आयपीएलचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आयपीएल काळात आंतरराष्ट्रीय मालिकांचं आयोजन सहसा करण्यात येत नाही. कारण जगभरातले प्रमुख खेळाडू आयपीएलच्या निमित्ताने भारतात असतात. दोन महिन्यात वर्षभराची पुंजी असं हे समीकरण असतं. मात्र यंदा आयपीएल काळात पाकिस्तान सुपर लीगही होणार आहे.
सर्वसाधारणपणे पाकिस्तान सुपर लीग फेब्रुवारी महिन्यात होते. मग असं असताना आयपीएल काळातच पाकिस्तान सुपर लीगचा घाट का घातला जात आहे? हे समजून घेऊया. सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल आणि पीएसएल एकाच वेळी होत आहेत. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आयसीसीतर्फे चॅम्पियन्स लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानकडे होतं. स्पर्धेच्या आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठ्या प्रमाणावर स्टेडियम्सचं नूतनीकरण केलं. प्रदीर्घ कालावधीनंतर पाकिस्तानमध्ये आयसीसीच्या स्पर्धेचं आयोजन होणार होतं. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा होता. भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवण्यात आले. पण बाकी संघांचे सामने पाकिस्तानात झाले. घरीच एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन असल्यामुळे पाकिस्तान सुपर लीगचा हंगाम पुढे ढकलण्यात आला. आयपीएलच्या कालावधीत म्हणजे एप्रिल-मे याच काळात पीएसएलचा हंगामही झाला.
यंदाही अशीच काहीशी परिस्थिती उदभवली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यांमध्ये आयसीसीने टी२० वर्ल्डकपचं आयोजन केलं होतं. भारत आणि श्रीलंका सहयजमान होते. पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले. आयसीसीची स्पर्धा असल्यामुळे पाकिस्तान सुपर लीगचा हंगाम पुढे ढकलावा लागला. यामुळे आता यंदाही पाकिस्तान सुपर लीग आणि आयपीएल एकाच काळात होणार आहे.
आयपीएल लिलावात अनसोल्ड ठरलेले अनेक खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहेत. याव्यतिरिक्त जगभरातले असंख्य खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार आहेत. आयपीएलमध्ये खेळणार असलेल्या अनेक खेळाडूंना दुखापतीची समस्या भेडसावते आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स, जोश हेझलवूड हे पहिल्या टप्प्यातील सामने खेळू शकणार नाही. मिचेल स्टार्कही सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. नॅथन एलिस मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामच खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. हैदराबाद संघाकडून खेळणारा जॅक एडवर्ड्सही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. या खेळाडूंच्या ऐवजी बदली खेळाडू घेण्यासाठी आयपीएल संघ प्रयत्नशील आहेत. मात्र लिलावात अनसोल्ड ठरलेल्या अनेक खेळाडूंनी पीएसएलची वाट धरली आहे. आयपीएलमध्ये खेळायचं ठरवलं तर त्यांना पीएसएलवर पाणी सोडावं लागेल.
झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझाराबानी याने तसंच केलं. नुकत्याच झालेल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत मुझाराबानीने उत्तम कामगिरी केली. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रहमानला रिलीज करण्याचा आदेश बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्स संघाला दिला. यामुळे कोलकाताला चांगल्या गोलंदाजाची आवश्यकता होती. ब्लेसिंगची कामगिरी लक्षात घेऊन कोलकाताने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. ब्लेसिंग पीएसएलमध्ये खेळणार होता मात्र आयपीएल संघाकडून कराराचा प्रस्ताव मिळाल्यानंतर त्याने पीएसएलला सोडचिठ्ठी दिली. काही दिवसांपूर्वी ब्लेसिंग भारतात दाखल झाला. शुक्रवारी झालेल्या इंट्रा स्क्वॉडमध्ये ब्लेसिंगने गोलंदाजीही केली.
दरम्यान २६ मार्च ते ३ मे या कालावधीत पीएसएल स्पर्धा होणार आहे. आठ संघ सहभागी होत असून फैसलाबाद, कराची, लाहोर, मुलतान, पेशावर आणि रावळपिंडी इथे सामने होणार आहेत. पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धामुळे परिस्थिती संवेदनशील आहे. त्यामुळे पीएसएल होणार का याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे सरकारने परवानगी दिल्यानंतरच पीएसएल स्पर्धेत खेळता येईल असं बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. बांगलादेशचे सहा खेळाडू पीएसएलमध्ये खेळणं अपेक्षित आहे.
