IND A vs SL A Match Live Updates in Marathi: भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यात सुरू असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी ढासळली. अवघ्या १४३ धावांच्या धावसंख्येवर भारताने सात विकेट्स गमावल्या होत्या. अशा कठीण परिस्थितीत फलंदाजीला आलेल्या सूर्यांश शेडगेने विप्रज निगमच्या साथीने संघाचा डाव सावरला; या दोन्ही फलंदाजांनी शतकी भागीदारी केल्या आणि अर्धशतकं देखील केली. पण यादरम्यान एका चुकीमुळे भारताला १० धावांचा फटका बसला आणि पंचांनी या १० धावा कापल्या, पण यामागचं कारण काय आहे, जाणून घेऊया.

तरुण अष्टपैलू खेळाडू विप्रज निगमने फलंदाजी करताना दोन चुका केल्या, ज्यांमुळे संघाला एकूण १० धावांचा फटका बसला. भारतीय संघ अखेरच्या षटकात सर्वबाद झाला आणि संघ २६५ धावा करू शकला. विप्रज निगम ४९ चेंडूत ५१ धावा करत बाद झाला. तर सूर्यांश शेडगेने ६६ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ७२ धावांची खेळी केली आणि संघाला २५० अधिक धावांचा पल्ला गाठून दिला. पण भारताला १० धावांचा फटकाही यादरम्यान बसला.

पंचांनी विप्रज निगमच्या चुकीमुळे का वजा केल्या भारताच्या १० धावा?

३५ व्या आणि ३७ व्या षटकांदरम्यान ही घटना घडली. सुरूवातीला पंचांनी भारताच्या धावसंख्येतून प्रत्येकी ५-५ धावा वजा केल्या, ज्यामुळे संघाचं एकूण १० धावांचं नुकसान झालं. फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागत असतानाच, या दंडामुळे संघाला मोठा फटका बसला. विप्रज निगमला त्याच्या खेळीदरम्यान खेळपट्टीच्या ‘संरक्षित क्षेत्रात’ (protected area) धावण्याबाबत पंचांनी अनेकदा ताकीद दिली होती.

विप्रज निगम विकेटदरम्यान धावा काढत असताना पिचच्या मधून धावत होता. पिचच्या मध्यभागातून धावू नकोस असं पंचांनी त्याला सांगत अंतिम ताकीदही देण्यात दिली होती. असं असूनही, ३५व्या षटकात त्याने तीच चूक पुन्हा केली; त्यानंतर नियमांनुसार पंचांनी भारतीय संघावर ५ धावांची दंडात्मक कारवाई केली.

यानंतर ३७ व्या षटकात विप्रज पुन्हा एकदा ‘प्रोटेक्टेड एरिया’मध्ये (पिचच्या सुरक्षित क्षेत्रात) धावताना दिसला, ज्यामुळे पंचांनी दुसऱ्यांदा ५ धावांची दंडात्मक कारवाई केली. परिणामी, श्रीलंकेने कोणतेही कष्ट न करता भारताच्या एकूण १० अतिरिक्त धावा कमी झाल्या, ज्यामुळे भारतीय संघाच्या अडचणी आणखी वाढल्या. नियमांनुसार, फलंदाजांना पिचच्या मध्यातून धावण्याची परवानगी नसते, कारण तसं केल्याने खेळपट्टी खराब होण्याचा धोका असतो.

तत्पूर्वी तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशीला या सामन्यातही मोठी खेळी करता आली नाही. त्याने १४ चेंडूंत २१ धावा केल्या, परंतु मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचं मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात त्याला अपयश आलं. वैभवव्यतिरिक्त प्रभसिमरन सिंग (११), कर्णधार तिलक वर्मा (२३) आणि ऋतुराज गायकवाड (३७) हे देखील लवकर बाद झाले. मधल्या फळीतील फलंदाज आयुष बदोनी आणि निशांत सिंधू यांच्याकडूनही संघाला महत्त्वपूर्ण योगदानाची अपेक्षा होती, मात्र यापैकी कोणालाही उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.