देवेंद्र पांडे, इंडियन एक्सप्रेस
बांगलादेशचा क्रिकेटपटू मुस्ताफिझूर रहमानला आयपीएलमधील केकेआर संघातून रिलीज करण्यात आलं आहे. बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुस्ताफिझूरला संघातून रिलीज करण्याचे निर्देश दिले. बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्थिरता निर्माण झाली असून तेथील अल्पसंख्याकांवर आणि विशेषतः हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. यामुळे बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रहमानच्या आयपीएलमध्ये खेळण्यास काही राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांनी विरोध केल्यानंतर त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय नेमका कोणी घेतला, जाणून घेऊया.
आयपीएलमधील फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सला बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला रिलीज करण्याचे निर्देश देण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सदस्यांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हा निर्णय बोर्डाच्या सर्वोच्च पातळीवर घेण्यात आला. त्यानंतर, बांगलादेशने पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार दिला.
आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, “आम्हाला माध्यमांद्वारे याबद्दल माहिती मिळाली. आमच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. आमच्यात या विषयाबाबत कोणतीही सल्लामसलत झाली नाही.” यासंबंधित विषयावर बोर्डाची बैठक बोलावण्यात आली होती का किंवा मुस्तफिजूरबाबतच्या निर्णयाबद्दल आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलला माहिती देण्यात आली होती का, इंडियन एक्सप्रेसने विचारलेल्या या प्रश्नांचे उत्तर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिले नव्हते.
शनिवारी (३ जानेवारी) या मुद्द्यावर बोर्डाची भूमिका स्पष्ट करताना सैकिया म्हणाले होते की, “अलीकडील घटना लक्षात घेता, बीसीसीआयने केकेआर फ्रँचायझीला त्यांच्या संघातून बांगलादेशच्या मुस्ताफिझूर रहमानला सोडण्याचे निर्देश दिले आहेत. बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोमवारी (५ जानेवारी) देशात आयपीएल सामन्यांच्या प्रसारणावर बंदी घातली, कारण मुस्ताफिझूरला सोडण्याच्या निर्णयामुळे बांगलादेशी नागरिकांना वाईट वाटलं असून त्यांनी संताप देखील व्यक्त केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून, दोन्ही देशांमधील राजकीय तणाव क्रिकेटमध्येही पसरला आहे. यापूर्वी, बांगलादेश महिला संघाचा भारत दौरा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला होता आणि ऑगस्टमध्ये होणाऱ्या भारतीय पुरुष संघाच्या बांगलादेश दौरा होणार की नाही याबाबतही शंका आहे.
ईशनिंदेच्या आरोपाखाली बांगलादेशात एका हिंदू व्यक्तीला मारहाण करून जाळण्यात आल्यानंतर अलिकडच्या आठवड्यात द्विपक्षीय तणाव वाढला आहे. गेल्या महिन्यात, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा निषेध केला. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांनी लिंचिंगचा निषेध केला आणि म्हटलं की नवीन बांगलादेशमध्ये अशा हिंसाचाराला स्थान नाही.
