Novak Djokovic wins Gold Medal & gets emotional: उत्तुंग, उदात्त असं काही पाहिलं की एकदम भारी वाटतं, स्फुरण चढतं आणि त्याचवेळी छाती दडपूनही जाते. एकदम खजील वाटतं. आपण एकदमच लुख्खा असल्याची जाणीव होते. घर आहे, जेवायला आहे, नोकरी आहे हे असूनही आपल्या हातून उल्लेखनीय काही घडत नसल्याची टोचणी राहते. या जीवनाचं काय करू? या शीर्षकाचं अभय बंगांचं पुस्तक आहे. युवा वर्गासाठी त्यांनी केलेल्या भाषणांचा संग्रह आहे. नोव्हाक जोकोव्हिचला पाहिल्यावर तिशीत आलेल्या आणि चाळिशीकडे झुकलेल्या बहुतांश माणसांना हेच वाटतं. ३७व्या वर्षी सर्वसाधारण माणसं करिअरमध्ये चढउताराची सापशिडी खेळत असतात. जोकोव्हिच ३७व्या वर्षी संपृक्तावस्थेत आहे. टेनिसविश्वात जे जे जिंकण्यासारखं आहे ते त्याचं जिंकून झालंय. रविवारी संध्याकाळी जोकोव्हिचने सर्बियासाठी सुवर्णपदक जिंकलं आणि एक अनोखं वर्तुळ पूर्ण झालं. संघर्ष कोणाला चुकलेला नाही. खाचखळगे सगळ्यांनाच लागतात. प्रश्न फेर धरतात, समस्या वेढा देतात, अडचणी मानगुटीवर बसतात. आपण या सगळ्यांच्या गर्तेत सापडतो. जोकोव्हिचही सापडतो पण तो वाट काढतो. काट्याकुट्यातून का असेना, ठेचकाळत तो येतोच. हेही वाचा: अग्रलेख : खांदेपालटाची खुमारी… अगदी गेल्या आठवड्यातली गोष्ट. विम्बल्डन स्पर्धेत जोकोव्हिचचा (Novak Djokovic) हॉल्गर रुनविरुद्ध सामना होता. रुनला समर्थन करता करता प्रेक्षकांनी जोकोव्हिचची हुर्यो उडवली. जिंकल्यानंतर बोलताना तो म्हणाला- रुनला पाठिंबा देण्याचा हक्क तुम्हाला नक्कीच आहे. तो चांगलाच खेळाडू आहे. पण याचा अर्थ तुम्ही मला त्रास देऊ शकाल असा होत नाही. खेळाचा सन्मान करा, खेळाडूंचा आदर करा. तुम्ही मला विचलित करू शकत नाही. मी २० वर्ष खेळतो आहे. खेळाडूंना भडकावण्याकरता काय काय केलं जातं याची मला पूर्ण कल्पना आहे. विम्बल्डन ही जगातल्या सर्वोत्तम स्पर्धांपैकी एक आहे. ती जिंकण्याची प्रत्येकाला संधी आहे. प्रत्येकजण इथे जिंकण्यासाठीच येतो. त्यांच्या इथवरच्या वाटचालीचा आदर करा. नम्र पण ठाशीवपणे जोकोव्हिच असं काही बोलला की नंतर त्याची हुर्यो उडवण्याची कोणाची हिंमत झाली नाही. हेही वाचा - Paris Olympics 2024: नोव्हाक जोकोव्हिचची ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी, अल्काराजचा पराभव करत घडवला इतिहास आठवडाभरानंतर जोकोव्हिचला फायनलमध्ये सरळ सेट्समध्ये कार्लोस अल्काराझने नमवलं. हरल्यानंतरही जोकोव्हिच अल्काराझबद्दल जे बोलला ते टिपून ठेवावं असं होतं. तो म्हणाला, 'अल्काराझच्या खेळात मी, फेडरर आणि नदाल यांच्यातले चांगल्या गोष्टी एकत्रित आहेत. लोक गेले दोन वर्ष असं म्हणत होते, मी या मताशी सहमत आहे. स्पेनच्या खेळाडूंकडे कुठूनही पुनरागमन करण्याची, हार न मानण्याची वृत्ती असते. अल्काराझकडे ती आहे. बॅकहँड ही माझी ताकद होती, आहे. आज अल्काराझने त्यावरही प्रभुत्व असल्याचं सिद्ध केलं. मी त्याच्यासारख्या खेळाडूविरुद्ध खरंच खेळलो नाहीये. रॉजर आणि राफा यांची स्वत:ची बलस्थानं होती आणि काही कच्चे दुवे होते. कार्लोस हा परिपूर्ण असा खेळाडू आहे. त्याने परिस्थितीशी अतिशय सहजतेने जुळवून घेत खेळ केला. सगळ्या प्रकारच्या कोर्टवर त्याचा खेळ उत्तम आहे. हरणं स्वीकारणं कठीणच असतं पण मी एका दर्जेदार खेळाडूविरुद्ध हरलो याचं समाधान आहे. भविष्यात ग्रँड स्लॅम विजयांचा उल्लेख होईल तेव्हा या मुलाचं नाव तुम्ही सातत्याने ऐकाल'. ज्याच्याविरुद्ध जिव्हारी लागणारा पराभव झाला त्याच्याबद्दल जोकोव्हिच इतकं भरभरून बोलला. हेही वाचा - Paris Olympics 2024: नोहा लायल्स ठरला जगातला वेगवान माणूस; ०.