India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ २०१२ नंतर एकही द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी आमनेसामने आलेले आहेत. या दोन्ही संघांचा सामना केवळ आशिया चषक आणि आयसीसीच्या स्पर्धांमध्ये होत असतो. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत- पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला श्रीलंकेत कोलंबोत होणार, असं ठरलं होतं. पण स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच पाकिस्तानने भारत- पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ इतर सर्व सामने खेळण्यासाठी तयार होता, पण भारताविरूद्ध खेळण्यास नकार दिला होता.शेवटी सामन्याच्या २ दिवसाआधी मीटिंग झाली आणि त्यात पाकिस्तानचा संघ मैदानात उतरण्यासाठी तयार असल्याची माहिती देण्यात आली. पाकिस्तानने आपला निर्णय तर बदलला, पण हा निर्णय कोणामुळे बदलला? याबाबतचा खुलासा पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी केला आहे.
श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांनी हस्तक्षेप केल्यामुळे भारत-पाकिस्तान सामना होऊ शकला. दिसानायके यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांना फोन केला आणि हा सामना खेळण्याची अनुमती देण्यास सांगितलं. माध्यमातील वृत्तानुसार, मोहसीन नक्वी यांनी एका बैठकीत अनुरा दिसानायके यांच्याबद्दल बोलताना म्हटले की, “सर्वात आधी पाकिस्तानचे राष्ट्रपती आसीफ अली जरदारी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून तुमचे मनपासून आभार. त्यांनी मला तुमचं अभिनंदन करायला सांगितलं आहे. काल झालेल्या सामन्याचे (भारत-पाकिस्तान) खरे हिरो तुम्हीच होते. कारण तुमच्यामुळेच २ अरब लोकांचं मनोरंजन झालं. हे केवळ तुमच्यामुळेच शक्य झालं.”
मोहसीन नक्वी म्हणाले, “भारतीय संघाचा सामना करण्याआधी आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पण पंतप्रधानांना तुमचा कॉल येताच, त्यांनी मला कॉल केला आणि म्हणाले, आता काहीच अडचण नाही. आपल्याला खेळायचं आहे.मी तुमचे मनापासून आभार मानतो.” पाकिस्तानचा संघ हा सामना खेळण्यासाठी मैदानात तर उतरला, पण भारतीय संघाला कडवी झुंज देऊ शकला नाही. भारतीय संघाने हा सामना एकतर्फी आपल्या नावावर केला.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. अभिषेक शर्मा शून्यावर माघारी परतला. त्यानंतर इशान किशनने चौकार- षटकारांचा पाऊस पाडत ७७ धावांची खेळी केली. तर कर्णधार सूर्यकुमार यादवने ३२ धावांची खेळी करून भारतीय संघाला १७५ धावांपर्यंत पोहोचवलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानकडून उस्मान खानने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. हा सामना भारतीय संघाने ८१ धावांनी आपल्या नावावर केला.

