why Australia is on the verge of getting knocked out in T20 WC 2026: आयसीसी स्पर्धांची जेतेपदं आणि ऑस्ट्रेलिया यांचं सख्य क्रिकेटविश्वात प्रसिद्ध आहे. एखाद्या विजयरथाप्रमाणे वाटचाल करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ येतो आणि बाकी संघांना निष्प्रभ करत जेतपदावर नाव कोरतो. ऑस्ट्रेलियाच्या नावावर ६ वनडे वर्ल्डकप, टी२० वर्ल्डकपचं एक, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची दोन अशी घाऊक जेतेपदं आहेत.
बाकी यशाच्या तुलनेत टी२० हा प्रकार ऑस्ट्रेलियाला फारसा रुचलेला आणि भावलेला नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ आठही टी२० वर्ल्डकपमध्ये सहभागी झाला आहे. मात्र त्यांना जेतेपद केवळ एकदाच पटकावता आलं आहे. २०२२ मध्ये झालेल्या स्पर्धेत आरोन फिंचच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाच्या संघाने जेतेपदावर कब्जा केला होता. मात्र बाकी खेपेस ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्डकपमध्ये वर्चस्व गाजवतो तसं जराही राखता आलेलं नाही.
बेंचस्ट्रेंथ नाही
ऑस्ट्रेलियात अतिशय शास्त्रोक्त अशी क्रीडा संस्कृती आहे. फक्त क्रिकेटच नव्हे तर प्रत्येक खेळासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, संसाधनं उपलब्ध आहेत. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाकडे नेहमीच प्रतिभावान खेळाडू असतात. दुर्देवाने क्रिकेटच्या बाबतीत तसं म्हणता येत नाही. एकेकाळी ऑस्ट्रेलियाच्या अंतिम अकरात स्थान मिळावं यासाठी अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागत असे. आता अक्षरक्ष: खिरापत वाटावी अशा पद्धतीने पदार्पणाची संधी दिली जाते. २००४ ते २०२६ या कालावधीत ११६ खेळाडूंनी ऑस्ट्रेलियासाठी टी२० पदार्पण केलं. मात्र यापैकी ५०जणांनाही या संघात स्थान पक्कं करता आलेलं नाही. डोमेस्टिक पातळीवर एखाद्या मालिकेत चांगलं प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला घाईघाईने ऑस्ट्रेलियाची कॅप दिली जाते. मात्र तिथे त्याचे कच्चे दुवे उघड होतात. काही सामन्यांनंतर तो खेळाडू गायब होतो. आयपीएलच्या धर्तीवर २०१२ पासून ऑस्ट्रेलियात बिग बॅश स्पर्धा भरवली जाते. प्रचंड पैसा, प्रसिद्धी हे सगळं असतं. मात्र या स्पर्धेने ऑस्ट्रेलियाला एकही खेळाडू दिलेला नाही. आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गुणी खेळाडू भारतीय संघाला लाभले. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या ते अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी अशी अनेक नावं घेता येतील. बिग बॅशच्या बाबतीत असं एकही नाव ठोस घेता येत नाही. टी२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व मिचेल मार्शकडे आहे. मार्श दुखापतग्रस्त झाल्यामुळे दोन लढती खेळू शकला नाही. मार्श दुखापतीतून सावरला नाही तर पर्यायी खेळाडू म्हणून माजी कर्णधार आणि ३६वर्षीय स्टीव्हन स्मिथचा संघात समावेश करण्यात आला. स्मिथ कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. दोन वर्षांपासून तो ऑस्ट्रेलियासाठी टी२० सामना खेळलेला नाही. मात्र तरीही त्याची निवड करण्यात आली. याचं कारण भारत आणि श्रीलंकेतील फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर मोठी खेळी करण्यासाठी आवश्यक तंत्र असलेला फलंदाजच ऑस्ट्रेलियाकडे नाही. म्हणूनच स्टीव्हन स्मिथ, मार्नस लबूशेन या कसोटी विशेषज्ञ खेळाडूंकडे ऑस्ट्रेलियाला वळावं लागत आहे.
