Team India T20I Captain: भारतीय संघाने काही महिन्यांपूर्वी भारतात झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. ही स्पर्धा झाल्यानंतर बीसीसीआयने सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन काढून, टी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवली. पण श्रेयसला कर्णधार म्हणून आपली छाप सोडता आलेली नाही. आधी आयर्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला. तर इंग्लंडविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ३-० ने पिछाडीवर आहे. श्रेयसला कर्णधार म्हणून ६ पैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. ही कामगिरी अशीच सुरु राहिली, तर श्रेयसचा कर्णधारपदावरुन पत्ता कट होऊ शकतो. दरम्यान श्रेयसला कर्णधारपदावरुन काढलं, तर कोण होणार भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार? जाणून घ्या.

सूर्यकुमार यादव- सूर्यकुमार यादव फलंदाज म्हणून फ्लॉप ठरला, पण कर्णधार म्हणून त्याने दमदार कामगिरी केली होती. सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेची ट्रॉफी उंचावली. श्रेयस अय्यरला जर कर्णधारपदावरुन काढलं, तर सूर्युकमार यादव पुन्हा एकदा भारताचा कर्णधार बनू शकतो.

हार्दिक पंड्या- हार्दिक पंड्या भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. पण सध्या तो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. सूर्यकुमार यादवआधी हार्दिक संघाचा कर्णधार होता. त्यामुळ तो जर परतला, तर कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा हार्दिककडे सोपवली जाऊ शकते.

शुबमन गिल- शुबमन गिल हा भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार आहे. तो टी-२० संघातील प्रमुख सदस्य होता. पण टी-२० वर्ल्डकपआधी त्याला संघाबाहेर करण्यात आलं होतं. पण कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे.

इशान किशन- इशान किशन सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नंबर १ फलंदाज आहे. इशान किशनकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. त्याच्या नेतृ्त्वात सनरायझर्स हैदराबादने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे इशान किशन देखील कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे.

तिलक वर्मा – भारताचा युवा फलंदाज तिलक वर्मा सध्या फलंदाजीत फ्लॉप ठरतोय. पण श्रेयसला जेव्हा कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली होती, त्यावेळी उपकर्णधार म्हणून तिलक वर्माची निवड केली गेली होती. त्यामुळे टीम मॅनेजमेंट त्याच्याकडे भावी कर्णधार म्हणून पाहत आहे. जर श्रेयसचं कर्णधारपद काढून घेतलं, तर तिलक वर्मा देखील कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार असेल.