००५ सेकंदाच्या फरकासह १०० मीटर शर्यतीचं पटकावलं सुवर्णपदक त्याच अल्काराझला त्याने आज लोळवलं. जून महिन्यात जो माणूस गुडघ्यावरच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होता. त्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात वयाच्या ३७व्या वर्षी तरण्याबांड अल्काराझला चीतपट करत सर्बियासाठी सुवर्णपदक (Paris Olympics 2024) पटकावलं. युद्धग्रस्त सर्बियात डोक्यावरून विमानं घोंघावत असताना जगण्याची भ्रांत होती. तेव्हा टेनिस ही आवड पक्की केलेल्या नोव्हाकला देशासाठी जगातल्या सर्वोच्च अशा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावू असं वाटलं असेल का.. त्याने ते आज प्रत्यक्षात साकारलं आहे. जिंकल्यानंतर जवळपास अर्धा तास तो ढसाढसा रडत होता. जीए कुलकर्णी म्हणतात तसं हे सुवर्णपदक त्याला आतड्यापासून हवं होतं. समोर कुणीही असता, कितीही खडतर सामना असता तरी जोकोव्हिचने जीव पणाला लावत तो जिंकला असता. ज्या सर्बियाने त्याला उभं केलं त्या सर्बियापुत्राने आज देशवासीयांची मान गर्वाने उंचावली. नोवाक जोकोव्हिच पॅरिस ऑलिम्पिक सुवर्णपदक जोकोव्हिच हा कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. त्याच्याभोवती फेडररसारखी प्रभावळ नाही. नदालसारखा करिश्मा नाही. हे तिघे एकाच कालखंडात खेळणं हा नियतीने जमून आणलेला सर्वोत्तम डाव म्हणायचा. फेडररने परंपरा सुरू केली, नदालने मशालीने ज्योत तेवत ठेवली, जोकोव्हिच या मांदियाळीत नंतरच आला. पण त्याने ही परंपरा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. या तिघांचे एकमेकांविरूद्धचे सामने टीव्हीवर पाहूनही चाहते दमतात. त्यांची खेळून काय अवस्था होत असेल. तिघांनीही जिंकणं ही सवय करुन घेतली. रॅकेट उचलायची ती कप पटकावण्यासाठीच. असे दोन भिडू अल्याड पल्याड असताना जोकोव्हिच दोघात तिसरा झाला. फेडरर-नदालला आव्हान देणारं कोणी नाही अशी चर्चा असतानाच जोकोव्हिच अवतरला. गायकांची घराणी असतात, त्यांचे त्यांचे शिष्य असतात. टेनिसविश्वात ही तीन घराणी आहेत. फेडररप्रेमी, नदालप्रेमी, जोकोव्हिचप्रेमी. आपापल्या दैवताशी त्यांची निष्ठा आहे. फेडररच्या व्यक्तिमत्वाला एक अलौकिक भारलेपण आहे. नदाल मैदानावर जितका स्पॅनिश बुल भासतो तितकाच मैदानाबाहेर अदबशीर माणूस आहे. पण जोकोव्हिच हे वेगळंच रसायन आहे. तो सहकारी टेनिसपटूंच्या उत्तम नकला करतो. पावसामुळे मॅच थांबलेली असताना बॉलबॉयला बोलावून त्याला शेजारी बसवतो. त्याच्या डोक्यावर छत्री धरतो. तो उत्तम नाचतो. तो चिडतो, रॅकेट फोडतो, आनंदाच्या भरात टीशर्टही फाडतो. विम्बल्डन जिंकला की तिथलं गवत खातो. त्याचवेळी तो प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देतो. फेडरर-नदालला जसं महानत्व चाहत्यांनी बहाल केलं आहे तसं आपल्याला देत नाहीत याची त्याला जाणीव आहे. त्याच्याविषयी एक अढी आहे हेही त्याला माहितेय. पण तो याने त्रासून जात नाही. २४ ग्रँड स्लॅम, १ ऑलिम्पिक गोल्ड, १ डेव्हिस कप जेतेपद, खंडीभर एटीपी टायटल्स- तुम्ही महान म्हणा अथवा म्हणू नका. काम तर बोलतंय! हेही वाचा - Paris Olympics 2024 : स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये उष्णतेमुळे खेळाडू हैराण, भारताच्या क्रीडा मंत्रालयाने