मोहम्मद शमी तब्बल अडीज वर्ष म्हणजेच २०२३ नंतर भारताकडून कसोटी सामना खेळलेला नाही. शमी दुखापतीतून सावरला असला तरी त्याची कसोटी संघात निवड करण्यात आलेली नाही. वेस्ट इंडिजविरूद्ध घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेसाठी त्याची निवड होण्याची अपेक्षा होती, पण तो फिट नसल्याचं समजलं. यानंतर तो रणजी सामन्यांमध्ये कमालीच्या फॉर्मात दिसला. यानंतर त्याची दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आगामी कसोटीसाठीही निवड झाली नाही. यानंतर आता शमीच्या निवडीबाबत चर्चा होत असताना मोठी अपडेट समोर आली आहे.

अलीकडेच शमीने निवडकर्ते संवाद साधत नाहीत, असा आरोप केला होता. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने तीन सामन्यांत ९३ षटकं टाकून १५ बळी घेतल्यानंतरही त्याला दक्षिण आफ्रिका कसोटीसाठी दुर्लक्षित करण्यात आल्याने त्याने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता बीसीसीआयसंबंधित एका व्यक्तीने शमीचे दावे फेटाळून लावले आहेत.

निवड समितीने शमीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी खेळण्याची विनंती केली होती, पण शमीने बोर्डाची ही विनंती स्पष्टपणे नाकारली, अशी माहिती रिपोर्टमध्ये समोर आली आहे. शमी यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अखेरचा खेळताना दिसला होता. यानंतर त्याने भारताकडून कोणत्याच फॉरमॅटमध्ये सामना खेळलेला नाही.

दुखापतीतून सावरल्यानंतर शमी आता निवड प्रक्रियेत प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांसारख्या तरुण वेगवान गोलंदाजांशी स्पर्धा करत आहे. वयाचाही मुद्दा आहेच आणि त्यामुळे त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता अत्यंत कमी मानली जात आहे. अनेकांच्या मते, इंग्लंड दौरा टाळण्याचा शमीचा निर्णयच त्याच्या पुनरागमनाच्या शक्यतांवर पाणी फेरणारा ठरला आणि तोच त्याच्या सध्याच्या स्थितीमागचं मुख्य कारण असू शकतं.

“बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समधील निवडकर्ते आणि सपोर्ट स्टाफ यांनी शमीची प्रकृती आणि तयारी जाणून घेण्यासाठी अनेक वेळा संपर्क साधला होता. जसप्रीत बुमराह तीनपेक्षा जास्त कसोटी खेळू शकत नाही, त्यामुळे निवड समितीला इंग्लंड दौऱ्यासाठी शमीची उपस्थिती हवीच होती. इंग्लंडच्या परिस्थितीत अशा दर्जेदार गोलंदाजाला कोण नको म्हणेल?” असं एका वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं.

“म्हणूनच शमीशी कोणताही संवाद साधला गेला नाही, हा जो कथित दावा आहे तो अजिबात योग्य नाही. स्पोर्ट्स सायन्स टीमकडेही त्याचे वैद्यकीय अहवाल आहेत आणि त्याच्या शरीराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा ताण सहन करू शकेल की नाही हेदेखील त्यांना माहित होतं,” असं त्यांनी पुढे म्हटल्याचं रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.