अष्टपैलू- एक ना धड भाराभर चिंध्या
फलंदाजी करू शकेल असा गोलंदाज किंवा गोलंदाजी करू शकेल असा फलंदाज अशी अष्टपैलू खेळाडूची व्याख्या आहे. विशेषज्ञ फलंदाज किंवा विशेषज्ञ गोलंदाज म्हणून या खेळाडूला खेळवू शकतो एवढी त्याची ताकद हवी. ऑस्ट्रेलियाकडे भरपूर अष्टपैलू खेळाडू आहेत मात्र ते धड काहीच करत नसल्याचं दिसतं. दशकभराहून अधिक काळ ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाच्या संघात आहे. वादळी खेळी करून एकहाती सामना जिंकून देणारा खेळाडू अशी मॅक्सवेलची ख्याती आहे. उपयुक्त फिरकीपटू आणि अफलातून क्षेत्ररक्षक यासाठीही तो प्रसिद्ध आहे. मात्र सातत्य या मुद्याशी मॅक्सवेलची फारकत आहे. १० सामने घेतले तर त्यापैकी एकात मॅक्सवेल यशस्वी ठरतो. बाकी सामन्यात आत्मघाती फटके मारून बाद होतो. ऑस्ट्रेलियाच्या संघात मॅक्सवेल आहे याची भीती प्रतिस्पर्धी संघाला असते मात्र या वलयाचं गारुड फार काळ टिकत नाही कारण मॅक्सवेल झटपट बाद होऊन तंबूत परततो. हॉलिवूड हिरोला शोभावं अशी शरीरयष्टी आणि रुप मार्कस स्टॉइनसला लाभलं आहे. मात्र स्टॉइनसने सामना जिंकून दिल्याची उदाहरणं एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच आहेत. अनेकदा ना तो धड गोलंदाजी करत, ना फलंदाजी. संघात नेमकी त्याची भूमिका काय हेही स्पष्ट होत नाही. ताकदवान हिटर आहे. स्लोअरवन बॅक ऑफ द हँड, उसळते चेंडू टाकण्यात पटाईत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी त्याची ओळख आहे. पण स्टॉइनसने सामना एकटाकी जिंकून देईल अशी कामगिरी केल्याचं स्मरत नाही. आंतरराष्ट्रीय पटलावर दाखल झाल्यापासून कॅमेरुन ग्रीनचं कौतुक होत आहे. मात्र आल्या दिवसापासून त्याला दुखापतींचं ग्रहण आहे. सगळं करू शकतो पण सूर गवसेल तेव्हा असं ग्रीनबाबत म्हटलं जातं. गेल्या वर्षभरात टीम डेव्हिडने तडाखेबंद फटकेबाजीच्या जोरावर नाव प्रस्थापित केलं आहे. मात्र ऑस्ट्रेलियासाठी खेळताना हे रुप दिसत नाही. प्रत्येक चेंडूवर षटकार किंवा चौकार लगावू शकत नाही. एकेरी,दुहेरी धावा काढूनच इनिंग्ज उभारावी लागते हे या दोघांना पटलेलं दिसत नाही. ताफ्यात उत्तम अष्टपैलू खेळाडू असूनही ऑस्ट्रेलिया पिछाडीवरच आहे.
