मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल स्पर्धेतली कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धर्सची एकमेव लढत बाकी असताना दोन बदली खेळाडूंची घोषणा केली. मुंबई इंडियन्स संघाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं होतं. मुंबईने संघात खोगीरभरती केली नसती तरी फार फरक पडणार नव्हता. पण तरीही त्यांनी क्विंटन डी कॉक आणि राज अंगद बावा यांच्याऐवजी बदली खेळाडूंची घोषणा केली.
मुंबई इंडियन्स संघाने महिपाल लोमरुर आणि रुचित अहिर यांना संघात समाविष्ट केलं. महिपाल हा डावखुरा फलंदाज असून तो राजस्थानकडून खेळतो. आयपीएल स्पर्धेत त्याने राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशा दोन संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. रुचित हा सौराष्ट्र संघाकडून खेळणारा विकेटकीपर फलंदाज आहे. डीवाय पाटील टी२० स्पर्धेत रुचित रिलायन्स संघाकडून खेळला आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील प्रशिक्षकांनी रुचितचा खेळ पाहिला आहे.
आयपीएलच्या दुखापतींसंदर्भात बदली खेळाडूसाठीच्या नियमावलीनुसार, प्राथमिक फेरीतील १२व्या लढतीदरम्यान किंवा त्याआधी दुखापतग्रस्त झाल्यास, दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेबाहेर गेलेला खेळाडू आणि बदली खेळाडू असे दोघेही आयपीएल लिलावात रिटेन्शनसाठी पात्र ठरतात.
मुंबई इंडियन्स संघातर्फे करण्यात आलेल्या घोषणा या १२व्या लढतीनंतर करण्यात आल्या असल्या तरी आयपीएल पदाधिकाऱ्याने द हिंदूला दिलेल्या माहितीनुसार दुखापतींसंदर्भात आयपीएल प्रशासनाला १२व्या लढतीआधीच कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे जाहीर करण्यात आलेले बदल हे नियमानुसारच आहेत. याचाच अर्थ क्विंटन डी कॉक, राज बावा, महिपाल लोमरुर आणि रुचित अहिर हे चौघेही रिटेन्शनसाठी लागू असतील. मुंबई संघव्यवस्थपानाला वाटलं तर हे चौघेही पुढच्या हंगामातही मुंबईकडून खेळू शकतात. हंगामात आधी जाहीर करण्यात आलेले बदली खेळाडू आणि स्पर्धेबाहेर झालेले खेळाडू रिटेन्शनसाठी पात्र असतील.
या नियमाचा मोठा फायदा संघांना झाला आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने २०२५ मध्ये गुरजनप्रीत सिंगऐवजी दक्षिण आफ्रिकेचा युवा धडाकेबाज फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसला संघात समाविष्ट केलं. ब्रेव्हिसने आपल्या खेळाने छाप उमटवली. नियमांनुसार, चेन्नईने ब्रेव्हिस आणि गुजनप्रीत अशा दोघांनाही रिटेन केलं.
खेळाडूंसाठी आयपीएल कंत्राट हा आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा मुद्दा असतो. दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडल्यामुळे खेळाडूला उर्वरित सामने खेळता येत नाही. स्वत:चं कौशल्य दाखवण्याची संधी हुकते. त्याचवेळी कंत्राटही गमवावं लागल्यास खेळाडूचं दुहेरी नुकसान होऊ शकतं. या विचारातून दुखापतग्रस्त खेळाडू आणि बदली खेळाडू अशा दोघांनाही रिटेन्शन लागू होतं. संघ आवश्यकतेनुसार कोणाला रिटेन करायचं याचा निर्णय घेऊ शकतात.
