India vs England players wearing black armbands: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना क्रिकेट पंढरीत लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका १-१ अशी बरोबरीत असताना दोन्ही संघांसाठी हा निर्णायक सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावे करेल. दरम्यान या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत, यामागचं काय कारण आहे, जाणून घेऊया.
लॉर्ड्सवरील या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघाला आपल्या एका प्रमुख स्टार खेळाडूशिवाय मैदानात उतरावं लागलं आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यासाठी गुडघ्याच्या दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. याशिवाय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. बुमराहशिवाय शिवम दुबे व वॉशिंग्टन सुंदर संघाबाहेर झाले असून केएल राहुल, प्रिन्स यादव व अर्शदीप सिंग यांचा संघात समावेश करण्यात आले आहेत.
क्रिकेट विश्वातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू सर गॅरी सोबर्स यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत. याशिवाय, सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही संघांतील खेळाडू आणि उपस्थितांनी एक मिनिट मौन पाळत सर गारफिल्ड सोबर्स यांच्या क्रिकेटमधील अतुलनीय योगदानाला आदरांजली अर्पण केली.
वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू ८९ वर्षीय सर गॅरी सोबर्स यांनी १७ जुलै रोजी अखेरचा श्वास घेतला. सर गॅरी सोबर्स यांचं नाव जगातील महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणलं जातं. सर गॅरी हे वेगवान, फिरकी दोन्ही प्रकारच्या गोलंदाजीत अग्रेसर होते. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विजय मिळवून देण्यात आणि संघासाठी भरीव कामगिरी करण्यात गॅरी सोबर्स यांचं मोठे योगदान आहे.
वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी वेस्ट इंडिजकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सोबर्स यांनी ९३ कसोटी सामने खेळताना २६ शतकांसह ५७.७८ च्या सरासरीने ८,०३२ धावा केल्या. गोलंदाजीत देखील त्यांंनी उत्तम कामगिरी केली. सोबर्स यांनी २३५ बळी घेतले तर, क्षेत्ररक्षणातही उल्लेखनीय कामगिरी करताना १०९ झेल त्यांनी टिपले.
सर गारफिल्ड सोबर्स यांना वाहिलेल्या या भावनिक श्रद्धांजलीमुळे बहुप्रतीक्षित भारत-इंग्लंड सामन्याला एक वेगळंच भावनिक स्वरूप प्राप्त झालं. क्रिकेट इतिहासातील सर्वात महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या सोबर्स यांना मानवंदना देत दोन्ही संघांनी सामन्याची सुरुवात केली.
