Germany Football Analysis : मुंबई : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ज्या तीन देशांचा उल्लेख महासत्ता म्हणून केला जातो, त्या तिन्ही संघांना सध्या घरघर लागली आहे. ब्राझील, जर्मनी आणि इटली यातीन अव्वल संघांपैकी केवळ ब्राझीलच स्पर्धेत टिकून आहे. जर्मनीचा संघ राउंड ऑफ ३२ फेरीत गारद झाला. इटलीचा संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्रही ठरू शकला नाही. विशेष म्हणजे, जवळपास तिन्ही संघांचा ऱ्हास विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर सुरू झाला. यातही जर्मनीची पडझड अधिक लक्षणीय ठरते.

सर्वाधिक सातत्यपूर्ण

याचे कारण म्हणजे, अगदी अलीकडेपर्यंत विश्वचषक स्पर्धेतील सातत्याचे दुसरे नाव जर्मनी होते. हा देश १९५०पासून विश्वचषक स्पर्धेत खेळू लागला. लगेचच म्हणजे १९५४मध्ये पहिल्यांदा विश्वविजेता बनला. यानंतर १९७४, १९९०, २०१४ अशी आणखी तीन म्हणजे एकूण ४ जगज्जेतेपदे जर्मनीने पटकावली. इतकेच नव्हे, तर १९६६, १९८२, १९८६, २००२ या स्पर्धांमध्ये हा संघ विश्व उपविजेता होता. म्हणजे एकूण आठ वेळा अंतिम फेरीत धडक. याशिवाय १९९४ आणि १९९८ या स्पर्धांमध्ये जर्मनी उपान्त्यपूर्व फेरीपर्यंत गेले. तर २००६ आणि २०१० या स्पर्धांमध्ये उपान्त्य फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली. इतके सातत्य ब्राझीललाही दाखवता आलेले नाही.

जर्मनीचा संघ प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत उतरतो तेव्हा त्यांच्याकडून किमान उपान्त्य फेरीचीच अपेक्षा बाळगली जाते – चाहत्यांकडून आणि विश्लेषकांकडूनही. अनेक मोठ्या देशांनी जर्मनीच्या दराऱ्याचा धसका घेतला होता. इंग्लंडचे अनेक फुटबॉल संघ आणि तेथील फुटबॉलप्रेमींचा याबाबत विशेष उल्लेख करावा लागेल. इंग्लंडमध्ये १९६६मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंग्लंडने जर्मनीचा अतिरिक्त वेळेत पराभव करून त्यांचे आजवरचे एकमेव जगज्जेतेपद पटकावले खरे. पण त्यानंतर महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये इंग्लंड जर्मनीकडून सातत्याने हरत आला. विख्यात इंग्लिश फुटबॉलपटू आणि कर्णधार गॅरी लिनेकरने जर्मनीच्या फुटबॉल संघाचे वर्णन हतबल उद्वेगाने या शब्दांत केले होते – ‘फुटबॉल हा सोपा खेळ आहे. २२ खेळाडू चेंडूच्या मागे धावतात आणि अखेरीस जर्मनी नेहमीच जिंकतात’!

दराऱ्याला ओहोटी

प्रशिक्षक जोकीम ल्योव यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मनीने २०१४मध्ये विश्वचषक जिंकला, पण त्यानंतर त्यांच्या दराऱ्यास ओहोटी लागली. यातून भरारी घेण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. प्रत्येक स्पर्धेत जर्मनी अधिकाधिक वाईट खेळताना दिसून येतो. ल्योव प्रसिक्षक असताना याची प्रथम प्रचिती २०१८मधील विश्वचषक स्पर्धेत आली. त्या स्पर्धेत सुरुवातीच्या साखळी सामन्यात जर्मनी मेक्सिकोशी पराभूत झाले, तर अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण कोरियाने त्यांना नमवले. त्यामुळे स्वीडनविरुद्ध विजय मिळवूनही जर्मनीचा संघ साखळीतच गारद झाला. जवळपास ४० वर्षांनंतर तशी नामुष्की जर्मनीवर ओढवली होती. त्यापुढील म्हणजे २०२२ विश्वचषक स्पर्धेत फार वेगळे चित्र दिसले नाही. त्याही स्पर्धेत जर्मनीला सुरुवातीच्या सामन्यातच जर्मनी पराभूत झाले. जर्मनीला नेस्तनाबूत करणारा संघ होता जपान. नंतर स्पेनशी बरोबरी आणि कोस्टारिकावर विजय मिळवूनही गोलसरासरीच्या फटक्यामुळे जर्मनीवर पुन्हा एकदा साखळी टप्प्यातच गारद व्हावे लागले. हे जर्मनीच्या वैभवशाली फुटबॉल इतिहासात प्रथमच घडत होते.

