Who Is Yuvraj Samra: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील ३१ वा सामना कॅनडा आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना कॅनडासाठी फार महत्वाचा नाही. कारण कॅनडाचा संघ सुपर८ फेरीतून बाहेर पडला आहे. पण न्यूझीलंडला जर सुपर ८ मध्ये प्रवेश करायचा असेल, तर हा सामना जिंकणं गरजेचं असणार आहे. पण या सामन्यात कॅनडाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेला युवराज सामरा न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर खंबीरपणे उभा राहिला. युवराजने ६५ चेंडूंचा सामना करत ११ चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने ११० धावांची खेळी केली. दरम्यान युवराज सामरा आहे तरी कोण? जाणून घ्या.
कॅनडाकडून शतकी खेळी करताच युवराज सामराने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. युवराजने ५८ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं शतक आहे. यासह त्याच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. युवराज सामरा हा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत कॅनडाकडून शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. या खेळीच्या बळावर कॅनडाने २० षटकांअखेर ४ गडी बाद १७३ धावांचा डोंगर उभारला.
युवराज सिंगच्या नावावरुन ठेवलं नाव
युवराज सामराचं नाव भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. युवराज सामराचे वडील बलजित सामरा यांना देखील क्रिकेटची प्रचंड आवड आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचं नाव हे युवराज सिंगच्या नावावरून ठेवलं आहे. मजेशीर गोष्ट अशी की, युवराज ज्यावेळी लहान होता, त्यावेळी त्याचे वडील त्याला न सांगता क्रिकेट खेळण्यासाठी निघून जायचे. त्यावेळी युवराज त्यांचा पाठलाग करत मैदानावर पोहोचायचा. इथूनच त्याच्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरूवात झाली.
युवराज सामरा कोण आहे?
युवराज सामराचा जन्म २९ सप्टेंबर २००६ मध्ये कॅनडा येथे झाला. युवराज टॉप ऑर्डरचा फलंदाज असून आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. कमी वयात त्याने अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. त्याने बहामासविरूद्ध खेळताना अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. हा विक्रम कॅनडाच्या कुठल्याही फलंदाजाला मोडता आलेला नाही. त्यानंतर हाँगकाँगविरूद्ध फलंदाजी करताना त्याने वनडे क्रिकेटमध्ये दमदार शतकी खेळी केली होती. आता तो टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत शतकी खेळी करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे.
टी-२० वर्ल्डकपमध्ये शतकी खेळी करणारे युवा फलंदाज
१९ वर्षे १४१ दिवस – युवराज सामरा, कॅनडा विरुद्ध न्यूझीलंड, चेन्नई, २०२६*
२२ वर्षे १२७ दिवस – अहमद शहजाद, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, मिरपूर, २०१४
२३ वर्षे १५६ दिवस – सुरेश रैना, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रोस आयलेट, २०१०
२५ वर्षे ८३ दिवस – अॅलेक्स हेल्स, इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, चॅटोग्राम, २०१४
२५ वर्षे ३२७ दिवस – ग्लेन फिलिप्स, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, सिडनी, २०२२

