Gautam Gambhir On Sanju Samson: भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर झालेल्या पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर पार पडला. हा आतापर्यंतचा भारताचा सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडने २०१ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या ७६ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना १२५ धावांनी गमावला. या सामन्यातही संजू सॅमसनला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळावी म्हणून संजू सॅमसनला बाहेर केलं गेलं. दरम्यान गंभीरने संजू सॅमसनला बाहेर करण्यामागचं नेमकं कारण काय? याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

गौतम गंभीर काय म्हणाला?

भारतीय संघाच्या पराभवानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “पहिली गोष्ट म्हणजे, संजू सॅमसनला माझ्याकडून जे स्पष्टीकरण हवं होतं ते दिलं गेलं आहे. ही पूर्णपणे एक प्रशिक्षक आणि खेळाडूमध्ये झालेली चर्चा आहे. दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे बाहेर सांगता येणार नाही. स्पष्टतेबद्दल बोलायचं झालं तर, आम्ही संजूबाबत पूर्णपणे स्पष्ट आहोत. तो टी-२० वर्ल्डकप विजयाचा हिरो आहे. पण कधी कधी एखाद्या विशिष्ट खेळाडूचा फॉर्म पाहणंही तितकंच गरजेचं असतं.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “असा कुठलाही नियम नाही की, तो या मालिकेत पुनरागमन करु शकणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निकाल महत्वाचा असतो. आम्हाला जे कॉम्बिनेशन योग्य वाटतं, आम्ही त्याच कॉम्बिनेशनसह मैदानात उतरतो. माझा नेहमी ठाम विश्वास राहिला आहे की, प्रत्येकाला संघात आपले स्थान निर्माण करावे लागते. प्रत्येकाला भारतीय संघासाठी खेळण्याचा हक्क कमवावा लागतो.”

भारताचा संघ आयर्लंड दौऱ्यावर रवाना टी-२० वर्ल्ड चॅम्पियन संघ म्हणून रवाना झाला होता. पण या दौऱ्यावर जाण्याआधी भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळाले होते. सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन काढलं आणि संघाबाहेर केलं. तर त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. या दौऱ्यासाठी वैभव सू्र्यवंशीलाही संघात स्थान दिलं गेलं. पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. ही मालिका भारताने २-० ने गमावली. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर पहिल्या सामन्यात संजू सॅमसन फ्लॉप ठरल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. त्याच्याजागी वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आलं. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण या मालिकेसाठी संजूला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्याला विश्रांती देण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. पण एकच फॉरमॅट खेळत असलेल्या खेळाडूला विश्रांती कशाला? नक्की विश्रांती दिली आहे की डच्चू? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.