Who Will Replace Rinku Singh: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सुरु असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडू रिंकू सिंग वैयक्तिक कारणास्तव घरी परतला आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या महत्वाच्या सामन्यात प्लेईंग ११ मध्ये कोणाला खेळवायचं? असा प्रश्न भारतीय संघासमोर असणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात होणारा सामना २६ फेब्रुवारीला चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रिंकू सिंग अजूनही संघासोबत जोडला गेलेला नाही. त्यामुळे रिंकू सिंगच्या जागी कोणाला संधी मिळू शकते? जाणून घ्या.
रिंकू सिंग संघाची साथ सोडून जाण्याआधी तिलक वर्माला संघाबाहेर करुन संजू सॅमसनला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण आता प्लेईंग ११ मध्ये फार बदल केले जाण्याची शक्यता कमी आहे. रिंकू सिंग बाहेर झाल्यामुळे त्याच्या जागी संजू सॅमसनला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.
भारतीय संघातील खेळाडू सध्या चेन्नईत असून झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी सराव करत आहेत. रिंकू सिंग वैयक्तिक कारणास्तव घरी परतला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, रिंकूचे वडील सतेज ४ लिव्हर कॅन्सरशी झुंज देत असून, ते सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, घरातील आपत्कालीन परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रिंकू केव्हा परतणार? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
संजू सॅमसनला टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत दुसरा सामना खेळण्याची संधी मिळू शकते. याआधी अभिषेक शर्माच्या अनुपस्थितीत त्याला एक सामना खेळण्याची संधी मिळाली होती. पण या सामन्यातही त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. या सामन्यात त्याने ८ चेंडूत २२ धावा केल्या. आधी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत सलामीवीर फलंदाज म्हणून संजू सॅमसनला संधी मिळणार होती. पण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्यामुळे इशान किशनची सलामीवीर फलंदाज म्हणून संधी देण्यात आली होती.

