आयपीएल स्पर्धेची पाच जेतेपदं नावावर असणाऱ्या मुंबई इंडियन्सला रविवारी आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर गाशा गुंडाळावा लागणार हे स्पष्ट झालं. स्टार खेळाडूंचा वलयांकित संघ, जेतेपदाचे दावेदार, प्रचंड असा सपोर्ट स्टाफ असं सगळं असतानाही मुंबई इंडियन्स संघाची यंदाची कामगिरी यथातथाच राहिली. मुंबईची अवस्था बडा घर पोकळ वसा अशी झाली आहे. सलग तिसऱ्या हंगामात प्लेऑफ गाठता न आल्याने येत्या काळात मुंबई संघात मोठे बदल होऊ शकतात. हार्दिकने नेतृत्व हाती घेतल्यानंतर २०२४ मध्ये मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिला. गेल्या वर्षी मुंबईने प्लेऑफमध्ये प्रवेश केला पण त्यांना चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं. यंदा तर त्यांना प्लेऑफचा टप्पाही गाठता आलेला नाही.

जिंकण्याची भूक नाही

पाच जेतेपदं आणि दमदार इतिहास पाठीशी असतानाही मुंबई इंडियन्सचा संघ यंदा विस्कळीत, निरुत्साही आणि कंटाळलेला वाटला. हारजीत होत राहते पण जिंकण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करता येतात. यंदा मुंबईच्या खेळात जिंकण्याची भूक जराही दिसली नाही. उपचार म्हणून खेळत असल्याप्रमाणे खेळाडूंची देहबोली वाटली. दोन महिने स्पर्धा आयोजित केली आहे, सहभागी होणं भाग आहे, चला खेळूया असाच दृष्टिकोन दिसला. प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत जिंकणारा संघ अशी मुंबईची ओळख होती. मात्र यंदा प्रतिस्पर्धी संघांनीच मुंबईवर वर्चस्व गाजवलं. बॅटिंग असो किंवा बॉलिंग किंवा फिल्डिंग- तिन्ही आघाड्यांवर मुंबईचे खेळाडू ढेपाळलेले वाटले. सामना जिंकण्यासाठी एकाने पुढाकार घेतला तर त्याला बाकीच्यांनी साथ देणं अपेक्षित असतं. यंदा तसं एकदाही होताना दिसलं नाही. बाकी संघ मुंबईसमोर खेळताना दडपणाखाली असतात कारण इतक्या वर्षात मुंबईने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र यंदा बाकी संघाने मुंबईचा ठरवून समाचार घेतला.

अनुभवी खेळाडूंचं अपयश

सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट हे प्रमुख खेळाडू एकाचवेळी अपयशी ठरल्याने मुंबई इंडियन्स संघावर गाशा गुंडाळण्याची वेळ ओढवली आहे. सूर्यकुमार यादवला मनगटाच्या दुखापतीने त्रस्त केलं आहे अशा बातम्या समोर आल्या होत्या पण मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने अशा कोणत्याही बातमीला दुजोरा दिलेला नाही. ५१, ६, ३३, ०, १५, ३६, ५, २१, १२, ० ही कामगिरी सूर्यकुमारच्या लौकिकाला साजेशी नाही. सूर्यकुमार मधल्या फळीचा आधारस्तंभ आहे. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. अशावेळी सूर्याचं अपयश हे मुंबईच्या घसरगुंडीचं कारण ठरलं. जागतिक टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी राहिलेल्या सूर्यकुमारचे कच्चे दुवे प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या लक्षात आले आहेत. सूर्या वारंवार त्या सापळ्यात अडकत होता. होणाऱ्या चुकांतून त्याने बोध घेत खेळात सुधारणा केली नाही त्यामुळे तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी वॉकिंग विकेट ठरत गेला. जी कथा सूर्यकुमारची ती गोलंदाजांच्या बाबतीत जसप्रीत बुमराहची. बुमराह हा मुंबई इंडियन्सचं प्रमुख अस्त्र आहे. धावा रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्या बुमराह समर्थपणे सांभाळतो. मात्र सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्याचा थकवा बुमराहच्या खेळात जाणवला. १० सामन्यात मिळून बुमराहला फक्त ३ विकेट्स मिळवता आल्या. मुंबईविरुद्ध खेळताना १६षटकंच खेळतोय असं समजा कारण बुमराहच्या स्पेलमध्ये फार काही करता येणार नाही असा सल्ला प्रशिक्षक देत. यंदा याच्या विपरीत घडलं. बुमराहच्या गोलंदाजीवर नवखे फलंदाजही चौकार,षटकार वसूल करताना दिसले. हाणामारीच्या षटकात टिच्चून मारा करणारा बुमराह यंदा दिसलाच नाही. नेतृत्वाच्या बरोबरीने हार्दिक फलंदाज आणि गोलंदाज म्हणूनही यंदा फारशी छाप पाडू शकला नाही. खणखणीत फटकेबाजीसाठी प्रसिद्ध हार्दिक यंदा अगदी झटपट बाद होताना दिसला. गोलंदाजी करताना धावा रोखण्यात त्याला अपयश आलं. विकेट्सच्या बाबतीतही त्याची कामगिरी सर्वसाधारण राहिली. तीन प्रमुख खेळाडूंचं एकाचवेळी अपयश मुंबई इंडियन्सला चांगलंच महागात पडलं. रोहित शर्मा दुखापतीमुळे बरेच सामने खेळूच शकला नाही. रोहित फिट असता आणि सगळे सामने खेळू शकला असता तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. अनेक वर्ष पॉवरप्ले स्पेशालिस्ट म्हणून ट्रेंट बोल्टने ठसा उमटवला आहे. पहिल्या षटकात विकेट पटकावण्यात माहीर अशी बोल्टची ओळख आहे. मात्र यंदा बोल्टला विकेट्स आणि धावा रोखणं दोन्हीमध्ये अपयश आलं. बोल्टला संघातून वगळावं लागलं.