पुरवले ४० एसी, VIDEO व्हायरल बिनलशीचा चॅम्पियन तुम्ही आम्ही कोरोनाची लस घेतलेय. काहींनी बुस्टर डोसही घेतलाय. जोकोव्हिचने कोरोनाची लस घेतलेली नाहीये. लस न घेण्यामागचा विचार त्याने स्पष्टपणे सांगितला. कोरोना लस घेतलेली नसल्याने त्याला ऑस्ट्रेलियातून बाहेर काढण्यात आलं. कायदेशीर लढाई लढावी लागली. त्यानंतर तिथल्या कोर्टाने देश सोडा असं सांगितल्यावर त्याने देश सोडला. त्याने जेतेपदावर पाणी सोडलं पण लस घेतली नाही. "माझ्या शरीरासंदर्भात निर्णय घेण्याचा मला अधिकार आहे. कोणत्याही जेतेपदापेक्षा हा अधिकार मला महत्त्वाचा वाटतो. शरीराला सुसंगत गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न आहे. वेलनेस, वेलबिइंग, हेल्थ-न्यूट्रिशन्स या सगळ्याचा मी अभ्यासक आहे. त्यासाठीच मी आहारात बदल केले, स्लीपिंग पॅटर्न्स बदलले. कोरोनाविरुद्ध अख्खं जग लढत आहे. मी लशीच्या विरोधात नाही. भविष्यात कदाचित लस घेईनही. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न झाले", असं जोकोव्हिचने सांगितलं होतं. ग्लुटेनचे पदार्थ शरीराला जे पुरवतात ते अन्य कोणते पदार्थ देतात याचा शोध घेऊन ते खायला सुरुवात केली. काही काळानंतर डेअरी उत्पादनंही सोडली. मग तर तो शुद्ध शाकाहारी झाला. उमेदीच्या काळात जोकोव्हिचला दम्याचा त्रास होता. टेनिस खेळणाऱ्या माणसाला दम्याचा त्रास म्हणजे गाणाऱ्याचा घसा खराब होण्यासारखं. जोकोव्हिचने त्यासाठी उपचार घेतले. काय टाळायला हवं ते जाणून घेतलं. त्याने दम्यालाही हरवलं. मुळातच फेडरर-नदाल ऐन भरात असताना टेनिस खेळावं हे वाटणंही विलक्षणच म्हणायला हवं. टेनिस हा अगदीच वैयक्तिक स्वरुपाचा खेळ. समोरासमोर मुकाबला करावा लागतो. बाकी कुणी साथीला येऊ शकत नाही. फेडरर आणि नदाल यांची ग्रँड स्लॅम जेतेपदांवर मक्तेदारी होती. त्याकाळात अनेकांनी ही तटबंदी भेदण्याचा प्रयत्न केला पण त्यांना माघारी फिरावं लागलं. जोकोव्हिच धडका देत राहिला. त्याने हळूहळू जागा निर्माण केली. मक्तेदारीला इंग्रजीत मोनोपोली म्हणतात. त्याच्या पुढच्या स्थितीला फार चांगली संकल्पना आहे, ती म्हणजे हेजमोनी. फेडरर-नदाल-जोकोव्हिच त्या पातळीला गेले. प्रस्थापितांना बाहेरचे नकोच असतात. जोकोव्हिच आतला कधी झाला कळलंच नाही. या त्रिकुटाच्या सद्दीत अनेकांनी हाय खाल्ली. डेव्हिड फेरर हा नदालचा घट्ट मित्र. तो अनेक वर्ष खेळला पण ग्रँड स्लॅम त्याच्या नशिबी आलं नाही. असे अनेक खेळले, परत गेले. जोकोव्हिच परत गेला नाही. या तिघांमध्ये श्रेष्ठ कोण ही चर्चाच करू नये. अफलातून, अद्भुत असा आनंद देणाऱ्या टेनिससाधकांना आपण का तोलावं? आपण आपल्या अल्पमतीने जेवढा शक्य होईल तेवढा आनंद घ्यावाच आणि त्याहूनही जास्त म्हणजे प्रेरणा घ्यावी. ३७व्या वर्षी सुटलेलं पोट, ईएमआयची गणितं, नोकरीतली टेन्शनं याने ग्रस्त आयुष्यांना जोकोव्हिचसारख्या प्रेरकाची गरज आहे. जोकोव्हिच टेनिस खेळतो का टेबल टेनिस का अॅथलेटिक्स हे तितकंसं महत्त्वाचं नाही. तो काहीही खेळत असता तरी असाच जिंकत गेला असता. मुद्दा जिंकण्याचाही नाही, लढण्याचा आहे. जोकोव्हिच हा एक माणूस असला तरी ती एक मानसिकता आहे. ऑलिम्पिक काय देतं याचं उत्तर जोकोव्हिच-अल्काराझ सामन्याने दिलं. जिंकल्यानंतर जोकोव्हिच ओक्साबोक्शी रडत होता आणि हरल्यामुळे अल्काराझही. विलोभनीय मावळणं आणि क्षितिजावरचा नवा आश्वासक किरण एकाचवेळी पाहण्याची अनुभूती! रविवार सार्थकी लागला म्हणायचं..