IPL 2026 Cameron Green Run Out Rule: सनरायझर्स हैदराबादने केकेआरच्या त्यांच्या घरच्या मैदानावर ६५ धावांनी मोठा पराभव केला आहे. यासह हैदराबादने यंदाच्या मोसमात विजयाचं खातं उघडलं आहे. हैदराबादने दिलेल्या २२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने दणक्यात सुरूवात केली, पण सातत्याने गमावलेल्या विकेट्समुळे संघ १६१ धावांवर सर्वबाद झाला. पण या सामन्यात कॅमेरून ग्रीनच्या रनआऊटची चर्चा चांगलीच रंगली आहे. अंगक्रिश रघुवंशीच्या एन्डला त्रिफळा उडवला असला तरी कॅमेरून ग्रीनला कसं धावबाद दिलं, जाणून घेऊया.

सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक विचित्र घटना घडली. सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज इशान मलिंगाने गोलंदाजी एन्डला केकेआरचा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीला धावबाद केलं. अंगक्रिश रघुवंशी नाराज होत मैदानाबाहेर देखील जायला निघाला. मात्र, तितक्यात पंचांनी त्याला नाबाद घोषित केलं आणि फलंदाजी एन्डकडे चालत असलेला कॅमेरून ग्रीनला बाद देताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

तरुण फलंदाज अंगक्रिश रघुवंशीने चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू मलिंगाच्या हातून निसटून त्याच्या बुटाला लागून खेळपट्टीवर परत आला. दरम्यान, दोन्ही फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. पण मलिंगाने चपळाईने चेंडू उचलून त्रिफळा उडवला. त्यावेळी कॅमेरून ग्रीन फलंदाजी एन्डला धावत होता. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ नसल्याने संघाने मोठी विकेट इथे गमावली.

अंगक्रिश रघुवंशी गोलंदाजी एन्डच्या दिशेने धावत असल्याने तोच बाद झाल्याचं सर्वांना वाटलं आणि इशान मलिंगानेही त्याच टोकाला धावबाद केलं होतं. पण जेव्हा पंचांनी तपासलं, तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली: जो फलंदाज प्रत्यक्षात बाद झाला होता तो रघुवंशी नसून त्याचा सहकारी कॅमेरून ग्रीन होता. रनआऊट झालं तेव्हा दोन्ही फलंदाज एकमेकांना क्रॉस झाले नव्हते.

कॅमेरून ग्रीनला का दिलं गेलं रनआऊट?

क्रिकेटच्या नियमांनुसार, धाव घेताना जोपर्यंत फलंदाज एकमेकांना ओलांडत नाहीत, तोपर्यंत ते ज्या टोकाकडून धावले होते, त्याच टोकावर उभे आहेत असं मानलं जातं. परिणामी, कॅमेरून ग्रीनला धावबाद घोषित करण्यात आलं. त्यामुळे कॅमेरून ग्रीन हा गोलंदाजी एन्डवरून धावला होता आणि त्याला पंचांनी धावबाद केलं.

ही घटना आयपीएल २०२६ मधील सर्वात विचित्र रनआऊटपैकी एक ठरली. आपण बाद झालो असे समजून रघुवंशी सीमारेषेकडे गेला, पण नशिबाने साथ दिली आणि ग्रीन धावबाद झाला. पंचांच्या निर्णयाने सर्वजण थक्क झाले आणि कॅमेरून ग्रीनलाही विश्वास बसत नव्हता. मात्र, त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.