Gautam Gambhir Angry: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा धाकड फलंदाज आहेत. त्यामुळे धावांचा डोंगर उभारला जाऊ शकतो. याआधी या मैदानावर झालेल्या सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पाडला गेला आहे आणि त्या धावांचा यशस्वी पाठलाग देखील केला गेला आहे. त्यामुळे या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळू शकतं. दरम्यान या सामन्याआधी गौतम गंभीरचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तो रागात असल्याचे दिसून येत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, एकच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे गौतम गंभीरला झालंय तरी काय? माध्यमातील वृत्तानुसार, गौतम गंभीर खेळपट्टीवरून नाराज आहे. खेळपट्टीवर हिरव्या रंगाचं गवत आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. इंग्लंडच्या संघात एकापेक्षा एक धाकड वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे गौतम गंभीर पीच क्युरेटरवर नाराज असल्याचं दिसून येत आहे. खेळपट्टी या सामन्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. ही खेळपट्टी जर फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार असेल, तर भारतीय संघात एकापेक्षा एक स्टार फिरकी गोलंदाज आहेत, जे इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवू शकतात.

वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचे अनेक सामने खेळवले गेले आहेत. यादरम्यान धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचं पारडं जड राहिलं आहे. मुंबई इंडियन्सने धावांचा पाठलाग करताना अनेक मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आहे. तर टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील रेकॉर्ड पाहिला, तर आतापर्यंत या मैदानावर १६ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. यादरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ८ सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ८ सामने जिंकले आहेत.

खेळपट्टी कोणाला साथ देणार?

वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी ही फलंदाजीसाठी नेहमीच अनुकूल ठरते. या मैदानावर मोठ्या धावांचा डोंगर उभारला जातो आणि तो यशस्वीरित्या सर देखील केला जातो. माध्यमातील वृत्तानुसार, सुरवातीला ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल ठरेल. लाल मातीची खेळपट्टी असल्याने वेगवान गोलंदाजांना उसळी मिळेल. पण खेळ जसा पुढे जाईल, फिरकी गोलंदाजांना मदत मिळायला सुरुवात होईल. मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाज आपली जादू दाखवू शकतात.