्होझिन्याने सात अप्रतिम बचाव करत प्रतिस्पर्ध्यांना गोलपासून रोखलं. त्याच्या या भक्कम कामगिरीमुळे सोशल मीडियावर त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली आणि ४० वर्षीय गोलरक्षक विश्वचषकातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक ठरला.
स्पेनविरुद्धच्या ऐतिहासिक निकालामागील हा नायक नेमका कोण आहे आणि एका सामन्याने त्याला जागतिक फुटबॉलच्या चर्चेच्या केंद्रस्थानी कसं आणलं, याबद्दल आता जगभरातील फुटबॉलप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या एका सामन्यानंतर व्होझिन्याचे फॉलोअर्स ५० हजाराहून ५ मिलियनवर पोहोचले आहेत.
कोण आहे व्होझिन्या?
केप व्हर्डेतील मिंडेलो येथे जन्मलेल्या व्होझिन्याचे खरे नाव जोसिमार जोसे एव्होरा डायस आहे. मात्र विश्वचषकापर्यंतचा त्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. केप व्हर्डे, मोल्डोव्हा, रोमानिया, सायप्रस आणि पोर्तुगालमधील विविध क्लब्ससाठी खेळत त्यांनी आपली कारकीर्द घडवली. जगातील मोठ्या फुटबॉल स्टार्सप्रमाणे त्याला कधीही प्रकाशझोतात राहण्याची संधी मिळाली नाही. तरीही राष्ट्रीय संघासाठी व्होझिन्या कायम विश्वासार्ह खेळाडू म्हणून ओळखला गेला.
सध्या पोर्तुगालमधील G.D. Chaves क्लबकडून खेळणाऱ्या व्होझिन्याकडे जवळपास १५ वर्षांचा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. २०१२ पासून केप व्हर्डेचे प्रतिनिधित्व करूनही त्याला यापूर्वी फुटबॉलच्या सर्वात मोठ्या मंचावर खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र स्पेनविरुद्धचा सामना त्यांच्या आयुष्यातील तो क्षण अखेर आला.
ग्रुप एचमधील या सामन्यात स्पेनने बॉलवर नियंत्रण राखत वर्चस्व गाजवलं आणि अनेक संधी निर्माण केल्या. तरीही त्यांना गोल करता आला नाही. पहिल्या सत्राच्या अखेरीस फेरन टोरेस याचा जवळून मारलेला फटका क्रॉसबारला लागला. त्यानंतर मिळालेल्या रिबाऊंडवर मायकल ओयारझाबालने केलेला हेडर व्होझिन्याने अप्रतिम झेप घेत बारच्या वर ढकलला. दुसऱ्या सत्रातही स्पेनचा दबाव कायम राहिला. फेरान टोरेसला पुन्हा एकदा यश मिळालं नाही, तर एमरिक लापोर्ट यालाही या अनुभवी गोलरक्षकाला भेदून गोल करता आला नाही.
स्पेनने विजयासाठी सर्व प्रयत्न केले. अगदी युवा सुपरस्टार लामिने यामल यालाही मैदानात उतरवण्यात आलं, पण व्होझिन्याच्या भक्कम बचावासमोर स्पेनला अखेरपर्यंत एकही गोल करता आला नाही. अखेरीस ०-० अशा बरोबरीत सामना सोडवत केप व्हर्डेने ऐतिहासिक निकाल नोंदवला आणि व्होझिन्या एका रात्रीत जागतिक फुटबॉलमधील चर्चेचा विषय बनला. सामना संपेपर्यंत व्होझिन्याने सात गोल बचाव (saves) केले होते आणि स्पर्धेतील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरींपैकी एक कामगिरी नोंदवली.
व्होझिन्याचं वयाच्या ४०व्या वर्षी पदार्पण
स्पेनविरुद्धची ही बरोबरी केवळ केप व्हर्डेसाठी ऐतिहासिक ठरली नाही, तर त्यांच्या कर्णधार आणि गोलरक्षक व्होझिन्या याच्यासाठीही आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. वयाच्या ४०व्या वर्षी व्होझिन्याने विश्वचषकात पदार्पण करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला. विश्वचषकात पदार्पण करणारा तो इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरला. त्याच्यापेक्षा अधिक वयात पदार्पण करण्याचा विक्रम केवळ एस्साम अल-हदारी याच्या नावावर आहे. इजिप्तच्या या गोलरक्षकाने २०१८ च्या विश्वचषकात ४५व्या वर्षी खेळण्याचा मान मिळवला होता.
