वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान सामन्याला युद्धाचा स्वरुप येतो. दोन्ही संघाचे खेळाडू आक्रमकपणे खेळताना दिसतात. मात्र वर्ल्डकपचा इतिहास पाहिला तर पाकिस्तानला भारताविरुद्ध एकदाही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे आगामी टी २० वर्ल्डकपमधील सामन्यापूर्वी दोन्ही बाजूने वाकयुद्ध सुरु झालं आहे. २४ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांच्या चाहत्यांनी विजयाचा दावा केला आहे. मात्र वर्ल्डकपमध्ये भारताचाच विजय का होतो? याचं कारण माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने सांगितलं आहे.
” २००३ वर्ल्डकप आणि २०११ वर्ल्डकपबद्दल बोलायचं झाल्यास आमच्यावर कमी दबाव होता. आमची स्थिती पाकिस्तानपेक्षा चांगली होती. आम्ही कधीच मोठमोठे दावे केले नाहीत. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून संघांची स्तुती करणारे मोठमोठी विधान समोर येतात. जसं की पाकिस्तानी अँकरने सांगितलं यावेळी आम्ही इतिहास बदलू. दुसरीकडे भारतीय संघ फक्त आपल्या रणनितीकडे लक्ष्य केंद्रीत करते. त्याचबरोबर दबाव चांगल्या प्रकारे हाताळते. त्यामुळे निकाल काय येणार आहे हे माहिती असतं”, असं विरेंद्र सेहवाने एबीपी न्यूजवर बोलताना सांगितलं.
पहिला वर्ल्ड कप १९७५ मध्ये एकदिवसीय प्रकारामध्ये खेळवला गेला होता. भारत आणि पाकिस्तान १९९२ मध्ये विश्वचषकात पहिल्यांदाच समोरासमोर आले होते. या विश्वचषकामध्ये पाकिस्तान विजेता होता पण इथेही त्याला भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. १९९२ पासून सुरू झालेला पाकिस्तानच्या पराभवाचा प्रवास हा २०१९ पर्यंत पोहचला आहे. १२ वेळा पाकिस्तान भारताकडून पराभूत झाला आहे. या १२ पैकी ५ पराभवांचा समावेश टी -२० वर्ल्डकपमध्ये आहे. म्हणजेच ७ वेळा भारताने एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव केला आहे.