Bhuvneshwar Kumar Comeback: सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनाची. ४ वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर असलेला भुवनेश्वर कुमार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार की काय? असं म्हटलं जात होतं. पण त्याने माघार घेतली नाही, प्रयत्न सुरू ठेवले. आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चॅम्पियन बनवलं. आता २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्ष सितांशू कोटक यांनी भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी सितांशू कोटक म्हणाले की, संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता असल्याने भुवनेश्वर कुमारला पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. सध्या जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त सामने खेळत नाहीये. वर्कलोडमुळे त्याला बाहेर राहावं लागत आहे. त्यामुळे संघात अनुभवी खेळाडू असायला हवा, ही जागा भरून काढण्यासाठी भुवनेश्वर कुमारला संघात स्थान देण्यात आलं आहे.
कोटक म्हणाले की, “मला काय वाटतं, मी ते सांगतो. इंग्लंडमध्ये मला वैयक्तिकरित्या असं जाणवलं की, बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त सामने खेळत नाहीये. संघात अनेक युवा खेळाडू आहेत. त्यामुळे संघात अनुभवी खेळाडू असणं गरजेचं होतं.” वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत जसप्रीत बुमराह संघात नाही. वेगवान गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंगच्या हाती आहे. तर मयंक यादव आणि प्रिन्स यादव संघात आहेत, ज्यांना फार सामने खेळण्याचा अनुभव नाही.
कोटक यांच्या मते, युवा गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत पण अनुभव देखील तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळेच भुवनेश्वर कुमारला पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. यासह त्यांनी मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “मी निवडकर्ता नाही, त्यामुळे मी त्याच्या पुनरागमनाबाबत काहीच म्हणणार नाही. पण शमी चांगली कामगिरी करतोय. सर निवडकर्त्यांना वाटलं की, तो चांगली कामगिरी करतोय आणि संघात त्याची गरज आहे, तर ते नक्कीच त्याची निवड करतील.