अनाकलनीय डावपेच

माहेला जयवर्धने हे अतिशय निष्णात प्रशिक्षक मानले जातात. श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि फलंदाजीतील आधारवड जयवर्धने यांनी मार्क बाऊचर यांच्याकडून प्रशिक्षकपदाची सूत्रं स्वीकारली. पण यंदाच्या हंगामात जयवर्धने यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करवून घेता आली नाही. इम्पॅक्ट प्लेयर हा संघाच्या भल्यासाठी असतो. संघाला अतिरिक्त गोलंदाज किंवा अतिरिक्त फलंदाज खेळवता येतो. सनरायझर्सविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत शार्दूलला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून घेतलं. पण त्याला एकही ओव्हर दिली नाही. शार्दूल अनुभवी गोलंदाज आहे. भागीदारी फोडण्यात निष्णात आहे. तरीही गोलंदाजी दिली नाही. गोलंदाजी द्यायचीच नव्हती मग इम्पॅक्ट प्लेयर म्हणून घेतलंच कशाला असा सवाल चाहत्यांनी केला होता. आरसीबीविरुद्धच्या लढतीत रोहित शर्माच्या जागी फिरकीपटू रघू शर्माला घेण्यात आलं. त्यालाही एकही ओव्हर देण्यात आली नाही. दुखापतग्रस्त असल्यामुळे मुंबईने अथर्व अंकोलेकरऐवजी क्रिश भगतची निवड केली. मात्र काही दिवसांपूर्वी अथर्व ठाणे प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला. अथर्वला संघातून रिलीज करण्याची एवढी घाई का करण्यात आली याचं उत्तर मुंबई संघव्यवस्थापनाकडे नाही. १३ वर्षानंतर मुंबईने हंगामातील सलामीचा सामना जिंकला. शार्दूल ठाकूर या विजयाचा शिल्पकार ठरला होता. मात्र काही सामन्यांनंतर शार्दूलला अंतिम अकरातून बाजूला करण्यात आलं. दीपक चहर प्रभाव पाडत नसतानाही शार्दूलला बाहेर ठेऊन दीपकला खेळवण्यात आलं. मुंबईने लिलावापूर्वीच ट्रेडऑफमध्ये शेरफन रुदरफोर्डला घेतलं होतं. रुदरफोर्ड उत्तम फॉर्मात असूनही त्याला सगळ्या सामन्यात खेळवण्यात आलं नाही.

