Pat Cummins On T20 World Cup: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंकेत केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत. पण ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकप विजेता कर्णधार पॅट कमिन्सने ही स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे. दरम्यान पॅट कमिन्सने ही स्पर्धा न खेळण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.
पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार आहे. टी -२० वर्ल्डकप स्पर्धेसाठीही कमिन्सला संघात स्थान मिळणार होतं, पण त्याने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे संघाबाहेर झालेल्या पॅट कमिन्सच्या जागी ड्वार्शुइसला संघात स्थान देण्यात आलं आहे. गेल्यावर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना कमिन्सला दुखापत झाली होती. तो इंग्लंड विरुद्धच्या ॲशेस मालिकेत खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. पण मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. पण तो पूर्णपणे ठीक झाला नसल्याने, त्याने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पॅट कमिन्सने Amazon prime video वर बोलताना म्हटले की, “खरोखरच दुर्दैवी आहे. मला स्वतःला खेळण्यासाठी शारीरिकदृष्ट्या ठीक वाटत होतं, पण दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ कमी पडला. आता काही आठवडे पूर्ण विश्रांती घेणं गरजेचं आहे.” सुरुवातीला त्याला वाटलं होतं की, पूर्णपणे ठीक होण्यासाठी ४ आठवड्याचा वेळ पुरेसा असेल. पण स्कॅन केल्यानंतर कळालं की, पूर्णपणे ठीक होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे.
टी -२० वर्ल्डकप स्पर्धेनंतरही ऑस्ट्रेलियाचं कार्यक्रम व्यस्त आहे. ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. २०२७ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर मेलबर्नच्या मैदानावर १५० वा डे नाईट कसोटी सामना, ऍशेस मालिका आणि आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल देखील होणार आहे.कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी त्याने टी-२० वर्ल्डकपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

