R Ashwin On Retirement: भारतीय संघातील अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली होती. अश्विनच्या गोलंदाजीतील धार कमी झालेली नव्हती. त्याच्याकडे कसोटी क्रिकेटमधील मोठे विक्रम मोडून काढण्याची संधी होती. असं असतानाही त्याने अचानक निवृत्ती घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. आता अश्विनने निवृत्ती का घेतली यामागचं खरं कारण सांगितलं आहे. त्याने स्वत:ला वचन दिलं होतं की, ज्यावेळी भारतीय संघ मायदेशात कसोटी मालिका गमावणार, त्यानंतर तो कसोटी क्रिकेटला रामराम करणार.
आर अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “२०१२ मध्ये इंग्लंडविरूद्ध मालिका गमावल्यानंतर मी स्वत:ला वचन दिलं होतं की, जर आम्ही भारतात कसोटी मालिका गमावली, तर मी निवृत्ती घेणार. न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या पराभवामुळे आज मी घरी बसलोय. त्या पराभवामुळे खूप निराश झालो होतो.” आर अश्विनला गेल्यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात संधी दिली गेली होती. ही मालिका सुरू असतानाच त्याने पत्रकार परिषदेत येऊन निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर त्याने आयपीएल स्पर्धेतूनही निवृत्तीची घोषणा केली होती.
न्यूझीलंडविरूद्ध झालेला पराभव भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी न पचवणारा होता. गेल्यावर्षी न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता.दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली होती. ही मालिका भारतीय संघाला ३-० ने गमवावी लागली होती. मुख्य बाब म्हणजे मायदेशात खेळताना भारतीय संघाने पहिल्यांदाच ३-० ने मालिका गमावली होती. तसेच न्यूझीलंडसाठी देखील हा ऐतिहासिक विजय होता. कारण बऱ्याच वर्षांनी न्यूझीलंडने भारतीय संघाला भारतात पराभूत केलं होतं.
आश्चर्यचकीत करणारी बाब अशी की, भारतीय संघाने मायदेशात खेळताना गेल्या ३ पैकी २ मालिका ३-० आणि २-० ने गमावल्या आहेत. भारतीय संघाने वेस्ट इंडिजला २-० ने हरवलं आहे. पण वेस्ट इंडिजचा संघ तोडीस तोड देणारा संघ नव्हता. पण न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी दमदार खेळ केला आणि भारतीय संघावर ऐतिहासिक विजय मिळवला. एकीकडे दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. तर दुसरीकडे भारतीय गोलंदाजांकडून फ्लॉप शो पाहायला मिळाला. भारतीय फलंदाज या मालिकेत धावा करण्यात अपयशी ठरले. तर दुसरीकडे पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघातील फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला.