अगदी शेवटच्या क्षणी बदली खेळाडू घेण्यात संघांचा म्हणजेच फ्रँचाइजींचाही फायदा आहे. शेवटच्या क्षणी बदली खेळाडू घेणं यामध्ये नगाला नग खोगीरभरती करणे एवढाच मुद्दा नसतो. हे एकप्रकारचे छुपे डावपेच आहेत. रिटेन्शनसाठी अधिकाअधिक खेळाडूंचा पर्याय उपलब्ध राहतो. लिलावात एखाद्या खेळाडूसाठी कोटीच्या कोटी रुपये रक्कम खर्च करण्याऐवजी मामुली खर्चात बदली खेळाडू मिळतो आणि तो ताफ्यात राहतो. दुखापत झालेला खेळाडू आणि बदली खेळाडू असे दोघेही ताफ्यात राहत असल्यामुळे फ्रँचाइजींना फायदाच होतो. खेळाडूचा फॉर्म, आधीच्या हंगामातली कामगिरी या निकषांनुसार फ्रँचाइजी पुढील लिलावाआधी कोणाला रिटेन करायचं याचा निर्णय घेऊ शकतात. खेळाडू दुखापतग्रस्त होणं हे कोणत्याही संघासाठी त्रासदायचक पण फ्रँचाइजींनी ‘आपदा में अवसर’ उक्ती अनुसरत यातून संघाचा फायदा कसा होईल ते बघितलं आहे.
यंदाच्या हंगामात प्रत्येक संघाला दुखापतींनी बेजार केलं. २५हून अधिक खेळाडू दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेबाहेर गेले. काही खेळाडूंना किरकोळ स्वरुपाच्या दुखापती झाल्या. अल्प विश्रांतीनंतर ते पुन्हा खेळण्यासाठी फिट ठरले. अनेक महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त होऊन माघारी परतल्याने संघ कमकुवत झाले. यामुळे त्यांच्या जागी बदली खेळाडूंना घ्यावं लागण्याचं प्रमाण यंदा सर्वाधिक आहे. हंगाम संपता संपता कोलकाता नाईट रायडर्स संघाने दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज मथिशा पथिराणाऐवजी लुवनिथ सिसोदियोला संघात समाविष्ट केलं.
पथिराणासाठी कोलकाताने तब्बल १८ कोटी रुपये खर्च केले होते. मात्र दुखापतीतून न सावरल्यामुळे पथिराणा हंगामातील बहुतांश सामने खेळू शकला नाही. प्राथमिक फेरी संपायला आलेली असताना पथिराणा भारतात दाखल झाला. एका सामन्यात त्याला अंतिम अकरात समाविष्ट करण्यात आलं. मात्र ८ चेंडू टाकल्यानंतर त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले. उर्वरित सामन्यात आणि नंतरही पथिराणा खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. भेदक यॉर्करसह हाणामारीच्या षटकात धावांना वेसण घालणारा पथिराणा कोलकाताच्या योजनांचा अविभाज्य भाग आहे. कोलकाताला त्याला गमवायचं नाहीये. पण पथिराणा खेळू शकत नसल्याने एका खेळाडूची जागा रिकामी होती. पथिराणा आणि सिसोदिया यांच्या कौशल्यगुणांमध्ये काहीच साम्य नाही पण सिसोदिया दुखापतग्रस्त अंगक्रिश रघुवंशीचा बॅकअप म्हणूनही कामी येऊ शकतो हे लक्षात घेऊन कोलकाताने त्याला संघात समाविष्ट केलं. ३० लाख रुपये मोजून कोलकाताने सिसोदियाला संघात समाविष्ट केलं.
बदली खेळाडू मिळण्यासाठी कोणत्याही संघाला विशिष्ट प्रक्रिया पार पाडावी लागते. खेळाडूची दुखापत गंभीर असून तो उर्वरित हंगाम खेळू शकणार नाही हे बीसीसीआय प्रमाणित डॉक्टरकडून अधिकृतरीत्या सूचित करणं अनिवार्य आहे. बदली खेळाडूसाठी बीसीसीआय म्हणजेच आयपीएल प्रशासनाकडून मान्यता मिळवावी लागते. बदली खेळाडू हा registered available player pool म्हणजे लिलावासाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंमधूनच निवडावा लागतो. लिलावामध्ये अनसोल्ड ठरलेल्या खेळाडूंचा यात समावेश असतो.
प्राथमिक फेरीच्या १२व्या सामन्यापर्यंत बदली खेळाडू मिळतो. दुखापतग्रस्त खेळाडूच्या मानधनाएवढी किंवा त्यापेक्षा कमी रक्कम बदली खेळाडूला मिळू शकते. बदली खेळाडू ‘लाईक अ लाईक रिप्लेसमेंट’ म्हणजे गोलंदाज दुखापतग्रस्त झाला असेल तर गोलंदाजच हवा अशी अट नाही.
