Head Coach Of Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वात या संघाने ५ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. पण धोनीने कर्णधारपदावरुन माघार घेतल्यानंतर या संघाला जेतेपदाची एकही ट्रॉफी उंचावता आलेली नाही. दरम्यान आयपीएल २०२७ स्पर्धेआधी चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील जुने आणि अनुभवी मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी मुख्य प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. स्टिफन फ्लेमिंगची जागा कोण घेणार? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मायकल हसी किंवा इओन मॉर्गन त्याची जागा घेऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे. पण चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने वेगळा सल्ला देत, एका स्टार खेळाडूचं नाव सुचवलं आहे.
स्पोर्टस्टारला दिलेल्या मुलाखतीत बोलताना, मॅथ्यू हेडनला चेन्नई सुपर किंग्सचा पुढील मुख्य प्रशिक्षक कोण व्हावा? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना, मॅथ्यू हेडन म्हणाला की, “मुख्य प्रशिक्षकासाठी काही नावांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यापैकी दिनेश कार्तिक एक होता. माझ्या मते, दिनेश कार्तिक ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आता पूर्णपणे तयार आहे. मला तरी हेच वाटतं की, स्थानिक मुख्य प्रशिक्षक असणं गरजेचं आहे. कुठल्याही फ्रँचायझीला परदेशी प्रशिक्षक हवा असतो. पण सीएसकेने असं करु नये. मला वाटतं त्याने चेन्नईसाठी योगदान द्यायला हवं. त्यासाठी कार्तिक योग्य पर्याय आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला खात्री आहे की, चेन्नई सुपर किंग्स टीम मॅनेजनेंट विचार करुन योग्य निर्णय घेईल. फ्लेमिंगने धोनीसोबत मिळून जबरदस्त कामगिरी केली होती. दोघांनी मिळून मजबूत संघबांधणी केली होती. मला माहीत आहे की, बहुतांशवेळा स्थानिक प्रशिक्षकाची निवड केली जात नाही. पण सीएसकेने हा बदल करायला हवा. फ्लेमिंगने धोनीसोबत मिळून अनेकदा चेन्नईला चॅम्पियन बनवलं आहे. आता चेन्नईचा पुढील मुख्य प्रशिक्षक कोण होणार, हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी काही नावं चर्चेत आहेत,त्यापैकी मायकल हसी हे सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव आहे. मायकल हसीकडे चेन्नईकडून खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. याबाबत बोलताना भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवडकर्ते के.श्रीकांत म्हणाले की, “सीएसकेकडे जर मिस्टर ३६० आहे, तर त्यांनी इतरांकडे जाण्याची गरज काय? मायकल हसीला मुख्य प्रशिक्षक बनवायला हवं. तो सर्वोत्तम पर्याय ठरेल. इथून पुढे एमएस धोनीची भूमिका काय असेल, यावरही काही गोष्टी अवलंबून असतील.”
