मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२६ स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने ५ वेळेस जेतेपदाचा मान पटकावला. पण आता प्लेऑफ गाठणंही कठीण झालं आहे. मुंबई इंडियन्सचा संघ या स्पर्धेतील बलाढ्य संघापैकी एक आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्यासारखे वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू संघात असूनही मुंबईचा संघ एका पाठोपाठ एक सामने का गमावतोय? काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

सतत प्रयोग करणं…

कधी गोलंदाजी चांगली होते तर फलंदाज फ्लॉप ठरतात. तर फलंदाजांनी चांगली कामगिरी केली की गोलंदाज फ्लॉप ठरतात. मुंबईचा संघ सुपरफ्लॉप कामगिरी करण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सतत प्रयोग करणं. मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग ११ मध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात रायन रिकल्टन आणि विल जॅक्सची जोडी मैदानावर उतरली होती. ही या हंगामातील पाचवी सलामी जोडी ठरली. सतत बदल केल्यामुळे मुंबईला हवं तसं टीम कॉम्बिनेशन मिळालेलं नाही.

आतापर्यंत २२ खेळाडूंना संधी

मुंबई इंडियन्सला अजूनही परफेक्ट कॉम्बिनेशन मिळू शकलेलं नाही. मुंबईने आतापर्यंत २२ खेळाडूंना संधी दिली आहे. या हंगामात सर्वाधिक खेळाडूंना संधी देणाऱ्या संघांच्या यादीत मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी आतापर्यंत १९-१९ खेळाडूंना संधी दिली आहे.

कर्णधार आणि टीम मॅनेजमेंट यांच्यातील वाद?

स्पर्धेतील पहिलाच सामना जिंकल्यानंतर पुढील सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सतत पराभव होत असताना प्लॅन बी असणं गरजेचं असतं. पण मुंबई इंडियन्सकडे कुठलाही प्लॅन बी नसल्याचं दिसून येत आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी मुंबईकडे तसा फलंदाज उपलब्ध नाही. तसेच सूर्यकुमार यादव सातत्याने फ्लॉप ठरतोय. तो काही चेंडू खेळून बाद होतोय आणि माघारी परततोय. मुंबईला स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवायचं असेल, तर मुंबईला कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.

मुंबई इंडियन्सने या हंगामातील पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत करून दमदार सुरुवात केली होती. या संघाने ८ सामने खेळले आहेत. यापैकी केवळ २ सामने जिंकता आले आहेत. तर ६ सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ४ गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत ९ व्या स्थानी आहे.