इतिहास वैभवशाली असला, तरी वर्तमानातील संघ सामान्य कुवतीचा बनत चालल्याच्या समजावर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत शिक्कामोर्तबच झाले. नवख्या कुरासावविरुद्ध जर्मनीने गोलधडाका लावला, तरी एक गोल खावा लागलाच. आयव्हरी कोस्टविरुद्ध सुरुवातीस पिछाडीवर पडल्यानंतर बरोबरी आणि सामना संपण्यास काही क्षण शिल्लक असताना विजयी गोल केल्यामुळे जर्मनीच्या मर्यादा दिसू लागल्या होत्या. दोन विजयांसह बाद फेरीतील प्रवेश निश्चित झाल्यामुळे जर्मनीचा संघ इक्वेडोरविरुद्ध थोड्या बेफिकीरीने खेळला आणि याचा फायदा इक्वेडोरने उठवत २-१ अशी बाजू उलटवली. बाद फेरीत पॅराग्वेविर्ध निर्धारित आणि अतिरिक्त वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूट-आउटमध्ये जर्मनीला पराभूत व्हावे लागले. विश्वचषक स्पर्धेत पेनल्टी शूट-आउटमध्ये पराभूत होण्याची जर्मनीची ही पहिलीच वेळ. ही अधोगती जर्मनीच्या चाहत्यांना विलक्षण अस्वस्थ करणारी ठरते.

नेमके काय चुकत आहे?

गेली कित्येक वर्षे जर्मनीचा संघ शारीरिक तंदुरुस्ती, फुटबॉल कौशल्याबरोबरच मानसिक कणखरपणासाठीही ओळखला जायचा. फार मागे जायला नको, पण नवीन सहस्रकामध्येच जर्मनीने ज्या संघांना हरवले ती यादीच लक्षणीय ठरते. इंग्लंड, अर्जेंटिना, पोर्तुगाल, फ्रान्स, ब्राझील. हे सगळेच मातबर संघ म्हणून ओळखले जातात. यातील फ्रान्स वगळता इतर संघांविरुद्ध जर्मनीने मोठ्या फरकाने विजय मिळवलेले आहेत. ब्राझीलचा संघ यजमान असताना, २०१४मधील स्पर्धेच्या उपान्त्य लढतीत जर्मनीने त्यांचा ७-१ असा धुव्वा उडवला त्याची आठवण अजूनही ताजी आहे.

आता या संघांच्या तुलनेत ही यादी पाहा – मेक्सिको, द. कोरिया, जपान, इक्वेडोर, पॅराग्वे. याचा अर्थ आता मातबर संघ नव्हे, तर किमान क्षमता आणि गुणवत्ता असलेले संघही जर्मनीला सातत्याने हरवू लागले आहेत. कधी साखळी टप्पा, तर कधी बाद फेरीचा पहिला टप्पा ओलांडणेही या संघासाठी आव्हानात्मक ठरू लागले आहे. तिन्ही स्पर्धांमध्ये जर्मनीचे प्रशिक्षक वेगवेगळे होते. जोकीम ल्योव, हान्सी फ्लिक आणि ज्युलियन नागेल्समान या तिघांनाही योग्य ते बदल करून, डावपेचांत वैविध्य आणून जर्मनीच्या संघाला पडझडीपासून वाचवता आले नाही.

