आयपीएलचा १९वा हंगाम सुरू झाला आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी जगभरातले क्रिकेटपटू उत्सुक असतात. आयपीएलच्या धर्तीवर आता जगभरात टी२० लीगचं पेव फुटलं आहे. मात्र भारतीय खेळाडूंना यापैकी कुठल्याही लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. असं का? जाणून घेऊया.

आयपीएलचं अर्थकारण

आयपीएल ही बीसीसीआयतर्फे आयोजित होणारी लीग आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचा पसारा प्रचंड असा आहे. या स्पर्धेचं बाजारमूल्य १८.५ बिलिअन डॉलर्स इतकं आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएल स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघांची मालकी बदलली. या संघांचं मूल्य काही हजार कोटींच्या घरात होतं. आयपीएल स्पर्धेचे सामने प्रक्षेपित करण्यासाठी स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टार यांनी ३९७.७५ बिलिअन एवढी रक्कम मोजली आहे. आयपीएल लिलावात खेळाडूंसाठी कोटीच्या कोटी रुपयांची बोली लागते. भारताचा उमदा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतसाठी लागलेली २७ कोटींची बोली सर्वाधिक आहे. २ महिन्यांसाठी ऋषभला ही रक्कम मिळते आहे. अचंबित करणारं अर्थकारण या स्पर्धेच्या निमित्ताने उभं राहिलं आहे. या स्पर्धेत सहभागी होणं, खेळणं हे एक्सक्लुसिव्ह राहावं असा बीसीसीआयचा प्रयत्न असणं स्वाभाविक आहे. म्हणूनच वार्षिक करारबद्ध असलेले तसंच भारतात डोमेस्टिक क्रिकेट खेळणारे अशा कोणत्याही खेळाडूंना निवृत्ती स्वीकारल्याशिवाय जगभरातल्या अन्य कोणत्याही लीगमध्ये खेळता येत नाही.

भारतीय खेळाडूंना वेळ कुठाय?

भारतीय खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सगळ्यात व्यग्र क्रिकेटपटू आहेत. भारतीय संघ सातत्याने खेळत असतो. उदाहरणार्थ २०२६चं वेळापत्रक पाहूया. भारतीय संघाने जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी२० मालिका खेळली. यानंतर भारतीय संघाने टी२० वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं. ही स्पर्धा महिनाभर चालली. यानंतर भारतीय खेळाडू दोन महिने आयपीएल स्पर्धेत खेळणार आहेत. आयपीएलनंतर अफगाणिस्तानचा संघ छोटेखानी दौऱ्यासाठी भारतात येणार आहे. यानंतर भारतीय संघ टी२० आणि वनडे मालिकेसाठी इंग्लंडला जाणार आहे. त्यानंतर श्रीलंकेचा दौरा असणार आहे. यंदाच्या वर्षी भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेतही सहभागी होईल. सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारतात येणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असणार आहे. वर्षअखेरीस श्रीलंकेचा संघ भारतात येणार आहे. भारतीय संघ ३६५ पैकी जवळपास ३०० दिवस खेळत असतो. त्यामुळे भारतीय खेळाडूंना विदेशातील टी२० लीगमध्ये खेळण्यासाठी पुरेसा वेळही नाहीये.

देशांतर्गत स्पर्धा

डोमेस्टिक क्रिकेटचं अतिशय व्यग्र स्वरुपाचं वेळापत्रक आहे. रणजी करंडक ही सगळ्यात प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. रणजी विजेता संघ आणि शेष भारत यांच्यात होणारा इराणी ट्रॉफीचा सामना, विभागवार संघांदरम्यान होणारी दुलीप ट्रॉफी, विजय हजारे आणि देवधर करंडक या वनडे स्पर्धा आणि देशातली सगळ्यात मोठी सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धा असं भरगच्च वेळापत्रक असतं. बीसीसीआयतर्फे देशाच्या कानाकोपऱ्यात सामन्यांचं आयोजन होतं. भारतीय खेळाडूंना विदेशात होणाऱ्या लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली तर डोमेस्टिक स्पर्धांचं महत्त्व कमी होईल. भारतीय संघात प्रवेशाच्या दृष्टीने डोमेस्टिक क्रिकेटमधली कामगिरी प्रमाण मानली जाते. खेळाडूंनी विदेशी लीगचा मार्ग पत्करला तर डोमेस्टिक क्रिकेट रसातळाला जाऊ शकतं.

विदेशातील लीगमध्ये का खेळावं?