कर्णधारपदाची संगीतखुर्ची
दोन दशकांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाने टी२० प्रकारात १४ वेगवेगळे कर्णधार नेमले आहेत. एकूणच ऑस्ट्रेलिया या प्रकाराबाबत गंभीर नाही हे यातून दिसतं. टी२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद मिचेल मार्शकडे आहे. मात्र मार्श हा सातत्याने दुखापतग्रस्त होणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. मार्श जेवढं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे त्याच्या चौपट तरी तो खेळू शकलेला नाही. वर्ल्डकपचे सुरुवातीचे दोन सामने तो खेळू शकला नाही. साहजिक ट्रॅव्हिस हेडकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. मुळातच मार्श खेळू शकेल हेच पक्कं नसल्याने दरवेळी संघाचं संतुलन बदलतं, बिघडतं. अनेकदा संघात जो थोडा अनुभवी खेळाडू असतो त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं जातं. वनडे किंवा टेस्टबाबत गंभीरतेनं विचार करणारं ऑस्ट्रेलिया या प्रकाराबाबत स्वैर आहे. जिंकलो तर जिंकलो, नाहीतर नाही असा ऑस्ट्रेलियाचा पवित्रा दिसतो. मैदानावर उतरायचं ते जिंकण्यासाठीच असा त्यांचा खाक्या असतो.वर्ल्डकप स्पर्धेत तर जायचं तर जेतेपद पटकावण्यासाठी अशी त्यांची भूमिका असते. टी२० प्रकाराबाबत ते जराही गंभीर दिसत नाहीत.
पुनरागमनाचा फंडा अयशस्वी
ऑस्ट्रेलियाचा संघ पुनरागमन पद्धतीवर विश्वास ठेवतो. प्रतिस्पर्धी संघाला जेव्हा वाटतं की सामना आता जिंकलाच तिथून ऑस्ट्रेलियाचा संघ पुनरागमन करतो. उलटं येऊन डंख देण्याची त्यांची खासियत आहे. मात्र टी२० प्रकारात पुनरागमनाचं तत्व यशस्वी होताना दिसत नाही. टी२० हा अतिशय वेगवान असा प्रकार आहे. एका षटकात सगळं चित्र बदलतं. पुनरागमनसाठी थोडा वेळ लागतो. तेवढा वेळ टी२० प्रकारात मिळत नाही. ऑस्ट्रेलियाला सतत जिंकायला आवडतं. त्यासाठी ते ठराविक गोष्टी इमानेइतबारे करतात पण टी२० हा अतिशय विचित्र अस्थिर प्रकार आहे. इथे यशस्वी होण्यासाठी ठोस प्रारुप नाही. या प्रकारात सामन्याचं पारडं कधीही कसंही बदलतं. हा बदल ऑस्ट्रेलियाला मानवत नाही.टी२० वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानात झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला ०-३ अशा भीषण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. ऑस्ट्रेलियाची टी२० प्रकारातली एकूण आकडेवारी पाहिली तर तीही समाधानकारक नाही. ऑस्ट्रेलियाने २२२ टी२० सामने खेळले आहेत. यापैकी १२२ मध्ये त्यांनी विजय मिळवला तर ९० मध्ये पराभव झाला आहे.
दुखापतींचा ससेमिरा
दुखापती हा खेळाचा भाग आहे.प्रत्येक संघाला त्याचा फटका बसतो. ती सबब असू शकत नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुखापतींनी ग्रासलं आहे म्हटलं तर वावगं ठरू नये. प्रमुख गोलंदाज आणि टेस्ट कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. त्याचा सहकारी जोश हेझलवूड स्पर्धेच्या उत्तरार्धात खेळू शकेल अशी आशा होती मात्र तीही मावळली. दोन प्रमुख गोलंदाज नसल्याने नव्या दमाच्या गोलंदाजांवर ऑस्ट्रेलियाची भिस्त आहे. टीम डेव्हिड दुखापतीमुळे पहिल्या लढतीत खेळू शकला नाही. ग्लेन मॅक्सवेलही पूर्ण फिट नाही. मिचेल मार्शची गोष्टच वेगळी. कॅमेरुन ग्रीन नुकताच दुखापतीतून सावरला आहे. मात्र तो पूर्ण फिट नसल्याने गोलंदाजी करत नाही. मार्कस स्टॉइनसला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने सतावलं आहे. झिमाब्ब्वेविरुद्ध गोलंदाजी करताना त्याच्या हाताला मार बसला होता. वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी पूर्ण फिट खेळाडूंचा संघच निवडायला हवा होता. मात्र ऑस्ट्रेलियाने तसं केलं नाही याचा फटका त्यांना बसला आहे.