पॅराग्वेविरुद्ध पेनल्टी शूट-आउटमध्ये जर्मन कर्णधार जोशुआ किमिचला पेनल्टी घेण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांची मनधरणी करावी लागत होती. यातून जर्मनीची मानसिकता किती कमकुवत बनली याची प्रचिती येऊ शकते. जवळपास प्रत्येक जर्मन पराभवामध्ये हल्ली काही ना काही तरी वादग्रस्त घडामोड असतेच. त्यामुळे जर्मन संघ कमनशिबी ठरला, खराब पंचगिरीची शिकार बनला अशी आवई उठणेही नित्याचे बनले आहे. पण ज्या गुणांमुळे जर्मनीच्या संघाचा दरारा होता, त्या गुणांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा इशारा माजी खेळाडू देऊ लागले आहेत. पल्लेदार पासेस, प्रतिस्पर्ध्यांच्या क्षेत्रात वेगवान मुसंडी, जोरकस आणि अचूक फटके ही जर्मन वैशिष्ट्ये अलीकडच्या जर्मन संघांमध्ये दिसून येत नाहीत. जर्मनीने दोन विश्वचषक अंतिम सामन्यांमध्ये (१९५४, १९७४) पिछाडीवर पडून सामने जिंकले. एकदा (१९८६) दोन गोलांची पिछाडीदेखील काही काळासाठी भरून काढली. कधीही विचलित न होणे ही जर्मन संघांची खासियत मानली जायची. ते वैशिष्ट्य जवळपास विस्मृतीत गेले आहे.

जर्मनी पुन्हा उभा राहील?

आजही जर्मनीची फुटबॉल लीग अर्थात बुंडेसलिगा जगातील सर्वोत्तम लीगपैकी एक मानली जाते. प्रशिक्षण आणि इतर पायाभूत सुविधाही तेथे अव्वल दर्जाच्या आहेत. पण एरवी लीगमध्ये उत्तम खेळणारे फुटबॉलपटू जर्मन झेंड्याखाली आले की त्या दर्जाचे खेळत नाहीत हे जर्मनीचे दुखणे आहे. एके काळी स्पेन, ब्राझील, इंग्लंड या संघांचीही ही समस्या होती. स्वतःची अशी शैली विद्यमान संघांना आणि प्रशिक्षकांना प्रस्थापित करता आलेली नाही. मिरोस्लाव्ह क्लोसानंतर या संघाकडे त्या दर्जाचा उत्तम स्ट्रायकर निर्माण होऊ शकलेला नाही. तीच स्थिती काही अंशी बचावपटू आणि गोलकीपरबाबतही दिसून येते.

चाळीशी ओलांडलेल्या मॅन्युएल नॉयरला जर्मनीकडे पर्याय सापडू शकत नाही हे अजब आहे. नवीन सहस्रकाच्या सुरुवातीस जर्मनीने आक्रमक शैली विकसित केली. या शैलीत बचावपटूदेखील जवळपास मधल्या रेषेवर खेळत असतात. तर गोलरक्षक एखाद्या बचावपटूसारखा खेळतो. या रचनेत जोखीम असते, प्रतिस्पर्ध्यांकडून गोल होण्याची शक्यता वाढते. पण दुसरीकडे जर्मनीकडूनही प्रतिस्पर्ध्यावर सातत्याने गोल होत असतात, त्यामुळे हा धोका नुकसानदायी ठरत नसे. आता मात्र जर्मनीकडून होणारे गोल आटले, पण बचाव काही भक्कम राहिला नाही. त्यामुळे किमान चपळता असलेला कोणताही संघ जर्मनीच्या बचावफळीला बेसावध गाठतो. या समस्येवर जर्मन फुटबॉल संघटनेने पुरेशा गांभीर्याने तोडगा शोधलेला नाही, हे वास्तव आहे.

siddharth.khandekar@expressindia.com