CSK Players Wearing Black Armbands IPL 2026: आयपीएलमधील एल क्लासिको सामन्याला वानखेडेच्या मैदानावर सुरूवात झाली आहे. दोन्ही चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. मुंबईने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर चेन्नईने फलंदाजीने सामन्याला सुरूवात केली आहे. पण यादरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा संघ हातावर काळी पट्टी बांधून का उतरला आहे, जाणून घेऊया.

चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंनी गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात काळ्या पट्ट्या (ब्लॅक आर्मबँड) घालून मैदानावर उतरले आहेत. सीएसकेचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी याच्या आईचं मंगळवारी दीर्घ आजारानंतर निधन झाल्यामुळे हा शोक व्यक्त करण्यात आला.

चेन्नईने या खेळाडूच्या आईचं निधन, संघाने अशी दिली श्रध्दांजली

“मुकेश चौधरी याच्या आईच्या निधनामुळे सीएसके कुटुंब शोक व्यक्त करत आहे. या कठीण काळात आम्ही मुकेश आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. आमच्या भावना आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत,” असं फ्रँचायझीने गुरुवारी सकाळी सांगितलं.

सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक गमावल्याने संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. मुंबई इंडियन्सने मागील सामन्यातीलच संघ कायम ठेवला, म्हणजेच रोहित शर्मा सलग तिसऱ्या सामन्यातही खेळताना दिसणार नाही. तो हॅमस्ट्रिंग दुखापतीनंतर सध्या फिटनेस परत मिळवत आहे. दरम्यान, एमएस धोनी अजूनही पोटरीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही आणि या हंगामातील त्याचा पहिला सामना खेळण्याची प्रतिक्षा दिवसागणिक वाढत चालली आहे.

एमएस धोनी अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही आणि त्यामुळे तो या हंगामातील आपला पहिला सामना खेळू शकलेला नाही. ४४ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाजाने सामन्यापूर्वी सीएसके संघासोबत सराव केला असला, तरी तो या महत्त्वाच्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे आयपीएल २०२६ मधील त्याच्या पुनरागमनाला आणखी विलंब झाला आहे. काफ स्ट्रेनमुळे पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) सुरू असल्याने धोनीला सुरुवातीचे दोन आठवडे स्पर्धेबाहेर ठेवण्यात आले होते. मात्र हा कालावधी आता २५ दिवसांपर्यंत वाढला आहे. दरम्यान, सीएसके सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर असून त्यांनी ६ सामन्यांपैकी २ विजय आणि ४ पराभव नोंदवले आहेत.