No India vs Pakistan Match In ICC Womens Champions Trophy: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा मिनी वर्ल्डकप स्पर्धा म्हणून ओळखली जाते. २०२५ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करून जेतेपदाचा मान पटकावला होता. आता पहिल्यांदाच महिलांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या ऐतिहासिक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. हे सामने ब्रेबॉर्न आणि वडोदरा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. पण या स्पर्धेत भारत – पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळणार नाही. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

बीसीसीआयकडून २ सप्टेंबरला आगामी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ स्पर्धेची तारीख आणि ठिकाणं जाहीर करण्यात आली. या स्पर्धेतील सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि वडोदऱ्यातील वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत पाकिस्तान वगळता, भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड , न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या ६ संघांचा समावेश असणार आहे. याआधी या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडे होते. पण राजनैतिक हस्तक्षेपामुळे आयसीसीने श्रीलंकेकडून यजमानपद काढून घेतलं.

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी का खेळणार नाही?

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येत असतात. पण यावेळी महिलांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत- पाकिस्तान सामना पाहायला मिळणार नाही. हे आयसीसीच्या रँकिंगवर अवलंबून होतं. भारतीय संघ यजमान संघ असल्याने स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला. पण उर्वरीत ५ संघांसाठी ६ जुलै कटऑफ डेट होती. या यादीतील टॉप ६ संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरणार होते. पाकिस्तानचा संघ टॉप ६ संघांच्या यादीतून बाहेर असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पात्र ठरू शकलेला नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन वनडे फॉरमॅटमध्ये केले जाते. पण पहिल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हे टी-२० फॉरमॅटमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना थरारक सामने पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेची सुरूवात १४ फेब्रुवारीला होणार असून स्पर्धेतील अंतिम सामना २८ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील सामने ब्रेबॉर्न आणि वडोदरा क्रिकेट असोसिएशन या २ मैदानांवर खेळवले जाणार आहेत.