Sunil Gavaskar On Jasprit Bumrah: आयपीएल २०२६ स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत अनेक असे युवा खेळाडू आहेत, ज्यांनी दमदार कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काही खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे. पण भारताचा सर्वात विश्वासू गोलंदाज जसप्रीत बुमराह या हंगामात हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. टी -२० वर्ल्डकपमध्ये बुमराहच्या गोलंदाजीची धार पाहायला मिळाली होती. पण आयपीएल २०२६ स्पर्धेत वैभव सूर्यवंशीसारखा युवा खेळाडू त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचताना दिसून आला आहे. दरम्यान जसप्रीत बुमराहचं नेमकं काय चुकतंय? याबाबत सुनील गावसकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

जसप्रीत बुमराह या हंगामात सातव्यांदा एकही गडी बाद न करता माघारी परतला. लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४५ धावा खर्च केल्या यादरम्यान एकही गडी बाद केला नाही. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुनील गावसकर म्हणाले, “जसप्रीत बुमराह आपली सर्वोत्तम कामगिरी करतोय, पण तो गरजेपेक्षा जास्त काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात आहे. तो विकेटची संधी निर्माण करून देतोय, पण त्याला नशिबाची साथ मिळत नाहीये. त्याच्या गोलंदाजीतील गती कमी झाली आहे. त्याने मूळ गोष्टी कराव्यात आणि तेच करावं, जे त्याला चांगलं जमतं.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “त्याच्या स्लोव्हर गोलंदाजीची लेंथ जास्तच फुल झाली आहे. याआधी तो स्टंप लाइनवर चेंडू टाकायचा, पण आता हा लेग स्टंपच्या दिशेने जातोय. बुमराह नो चेंडू टाकण्यासाठी ओळखला जात नाही. पण या हंगामात त्याने ७ नो चेंडू टाकले आहेत. बुमराहसारख्या गोलंदाजाचा मजबूत पक्ष हा अचूक आणि नियंत्रणात गोलंदाजी करणं आहे. पण यावेळी याच गोष्टींमध्ये तो कमकुवत असल्याचं दिसून येत आहे.”

बुमराह सातत्याने क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे फिटनेस आणि विश्रांती देखील खूप महत्वाचं आहे. माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले, “संघ व्यवस्थापकांनी त्याच्याशी प्रामाणिकपणे चर्चा करायला हवी. त्याला विचारायला हवं की, तू १०० टक्के फिट आहेस का? तुला विश्रांती हवी आहे का? तो जर म्हणाला की, हो मी खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे. तर तुम्हाला वेगळा बुमराह पाहायला मिळू शकतो. कारण तो आणखी जोर लावताना दिसून येईल.”