What is GPS Tracking Vest: बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतानाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. त्या व्हिडिओमध्ये इंग्लंडचा युवा क्रिकेटपटू जेकब बेथेल स्पोर्ट्स ब्रा मध्ये दिसत होता. पहिल्या नजरेत ती पुरुषांची स्पोर्ट्स ब्रासारखी वाटते, याला GPS ट्रॅकिंग व्हेस्ट असं म्हणतात. फक्त क्रिकेटपटूच नाही तर फुटबॉल, हॉकी आणि इतर अनेक खेळांमधील आघाडीचे खेळाडू सराव आणि सामन्यांदरम्यान या व्हेस्टचा वापर करतात.

विराट कोहली, लिओनेल मेस्सी, नेमार यांसारखे अनेक दिग्गज खेळाडूही सराव करताना ही GPS व्हेस्ट परिधान करताना दिसतात. मात्र, ही व्हेस्ट नेमकी कशासाठी वापरली जाते, ती खेळाडूंना कशी मदत करते आणि आधुनिक क्रीडा क्षेत्रात तिचं महत्त्व काय आहे, हे जाणून घेऊया.

काय आहे GPS व्हेस्ट?

पहिल्या नजरेत हे उपकरण स्पोर्ट्स ब्रासारखं दिसतं. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांतील खेळाडू ते परिधान करतात. प्रत्यक्षात मात्र ते एक विशेष कॉम्प्रेशन व्हेस्ट असतं. या व्हेस्टच्या पाठीमागे, दोन्ही खांद्यांच्या मधोमध असलेल्या छोट्या खिशात तळहाताएवढं आणि टेनिस चेंडूपेक्षाही हलकं जीपीएस उपकरण ठेवलेलं असतं. ते परिधान केल्याची जाणीव खेळाडूंना फारशी होत नाही, मात्र त्याचा परिणाम अत्यंत प्रभावी असतो. सध्या जगभरातील जवळपास प्रत्येक आघाडीच्या सांघिक क्रीडा संघातील खेळाडू हे उपकरण वापरत आहेत.

हे जीपीएस व्हेस्ट काय करतं?

या तंत्रज्ञानाला जीपीएस ट्रॅकर (Global Positioning System Tracker) म्हटलं जातं. खेळाडूंच्या तयारीचं आणि कामगिरीचं विश्लेषण करण्याची पद्धत बदलून टाकणाऱ्या या तंत्रज्ञानाने क्रीडाविश्वात मोठी क्रांती घडवली आहे. सुरुवातीला जीपीएस ट्रॅकरचा वापर खेळाडूने मैदानावर किती अंतर धावलं, एवढीच माहिती मिळवण्यासाठी केला जात होता. मात्र आता हे उपकरण अधिक प्रगत झालं आहे. यात अॅक्सेलरोमीटर असल्याने खेळाडू किती वेगाने धावत आहे, किती वेळा वेग वाढवत किंवा कमी करत आहे, याची अचूक नोंद घेतली जाते.

तसेच जायरोस्कोप आणि मॅग्नेटोमीटरच्या मदतीने खेळाडूच्या शरीराच्या हालचालींचं त्रिमितीय (3D) विश्लेषण, दिशेतील बदल आणि मैदानावरील त्याची अचूक स्थिती टिपली जाते. याशिवाय, हार्ट रेट मॉनिटरच्या साहाय्याने हृदयाचे ठोके मोजले जातात आणि त्यावर आधारित अत्याधुनिक अल्गोरिदमद्वारे खेळाडूचा थकवा व सरावाची तीव्रता यांचंही विश्लेषण केलं जातं.

या सर्व आकडेवारीची नोंद एका डेटाबेसमध्ये केली जाते. प्रशिक्षक आणि विश्लेषक (Analyst) ही माहिती सामन्यादरम्यान रिअल-टाइममध्ये पाहू शकतात. तसेच आठवडे किंवा महिनाभरातील सरावाच्या आकडेवारीची तुलना करून खेळाडूची प्रगती, फिटनेस आणि दुखापतीचा संभाव्य धोका यांचाही अचूक अंदाज घेता येतो.

विराट कोहलीनेही वापरलं होतं हे व्हेस्ट

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा फिटनेसबाबत अत्यंत जागरूक खेळाडू म्हणून ओळखला जातो. २०१९ मध्ये खेळताना विराट कोहलीने हे उपकरण वापल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. याशिवाय जसप्रीत बुमराहदेखील हे ट्रॅकिंग व्हेस्ट वापरतो. भारतीय क्रिकेट संघाच्या फिटनेसमध्ये झालेल्या या मोठ्या परिवर्तनामागे जीपीएस ट्रॅकिंग व्हेस्टचाही महत्त्वाचा वाटा असल्याचं मानलं जातं.

कोणत्या कंपनीचं आहे हे उपकरण?

या तंत्रज्ञानाचा पहिला नमुना (प्रोटोटाइप) २००० साली कॅटापल्ट स्पोर्ट्स (Catapult Sports) या कंपनीने विकसित केला. ही कंपनी ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट (AIS) आणि को-ऑपरेटिव्ह रिसर्च सेंटर्स (CRC) या ऑस्ट्रेलियन सरकारी संस्थांच्या संयुक्त प्रकल्पातून उभी राहिली. या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश खेळाडूंची चाचणी प्रयोगशाळेऐवजी प्रत्यक्ष मैदानावर घेता यावी, हा होता.

सुरुवातीच्या काळातील जीपीएस उपकरणं इतकी मोठी होती की ती खेळाडूंना परिधान करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांचा वापर रोईंग बोटींवर करून त्यांच्या हालचालींचं मोजमाप केलं जात असे. २००२ पर्यंत हे उपकरण इतकं लहान झालं की ते खेळाडूंच्या शरीरावर लावणं शक्य झालं. मात्र, त्यावेळी ते केवळ खेळाडूने मैदानावर किती अंतर धावलं, याचीच माहिती देऊ शकत होतं.

पुढील तीन वर्षांत या उपकरणात अधिकाधिक अत्याधुनिक सेन्सर्स बसवण्यात आले आणि त्याचा आकारही आणखी लहान करण्यात आला. अखेर २००६ मध्ये हे तंत्रज्ञान व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करण्यात आलं. आज कॅटापल्ट स्पोर्ट्सचे जगभरातील ३९ विविध क्रीडा प्रकारांतील सुमारे ३,००० क्लब आणि संघ ग्राहक आहेत. यामध्ये भारताचे फुटबॉल आणि हॉकी संघही सहभागी आहेत.