Hardik Pandya is out of MI vs LSG Match: आयपीएल २०२६ मध्ये पराभवांचा लागोपाठ धक्का बसलेल्या मुंबई इंडियन्सला महत्त्वाच्या सामन्यात अजून एक धक्का बसला आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी धडपडणाऱ्या मुंबई संघाला लखनौविरूद्ध सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याशिवाय खेळावं लागणार आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यातून हार्दिक पंड्या बाहेर झाला आहे. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करेल.

मुंबई इंडियन्सने या महत्त्वाच्या सामन्यासाठी संघात मोठे बदल केले आहेत. संघासाठी मोठा दिलासादायक गोष्ट म्हणजे माजी कर्णधार आणि स्टार सलामीवीर रोहित शर्मा फिट होऊन संघात परतला आहे. सूर्याने नाणेफेकीदरम्यान रोहितच्या पुनरागमनाबद्दल सांगताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

आपल्या घरच्या मैदानावर, वानखेडे स्टेडियममध्ये सलग चार पराभवांनंतर लखनौचा सामना करणाऱ्या मुंबई संघाची या सामन्यात नेतृत्व करण्याची जबाबदारी सूर्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. नाणेफेकीपूर्वी संघाच्या सराव सत्रात हार्दिक पंड्या अनुपस्थित राहिल्याने, तो सामन्यातून बाहेर पडेल अशी चर्चा सुरू झाली होती. सूर्यकुमार यादव नाणेफेकीसाठी येताच हार्दिक पंड्या खेळणार नसल्यावर शिक्कामोर्तब झाला.

हार्दिक पंड्या लखनौविरूद्ध सामन्यात का खेळत नाहीये?

पण हार्दिकला या सामन्यातून बाहेर का ठेवण्यात आलं? नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सूर्यकुमार यादवने या प्रश्नाचे उत्तर दिले. सूर्याने स्पष्ट केलं की, हार्दिकची प्रकृती ठीक नसल्यामुळे तो या सामन्यात खेळू शकणार नाही. या हंगामात हार्दिक पंड्या खेळत नसण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, फिटनेसच्या समस्यांमुळे हार्दिक दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातही खेळू शकला नव्हता. तेव्हाही सूर्याने संघाची धुरा सांभाळली होती. मात्र, मुंबई तो सामना हरली होती. यावेळी सूर्या संघाचे नशीब बदलू शकतो की नाही, यावर सर्वांच्या नजरा आहेत.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन

सूर्यकुमार यादव (कर्णधार), रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), नमन धीर, तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, एएम गझनफर, रघु शर्मा

इम्पॅक्ट खेळाडू: रोहित शर्मा, मयंक रावत, रॉबिन मिंग, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट