आयपीएलचा १९वा हंगाम ऐन भरात आहे. त्याचवेळी शेजारी पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग सुरू आहे. सर्वसाधारणपणे पाकिस्तान सुपर लीग फेब्रवारीत आयोजित करण्यात येते. पण फेब्रुवारी महिन्यात टी२० वर्ल्डकप असल्याने पाकिस्तान सुपर लीग पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे दोन्ही स्पर्धा एकाच वेळी होत आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानच्या संघातील खेळाडू आयपीएलमध्ये खेळले होते. आश्चर्य वाटलं ना? दोन्ही देशांचे दुरावलेले संबंध पाहता पाकिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळले असतील असं वाटणारच नाही पण खेळले आहेत. जाणून घेऊया इतिहास.
इंडियन प्रीमिअर लीगच्या 2008 मध्ये झालेल्या पहिल्या हंगामात पाकिस्तानचे एक नव्हे तर ११ खेळाडू सहभागी झाले होते. मात्र त्यानंतरच्या कोणत्याही आयपीएलमध्ये एकही पाकिस्तानी खेळाडू सहभागी झालेला नाही.पहिल्यावहिल्या आयपीएलमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व केलेले युनिस खान, मिसबाह उल हक हे खेळाडू होते. जगातल्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये नोंद होणारे शाहिद आफ्रिदी, मोहम्मद हफीझ आणि शोएब मलिक खेळले होते.क्रिकेटविश्वात सर्वाधिक वेगाने बॉलिंग करणाऱ्या बॉलर्सच्या यादीत समाविष्ट शोएब अख्तर सहभागी झाला होता. शैलीदार बॅट्समन सलमान बट्ट आणि उंचपुरा उमर गुल त्याचे कोलकाता संघातले सहकारी होते.
राजस्थान रॉयल्सने युनिस खानच्या बरोबरीने कामरान अकमल आणि सोहेल तन्वीर यांच्यावर विश्वास ठेवला. सोहेलने या विश्वासाला सार्थ ठरत परपल कॅप पटकावली होती. आयपीएलमधील सर्वोत्तम बॉलिंग आकडे हा मान सोहेलच्या नावावर अकरा वर्षं होता. जगभराल्या बॅट्समनची भंबेरी उडवणारा मोहम्मद आसिफ दिल्लीकडून खेळला होता. गेल्या दशकभरात ट्वेन्टी-२० तसंच वनडेत सातत्याने चांगली कामगिरी करणारा मोहम्मद हफीझ कोलकाता संघाचा भाग होता. राहुल द्रविड, मार्क बाऊचर, जॅक कॅलिस, डेल स्टेन यांच्या बरोबरीने मिसबाह उल हक बेंगळुरू संघाचा भाग होता. थोडक्यात पाकिस्तानचे तत्कालीन सगळे प्रमुख खेळाडू २००८च्या आयपीएल स्पर्धेत विविध संघांकडून खेळले.
मुंबई, चेन्नई आणि पंजाब या संघांनी पाकिस्तानी खेळाडूंना समाविष्ट केलं नाही. आयपीएलचा पसारा वाढत गेला तसं खेळाडूंना मिळणारे पैसे आणि प्रसिद्धीही वाढत गेली. आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याचा फायदा अनेक खेळाडूंना राष्ट्रीय संघात निवडीसाठी झाला. आंतरराष्ट्रीय खेळाडूबरोबर एकत्र खेळण्याचा मोठा अनुभव मिळाला. २००८ हंगामात पाकिस्तानच्या खेळाडूंची कामगिरी चांगली झाली होती. पण त्यानंतर असं काही घडलं की ज्याच्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी आयपीएलची दारं कायमची बंद झाली.
मुंबईवर दहशतवादी हल्ला
त्याच वर्षी म्हणजे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ३४ विदेशी नागरिकांसह एकूण १६६ जणांनी जीव गमावला तर आठशेहून अधिक लोक जखमी झाले. या हल्ल्यात दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे, पोलीस निरीक्षक विजय साळसकर, एनएसजी कमांडो संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह एएसआय तुकाराम ओंबळे यांचा मृत्यू झाला.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तीन दिवस हे थरारनाट्य चाललं. मुंबई पोलीस आणि सुरक्षायंत्रणांनी मिळून ९ दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. अजमल कसाब हा जिवंत पकडण्यात आलेला एकमेव ठरला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मरण पावलेले सगळे हल्लेखोर पाकिस्तानचे होते. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तय्यबाचा हात असल्याचं स्पष्ट झालं. कसाब पाकिस्तानचा नागरिक असल्याचं पाकिस्तानने सुरुवातीला मान्य केलं नाही. परंतु भारताने सर्व साक्षीपुरावे पाकिस्तानसह अमेरिकेसमोर ठेवले.
या हल्ल्यानंतर संशयाची सुई पाकिस्तानच्या दिशेने रोखली गेली. पकडण्यात आलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबने दहशतवादी हल्ला केल्याची कबुली दिली. २००९मध्ये या खटल्याची सुनावणी सुरू झाली. कसाबवर ८६ आरोप निश्चित करण्यात आले. ३ मे २०१० रोजी विशेष सत्र न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा ठोठावली. २१ फेब्रुवारी २०११ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कसाबच्या फाशीच्या निर्णय कायम ठेवला. २१ नोव्हेंबर २०१२ रोजी येरवडा तुरुंगातच कसाबला फाशी देण्यात आली.
या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग स्पष्ट झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली. पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतात प्रवेश नाही हे ठरलं. त्यामुळेच त्यांच्यासाठी आयपीएलची दारं बंद झाली.
भारत पाकिस्तान क्रिकेट
क्रिकेटविश्वातल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये भारत-पाकिस्तान यांचा समावेश होतो. टीव्हीवर आणि प्रत्यक्षातही प्रेक्षकसंख्येचे नवनवे विक्रम भारत-पाकिस्तान लढतींनी मोडले आहेत. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड या पारंपरिक अशेस द्वंद्वाप्रमाणे भारत-पाकिस्तान म्हणजे दर्जेदार क्रिकेटची पर्वणी हे समीकरण ठरलेलं. चांगल्या खेळाच्या बरोबरीने खेळाडूंमधली वादावादी, भांडणं, मैत्रीचे किस्से जगजाहीर आहेत. परंतु दोन्ही देशांमधील दुरावलेल्या संबंधांमुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये मालिका खेळण्यासाठी जात नाही आणि पाकिस्तानचा संघ भारतात मालिका खेळण्यासाठी येत नाही. केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये म्हणजेच वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप या तटस्थ स्पर्धांमध्येच हे दोन संघ आमनेसामने येतात. भारताने पाकिस्तानमध्ये शेवटची टेस्ट २००६मध्ये तर शेवटची वनडे २००८मध्ये खेळली आहे. पाकिस्तानचा संघ भारतात शेवटची टेस्ट २००७मध्ये खेळला आहे तर पाकिस्तानचा संघ वनडे सीरिजसाठी 2013 मध्ये भारतात आला होता.
पाकिस्तानच्या खेळाडूंची आयपीएमधली कामगिरी
प्रचंड वेगाने बॉलिंग करत प्रतिस्पर्धी बॅट्समनच्या मनात धडकी भरवणाऱ्या शोएब अख्तरला तीन मॅच खेळता आल्या. त्याने ३ सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. उंचपुरा आणि स्विंग बॉलिंगसाठी प्रसिद्ध उमर गुलला सहा मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने १२ विकेट्स पटकावत आपली उपयुक्तता सिद्ध केली. तुफान फटकेबाजी, उत्तम फिल्डर आणि उपयुक्त बॉलिंग यामुळे शाहिदी आफ्रिदी डेक्कन चार्जर्स संघाचा अविभाज्य भाग होता. १० सामन्यात त्याने ८१ धावा केल्या आणि ९ विकेट्स घेतल्या. कोणत्याही क्रमांकावर बॅटिंग करण्याची क्षमता, ऑफस्पिन बॉलिंग आणि दर्जेदार फिल्डिंग यामुळे हफीझ हा ट्वेन्टी-२० फॉरमॅटसाठी साजेसा खेळाडू होता. कोलकातासाठी हफीझला ८ सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने २० धावा केल्या आणि एक विकेट मिळवली.
मिसबाह उल हक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला. मिसबाहने ८ सामन्यांमध्ये ११७ धावा केल्या. कामरान अकलमने राजस्थानकडून खेळताना १२८ धावा केल्या. ५ झेल टिपले तर ४ स्टंपिंग केले. डावखुऱ्या उंच आणि वेगळी अॅक्शन असणाऱ्या सोहेलने आपल्या कामगिरीने जगभरातल्या चाहत्यांना दखल घ्यायला भाग पाडलं. राजस्थानसाठी खेळताना सोहेलने १२ सामन्यांमध्ये २५ विकेट्स मिळवत परपल कॅपवर नाव कोरलं. स्विंग बॉलिंगने प्रतिस्पर्धी बॅट्समनची भंबेरी उडवणारा गोलंदाज आसिफने ८ सामन्यांमध्ये ८ विकेट्स मिळवत योग्यता दाखवून दिली. विकेट्सबरोबर रन्स रोखण्याची त्याच्या क्षमतेने प्रभावित केलं होतं.
बॉलिंग,बॅटिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर योगदान देणारा खेळाडू म्हणजे शोएब मलिक. तो ८ सामने खेळला. त्यात त्याने ५२ धावा केल्या आणि २ विकेट्स काढल्या. स्टायलिश डावखुरा बॅट्समन सलमाने बटने कोलकातासाठी सलामीला येत ७ सामन्यांमध्ये १९३ रन्स केल्या. पहिल्यावहिल्या आयपीएल विजेत्या संघाचा युनिस भाग होता. पाकिस्तानचा आधारस्तंभ असलेल्या युनिसला रॉयल्ससाठी केवळ एकमेव सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.
पाकिस्तानचे खेळाडू ऑस्ट्रेलियातील बिग बॅश, बांगलादेश प्रीमिअर लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग, श्रीलंका प्रीमिअर लीग, मझांशी सुपर लीग, ट्वेन्टी-20 ब्लास्ट असं जगभरातील ट्वेन्टी-20 लीगमध्ये खेळतात परंतु भारतात होणाऱ्या लीगची दारं त्यांच्यासाठी बंद आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या बाबर आझमच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा यांना मागे टाकून बाबर अव्वल स्थानी आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत मोहम्मद रिझवान ७व्या स्थानी आहे.
