Namibia Cricket team T20 WC 2026: टी२० वर्ल्डकपमध्ये नामिबियाचा संघ सहभागी होतो आहे. नामिबियाच्या संघाचे प्रमुख प्रायोजकत्व ई कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य भारतीत कंपनी फ्लिपकार्टकडे आहे. एका भारतीय कंपनीने विदेशी संघाला प्रायोजित केल्याने अनेकांनी टीका केली. काहींनी हा व्यावसायिक निर्णय असल्याचं म्हटलं आहे. नामिबियात फ्लिपकार्ट आहे तरी का? असा सवाल टीका करणाऱ्यांनी केला आहे. सोशल मीडियावर या प्रायोजकत्वाची चर्चा सुरू असताना खुद्द फ्लिपकार्टने जाहिरातीच्या माध्यमातून टीकाकारांना उत्तर दिलं आहे. वर्ल्डकपच्या निमित्ताने ब्रँडवॉर रंगताना दिसत आहे.

या सगळ्याची सुरुवात फ्लिपकार्ट कंपनीने ‘एक्स’ वरील पोस्टच्या माध्यमातून नामिबियाच्या संघाला प्रायोजित करत असल्याचं जाहीर केलं तेव्हा झाली. एका भारतीय कंपनीने विदेशी संघाला प्रायोजकत्व का द्यावं? बाद फेरीही गाठण्याची संधी नसलेल्या संघाला प्रायोजकत्व का द्यावं, भारतीय संघाला देता आलं असतं अशी विविध स्वरुपाची टीका होऊ लागली.

फ्लिपकार्डने नामिबियाला का दिली स्पॉन्सरशिप? जाहिरातीतून दिलं चोख उत्तर

आपल्या ब्रँडची पुरेशी चर्चा होत असल्याचं पाहून फ्लिपकार्टने जाहिरातीच्या माध्यमातून टीकाकारांना टोला हाणला आहे. नामिबियाला प्रायोजकत्व का दिलं याचं उत्तर त्यांनी जाहिरातूनच दिलं आहे. नामिबियाच्या संघातील काही खेळाडू आणि फ्लिपकार्ट कंपनीचे दोन प्रतिनिधी यांच्यात टेबलवर चर्चा होताना दिसते. तुम्ही आमच्या संघाला प्रायोजकत्व का दिलं आहे? असा प्रश्न नामिबियाचे खेळाडू विचारतात. भारत कुठे, नामिबिया कुठे असंही सांगतात. नामिबियात फ्लिपकार्ट नाही हेही सांगतात. नामिबियाच्या खेळाडूंचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यावर फ्लिपकार्टची माणसं म्हणतात, ‘फ्लिपकार्ट हे सर्वसामान्यांसाठी सगळ्यांसाठी आहे. फक्त सधन वर्गासाठी नाही, आम्ही सगळ्यांना सेवा पुरवतो हे आम्हाला ठसवायचं होतं. नामिबियाचे सामने भारतात होत आहेत. नामिबियाचा संघ टीव्हीवर दिसतो आहे. साहजिकच त्यांच्या माध्यमातून फ्लिपकार्टही दररोज हजारो-लाखो घरांमध्ये पोहोचत आहे. नामिबियात फ्लिपकार्ट असो वा नसो भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं क्रिकेट संघ हे उत्तम माध्यम आहे’.

नामिबियाच्या संघाच्या समोरच्या भागावर फ्लिपकार्टचं नाव ठसठशीत दिसत आहे. नामिबियाचा संघ अ गटात आहे.साहजिक त्यांचे भारत आणि पाकिस्तानविरुद्ध सामने होत आहेत. महिनाभर देशभरात सातत्याने त्यांचा ब्रँड लाखो प्रेक्षकांसमोर जाणार आहे.

‘जायंट किलर अशी नामिबिया संघाची ओळख आहे. क्रिकेटच्या पटलावर नामिबिया विकसनशील आहे. पण त्यांनी सातत्याने त्यांच्या खेळात सुधारणा केली आहे. मोठ्या प्रस्थापित संघांना धक्काही दिला आहे. ज्या पद्धतीने फ्लिपकार्टने सातत्याने आगेकूच केली आहे असं ते अधिकारी सांगतात. विश्वास आणि निर्धार ही आमचीही ओळख आहे’, असं फ्लिपकार्टचे अधिकारी सांगतात. भारतीय प्रेक्षकांना भावेल असा हा मुद्दा आहे असंही ते सांगतात.

‘नामिबियाचा संघ दिल्ली आणि चेन्नईत खेळत असताना फ्लिपकार्ट ब्रँड सातत्याने प्रेक्षकांसमोर असेल’, असं फ्लिपकार्टचं म्हणणं आहे. ‘आम्ही बेस्ट डील मिळवतो’, असंही ते अधिकारी सांगतात. एका नवख्या संघाला प्रायोजकत्व देऊनही फ्लिपकार्टची भरपूर चर्चा आहे. एकातऱ्हेने कंपनीचं उद्दिष्ट साध्य झालं आहे.