विदेशातील लीगच्या निमित्ताने त्या त्या देशात खेळता येतं. तिथल्या खेळपट्ट्या समजून घेता येतात. भारतातर्फे खेळताना हा अनुभव मोलाचा ठरू शकतो. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियातील बिग बॅश किंवा दक्षिण आफ्रिकेच्या SA20 स्पर्धेत खेळता आलं तर त्यांच्या खेळाडूंबरोबर खेळता येतं. त्या देशातल्या ७ ते ८ मैदानांवर नियमितपणे खेळायला मिळू शकतं. पैशांच्या बरोबरीने हा अनुभव अगदीच उपयुक्त ठरू शकतो. भारतीय खेळाडू अन्यत्र खेळले तर त्यांच्या ब्रँडव्हॅल्यूमध्ये आणखी वाढ होऊ शकते. भारतीय खेळाडू विदेशातील लीगमध्ये खेळू लागले तर आयपीएलचं महत्त्व एकदमच ओसरू शकतं. त्यामुळे अर्थकारणही डळमळू शकतं. त्यामुळे निवृत्ती स्वीकारल्याशिवाय भारतीय खेळाडूंना विदेशातल्या कोणत्याही लीगमध्ये खेळता येत नाही.

जगभरात कुठे लीग होतात?

आयपीएलच्या धर्तीवर आता जवळपास प्रत्येक देशात टी२० लीग आयोजित होते. जानेवारी महिन्यात युएईत IL20 स्पर्धा होते. त्याचवेळेला ऑस्ट्रेलियात बिग बॅश स्पर्धा होते. न्यूझीलंडमध्ये सुपर स्मॅश या नावाने लीग भरवली जाते. गेल्या काही वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेत SA20 स्पर्धा होते. पाकिस्तानतर्फे फेब्रुवारीत पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा फेब्रुवारीत टी२० वर्ल्डकप असल्याने आयपीएल सुरू असतानाच पाकिस्तान सुपर लीग सुरू आहे. बांगलादेश प्रीमिअर लीग आणि लंका प्रीमिअर लीग होतात. टी२०चं माहेरघर असलेल्या इंग्लंडमध्ये टी२० लीग होते आणि द हंड्रेड नावाचीही स्पर्धा आयोजित होते. कॅनडात टी२० तर अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट अशा स्पर्धा होतात. कॅरेबियन प्रीमिअर लीगही अतिशय लोकप्रिय आहे. अफगाणिस्तानतर्फेही युएईत लीग आयोजित करण्यात येणार आहे.

आयपीएल संघमालकांचा जगभरात संचार

विदेशातील लीग खेळण्याचं आणखी एक कारण म्हणजे आयपीएल संघमालकांनी जगभरातल्या विविध देशातल्या लीगमध्ये संघ विकत घेतले आहेत. यामुळे आयपीएलमध्ये आपल्या संघाकडून खेळणारे खेळाडू विदेशातही खेळावेत असं त्यांना वाटतं पण बीसीसीआयच्या नियमापुढे त्यांना जाता येत नाही. उदाहरणार्थ आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्स संघमालकांनी मेजर लीग क्रिकेटमध्ये MI न्यूयॉर्क, दक्षिण आफ्रिकेत MI केपटाऊन, युएईतील आयएलटी२० स्पर्धेत MI एमिरेट्स असे संघ विकत घेतले आहेत. अशाच पद्धतीने चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स यांनीही विविध लीगमध्ये संघ विकत घेतले आहेत.

महिला क्रिकेटपटूंना सवलत

पुरुष क्रिकेटपटूंसाठी नियम अत्यंत कठोर आहे पण महिला क्रिकेटपटूंना मात्र या नियमातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियातल्या महिला बिग बॅश स्पर्धेत तसंच इंग्लंडमधल्या टी२० लीग मध्ये नियमित सहभागी होतात. हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचा या देशांमध्ये स्वतंत्र चाहतावर्ग तयार झाला आहे.

भारतीय खेळाडू विदेशातील लीगमध्ये कधी खेळू शकतात?

आंतरराष्ट्रीय, आयपीएल तसंच डोमेस्टिक क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती स्वीकारल्यानंतरच भारतीय खेळाडू अन्य देशातल्या लीगमध्ये खेळू शकतात. काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. अश्विन आता अमेरिकेतल्या मेजर लीग क्रिकेट या स्पर्धेत खेळणार आहे. आयपीएल स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्रशिक्षक दिनेश कार्तिक निवृत्त झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतल्या लीगमध्ये खेळला. कॅनडात झालेल्या ग्लोबल टी२० लीग स्पर्धेत युवराज सिंग, मनप्रीत गोणी हे खेळले होते.