दक्षिण आफ्रिकेत २००७ साली पार पडलेला पहिला टी-२० विश्वचषक सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे. अंतिम सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानवर मात करत विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला दोन वेळा पराभवाची चव चाखायला भाग पाडलं. महत्वाची गोष्ट म्हणजे सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या ३ दिग्गज खेळाडूंशिवाय भारतीय संघ मैदानात उतरला होता, त्यामुळे भारतीय संघाचं हे यश खास मानलं जातं. भारतीय संघाचे तत्कालीन मॅनेजर लालचंद राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि सौरवला या स्पर्धेत सहभागी व्हायचं होतं. परंतू राहुल द्रविडने या स्पर्धेत तरुणांना संधी देऊया असं म्हणत विश्वचषकात न सहभागी होण्याचा सल्ला दिला.

“अनेकांचा असा समज आहे की तरुण खेळाडूंना संधी मिळावी म्हणून राहुल, सचिन आणि सौरव हे तीन खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले नाहीत. पण प्रत्यक्षात सचिन आणि सौरवला या स्पर्धेत खेळायचं होतं. त्यावेळी कर्णधारपद सांभाळणाऱ्या राहुल द्रविडने दोन्ही खेळाडूंना या स्पर्धेत न खेळण्याचा सल्ला दिला होता. म्हणून सचिन आणि सौरव या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे राहुल इंग्लंड दौऱ्यावर कर्णधार होता. काही खेळाडू इंग्लंड दौरा खेळून थेट दक्षिण आफ्रिकेत दाखल झाले होते. आपण इतकी वर्ष खेळूनही विश्वचषक जिंकवू न शकल्यामुळे सचिनला या स्पर्धेत सहभागी व्हायचं होतं, पण द्रविडने सचिन आणि सौरवशी चर्चा करुन त्यांना ही स्पर्धा न खेळण्याचा सल्ला दिला होता.” लालचंद राजपूत Sportskeeda संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राजपूत यांनी धोनीच्या नेतृत्व कौशल्याचंही कौतुक केलं. “कर्णधार म्हणून तो सर्वांच्या पुढे जाऊन विचार करायचा, तो नेहमी दोन पावलं पुढे असायचा. अनेक अडचणीच्या प्रसंगात मी त्याला शांत राहून निर्णय घेताना अनुभवलं आहे. कर्णधार म्हणून धोनीमध्ये सौरव आणि द्रविडसारखे गूण आहेत. त्याचा खेळ आक्रमक असला तरीही कर्णधार म्हणून तो नेहमी शांत डोक्यानेच निर्णय घेतो.” विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जोगिंदर सिंहला शेवटचं षटक टाकायला देण्याचा निर्णय हा एकाप्रकारे धोनीने खेळलेला जुगारच होता, परंतू जोगिंदरनेही मिसबाहला आपल्या जाळ्यात अडकवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं.