India Semi Final Scenario SA vs WI Match: टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर-८ चं पहिल्या गटातील समीकरण चांगलंच अटीतटीचं झालं आहे. पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघांनी दणदणीत विजय मिळवत भारतासाठी सेमीफायनलचं समीकरण अवघड केलं आहे. यानंतर आता वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका हे संघ सुपर-८ सामन्यात एकमेकांशी भिडत आहेत. या सामन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला सपोर्ट करणार असून वेस्ट इंडिजचा पराभव व्हावा अशी प्रार्थना करत आहे. यामागचं कारण जाणून घेऊया.

भारताला आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी केवळ विजय पुरेसे ठरणार नाहीत. भारताचा नेट रनरेट कमी असल्याने इतर काही सामन्यांचे निकाल त्यांच्या बाजूने लागणे देखील आवश्यक आहे. सध्या गुणतालिकेत वेस्ट इंडिज ५.३५० च्या नेट रनरेटसह अव्वल स्थानावर आहेत. तर दक्षिण आफ्रिका ३.८०० च्या नेट रनरेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर भारत -३.८०० च्या नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज सामना महत्त्वाचा असणार आहे.

भारतासाठी दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवणं का गरजेचं?

जर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवलं, तर टीम इंडियाचा सेमीफायनलकडे जाण्याचा मार्ग सोपा होईल. मात्र जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं, तर भारतासाठी समीकरण अधिक कठीण होईल. त्यामुळे भारताला सेमीफायनलसाठी पात्रता मिळवण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवणं आवश्यक ठरेल.

जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला हरवलं, तर त्यांचे चार गुण होतील. दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वेविरुद्धचा शेवटचा सामना जिंकली, तरी त्यांचेदेखील चार गुण होतील. भारताने आपल्या उरलेल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर त्यांचेही चार गुण होतील. अशा वेळी सेमीफायनलच्या जागांसाठी तीन संघांमध्ये चुरशीची लढत होईल.

सध्या भारताचा नेट रनरेट वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा कमी आहे. त्यामुळे भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला नाही किंवा दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांना मोठा पराभव सहन करावा लागला नाही, तर भारतासाठी सेमीफायनलमध्ये पोहोचणं अत्यंत कठीण ठरू शकतं.

रनरेटमध्ये भारत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेला कसा मागे टाकू शकतो?

सध्या टीम इंडियाला नेट रनरेटमध्ये आघाडी घेण्यासाठी जवळपास अशक्य वाटणारी कामगिरी करावी लागणार आहे. समीकरणानुसार भारताने झिम्बाब्वेला सुमारे २२८ धावांनी पराभूत केलं, तर ते दक्षिण आफ्रिकेला रनरेटमध्ये मागे टाकू शकतात. वेस्ट इंडिजला मागे टाकण्यासाठी भारताला सुमारे २९० धावांनी विजय मिळवावा लागेल. जर भारत धावांचा पाठलाग करत असेल आणि प्रतिस्पर्धी संघाने १५० धावांचे लक्ष्य दिले, तर दक्षिण आफ्रिकेपेक्षा पुढे जाण्यासाठी भारताला ते लक्ष्य फक्त ८ षटकांत गाठावं लागेल. तर वेस्ट इंडिजपेक्षा सरस नेट रनरेट मिळवून अव्वल स्थान मिळवण्यासाठी ७ षटकांत लक्ष्य पूर्ण करणं आवश्यक असेल. म्हणजेच, भारतासाठी सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग अजूनही खुला असला, तरी त्यासाठी अत्यंत मोठ्या फरकाने विजय किंवा अतिशय वेगवान धावांचा पाठलाग आवश्यक आहे.