वानखेडेचा बालेकिल्ला ढासळला

वानखेडे स्टेडियम हा मुंबई इंडियन्सचा बालेकिल्ला मानला जातो. यंदाच्या हंगामात या बालेकिल्ल्याला भगदाड पडलं. चाहत्यांचा मिळणारा प्रचंड पाठिंबा हे वानखेडेचं ठळक लक्षण आहे. यंदाही या पाठिंब्यात जराही कमी झाली नाही पण मुंबई इंडियन्स संघाला चाहत्यांच्या प्रेमाला जागता आलं नाही. वानखेडेची खेळपट्टी कशी आहे, वारा कुठून वाहतो, चेंडू स्विंग होतो का, दव पडतं का, उकाडा किती असू शकतो या गोष्टींची सखोल माहिती असतानाही मुंबई इंडियन्सचा संघ घरच्याच मैदानावर फ्लॉप ठरताना दिसला. आरसीबीने वानखेडेवर झालेल्या मुकाबल्यात २४० धावांचा डोंगर उभारला. चेन्नईनेही वानखेडेवर दोनशेची वेस ओलांडली. वानखेडेवर सर्वसाधारणपणे टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली जाते. प्रतिस्पर्धी संघाला आटोक्यात रोखून त्या धावसंख्येचा पाठलाग करायचा हे मुंबई इंडियन्सचं सूत्र असतं. यंदा तसं झालं नाही. मुंबई इंडियन्स संघाने घरच्या मैदानावर चार सामने गमावले आणि जे जिंकले त्यातही त्यांना दणदणीत वर्चस्व गाजवता आलं नाही. घरच्या मैदानावर खेळणं तुलनेनं सोपं असतं कारण भवताल ठाऊक असतो. चाहते १२वा खेळाडू होऊन भरभरून पाठिंबा देतात. चांगलं, दर्जेदार खेळण्यासाठी पोषक परिस्थिती असते. मुंबईला या सगळ्याचा फायदा उठवता आला नाही.

सक्षम नेतृत्वाचा अभाव

मुंबई इंडियन्स संघाची लोकप्रियता प्रचंड आहे. आधीच्या हंगामांमध्ये सचिनचा संघ अशी मुंबई इंडियन्सची ओळख होती. त्यानंतर मुंबईचा राजा रोहित शर्माचा संघ अशी मुंबई इंडियन्सची प्रतिमा झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वातच मुंबई इंडियन्स संघाने तब्बल पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं. भविष्याच्या दृष्टीने मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने रोहितला कर्णधारपदावरून बाजूला करून हार्दिक पंड्याला कर्णधार केलं. त्या हंगामात हार्दिकला सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षही प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. टी२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर हे ट्रोलिंग थांबलं. मात्र हार्दिकचं नेतृत्व मुंबई इंडियन्स संघाच्या पचनी पडलेलं नाही हे खरं. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने पदार्पणाच्या हंगामात जेतेपदावर नाव कोरलं. दुसऱ्या वर्षी गुजरातने एका हंगामाचा चमत्कार नसल्याचं सिद्ध करत फायनलमध्ये धडक मारली. ही किमया हार्दिकला मुंबई इंडियन्ससंदर्भात करता आलेली नाही. गुजरात टायटन्स संघात हार्दिक हाच कर्तृत्वाने तसंच ब्रँड म्हणून एकमेव मोठा खेळाडू होता. लो प्रोफाईल असा तो संघ होता, आहे. पण मुंबई इंडियन्स संघात एकापेक्षा एक मोठे खेळाडू आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने पाच जेतेपदं पटकावली आहेत. रोहितनेच भारताला टी२० वर्ल्डकप जिंकून दिला आहे. सूर्यकुमार यादव भारताच्या टी२० संघाचा कर्णधार आहे. सूर्याच्या नेतृत्वात महिनाभरापूर्वी भारतीय संघाने टी२० वर्ल्डकप जिंकला. जसप्रीत बुमराह सध्याच्या घडीचा जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. बुमराहने देखील भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. क्विंटन डी कॉक हा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आहे. मिचेल सँटनर हा न्यूझीलंडचा टी२० कर्णधार आहे. एका संघात एवढे सारे अनुभवी कर्णधार असणं हेच दुर्मीळ आहे. हार्दिकने ठरवलेलं ध्येयधोरण आणि दृष्टिकोन याच्याशी संघातले खेळाडू सहमत नसल्याचं जाणवलं. हार्दिक आपलं म्हणणं लादत असल्याचंही पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणासंदर्भात निर्णय असो किंवा गोलंदाजीत बदल- कॉर्पोरेट भाषेत म्हणतात तसं हार्दिक आणि त्याचा संघ सेम पेजवर नसल्याचं वारंवार दिसून आलं.